तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना जितके प्रशंसक लाभले, त्यामानाने टीकाकार अपवाद. प्रा. मे. पुं. रेगे आणि प्रा. रा. ग. जाधव या दोहोंना तर्कतीर्थाचा दीर्घ सहवास लाभला. दोघांनी तर्कतीर्थावर समरसून लिहिले; पण या उभयतांची लेखनशैली प्रशंसेपेक्षा विश्लेषणाची होती. त्यात तर्कतीर्थाना समजून घेण्याचा प्रयत्न असायचा, तर दुसरीकडे तर्कतीर्थ हे काय रसायन आहे, तो आपल्या समाजसंचिताचा मोठा भाग कसा आहे, त्यांनी आपणास काय दिले, आपण त्यांचे काय अनुकरण करणे शक्य आहे, अशा अनेक अंगांनी त्यांना समाजाभिमुख करण्याची धडपड असे.
तर्कतीर्थ व प्रा. रेगे यांचा प्रथम परिचय सन १९५५ला श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. समाजप्रबोधन संस्थेच्या स्थापनेची बैठक तिथे योजली होती. बैठकीस शंकरराव देव, आचार्य स. ज. भागवत, रावसाहेब पटवर्धन, प्रा. देवदत्त दाभोलकर, प्रा. भा. शं. भणगे, प्रा. अ. भि. शहा प्रभृती मान्यवर उपस्थित होते. प्रा. देवदत्त दाभोळकर तेव्हा मुंबईच्या कीर्ती कॉलेजमध्ये होते. प्रा. रेगे त्यांचे तेथील सहकारी. प्रा. दाभोळकरांबरोबर अनायासे गेलेले प्रा. रेगे पुढे या वर्तुळाचा भाग झाले. तर्कतीर्थानी ‘छंद’ मासिकात गो. वि. करंदीकरांच्या ‘अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ ग्रंथांचे प्रा. मे. पुं. रेगेंचे प्रकाशित पुस्तक परीक्षण वाचले होते. तो धागा दोघांच्या मैत्रीचे सूत्र बनला आणि प्रा. रेगे हे तर्कतीर्थाचे निकटवर्ती झाले.
या सर्वातून प्रा. रेगेंच्या नजरेत भरलेले तर्कतीर्थ आपसूक उतरत राहतात. त्यानुसार तर्कतीर्थ साध्या वृत्तीचे अथांग पंडित होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांगी विद्वत्तेने समृद्ध होते. वृत्तीने ते मनमोकळे होते. मनस्वी हसत. प्रकांडपांडित्य ते लीलया पेलत, याचे आश्चर्य वाटत राहत असे. चारचौघांत मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव होता, तसे ते गृहस्थाश्रमी वृत्तीचे गृहस्थ होते. जीवनाचे पोषण करणे हे समाजातील सांस्कृतिक व्यवहारांचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे, अशी तर्कतीर्थाची धारणा होती. त्यांचे ज्ञान नेहमी चैतन्याने रसरसलेले, ताजे असे.
परंपरा व नवतेचे त्यांना एकाच वेळी व्यासंग म्हणून आकर्षण असे. त्यांचा पिंड बौद्धिक होता. अमूर्त, तार्किक विषयांची त्यांच्यात विलक्षण ओढ होती. अशा विषयांच्या घटपटादी खटपटीत ते रममाण असत. तर्कतीर्थाचा वाचनाचा आवाका पाहिला, तर पुस्तके आडवी वाचायची त्यांना गरज नसावी. बहुधा त्यांनी पुस्तके उभी वाचण्याची किमया साधली असावी, असा संशय येतो; पण वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचे मर्म त्यांनी ग्रहण केलेले असे व ते पचविलेले असते, हे लक्षात येते. आपल्याला आलेला कोणताही अनुभव ते कधीही विसरत नसत. आपल्या गुप्त (सुप्त) मनात तो साठविलेला असतो, असे मानसशास्त्र सांगते. हे तर्कतीर्थाच्या बाबतीत शब्दश: खरे होते. त्यांच्या कुतूहल नि जिज्ञासेच्या कक्षा म्हणाल तर अगणित! वेदविद्या, धर्मशास्त्र, दर्शने, व्याकरण, साहित्य, साहित्यशास्त्र सारे विषय त्यांच्या आवाक्यात मोडत. ते विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) नव्हेत. विशेषज्ञांच्या एकाग्रतेच्या संकुचित क्षेत्राचा प्रदीर्घ व्यासंग करून त्यांनी ज्ञानसंग्रह केलेला असे.
भारतीय बौद्धिक परंपरेतला प्रांजळपणा आणि चोखपणा, विचारांची स्पष्टता, सूक्ष्मता आणि झेप, तिने निर्माण केलेली आणि स्वीकारलेली करडी बौद्धिक शिस्त यांचा त्यांना अभिमान असे. वर्तमान परिस्थितीशी मुकाबला करू शकणारा, भविष्याला अभिमुख असा जोमदार समाज येथे निर्माण करायचा, तर आतापर्यंतच्या परंपरानिष्ठ, स्थितिशील भारतीय समाजाहून तो वेगळा असला पाहिजे, असे त्यांना मनोमन वाटे. सामाजिक जीवनाच्या आणि संस्कृतीच्या कोणत्याही अंगाकडे समग्र सामाजिक वास्तवाच्या आणि त्याच्या घडत आलेल्या ऐतिहासिक विकासाच्या संदर्भात पाहिले पाहिजे, हा मार्क्सवादी दृष्टिकोन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पटलेला होता. मानवी जातीचा एकात्म सांस्कृतिक वारसा आहे, हे गृहीत धरून त्यांनी भारतीय संस्कृतीची चिकित्सा व मूल्यमापन केले. जगाच्या दृष्टीने नास्तिक ठरलेले मूलत: आस्तिक अशा अर्थाने होते की, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक, विधायक दृष्टिकोन त्यांना या दोहोंपलीकडे जाऊन नवमानवतावादी ठरवत होता, हे विसरून चालणार नाही.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
