राष्ट्रीयत्व, लैंगिकता, भौगोलिक सीमा, भाषा या सर्व भेदांपलीकडे जात, सर्वसमावेशकतेला प्राधान्य देत साहित्यजगतातील नवनव्या घडामोडींचा मागोवा घेणारा ‘टाटा लिट फेस्ट’ २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे चौदावे वर्ष आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा दोन स्वरूपांत महोत्सव होणार आहे. महोत्सवात सलमान रश्दी, एलिफ शफाक यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यिकांचे विचार आणि अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे. नरिमन पॉइंट येथील एनसीपीए, सेंट पॉल इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन एज्युकेशन आणि वांद्रे येथील टायटल बुक स्टोअरमध्ये विविध चर्चासत्रे आणि मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘वाचन-प्रेरणे’ची कप्पेबंदी..

National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

कथा, कविता, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कला, इतिहास, खाद्यसंस्कृती अशा विविध विषयांशी संबंधित नवे दृष्टिकोन या महोत्सवाच्या माध्यमातून मांडले जातात. २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन स्वरूपात आणि २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष महोत्सवस्थळी कार्यक्रम होतील. महोत्सवाचा प्रारंभ सलमान रश्दी यांच्या मुलाखतीने होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ ते ६.४५ दरम्यान तिशानी दोशी ही मुलाखत घेतील. याच दिवशी रात्री ८ ते ८.४५ दरम्यान पॅलेस्टाइनमधील नाटय़विश्वाबद्दल इसाबेला हमद यांच्याशी गिरीश शाहणे संवाद साधतील. २६ ऑक्टोबरला विशेष आर्थिक क्षेत्रे निर्माण करणे हे लोकशाही तत्त्वांचे उल्लंघन कसे आहे, याविषयी किन स्लोबोदियन आणि पल्लवी अय्यर मते मांडतील. महोत्सवस्थळी होणाऱ्या कार्यक्रमांचा प्रारंभ २७ ऑक्टोबर रोजी ‘इन प्रेज ऑफ फ्रेज’ या चर्चासत्राने होईल. त्यात खासदार शशी थरूर आणि मेहदी हसन सहभागी होतील. २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान भारतीय गुप्तचर खाते कसे काम करते, याविषयीचा एक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यात मणिशंकर अय्यर आणि मीरा चढ्ढा बोरवणकर यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळेल. महोत्सवाचा समारोप ‘टाटा लिटरेचर लाइव्ह २०२३’ या पुरस्कार सोहळय़ाने होईल. महोत्सवाच्या कालावधीत चित्र, शिल्प, नाटय़, आभासी वास्तव या विषयांवरील विविध कार्यक्रमांचे आणि सादरीकरणांचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवस्थळी या माध्यमांतील कलाकृतीही मांडण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त अनेक चर्चासत्रे, कथाकथनाचे कार्यक्रम, परिसंवाद आणि मुलाखती होणार असून सविस्तर वेळापत्रक  https://tatalitlive.in/schedules या लिंकवर उपलब्ध आहे. ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.