मुंबईला स्वप्ननगरी म्हणून घडवण्याच्या जादूकडे जे लोक आकर्षित झाले आणि पुढे त्यांनीच मुंबईच्या घडणीत योगदान दिले अशांपैकी एक म्हणजे तात्यासाहेब अर्थात वामन श्रीधर आपटे. कापड व्यवसायातील भागीदारीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आणि साखर कारखाने, मूकपट निर्मिती अशा विभिन्न क्षेत्रांतील त्यांचे उद्यम साहस याचा मागोवा घेणारे त्यांच्या पणतीने लिहिलेले पुस्तक…

सामान्य आर्थिक स्थितीतील एका स्थलांतरित कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात जन्म. गिरगावच्या चाळीतील वास्तव्यात, कुटुंबातील सोवळं-ओवळं, विटाळ, शुद्धता आणि अशुद्धतेची पाय जखडून ठेवणारी कर्मठ सामाजिक बंधनं. अशातही अत्यंत कल्पकतेने केलेल्या आंतरधार्मिक भागीदार्‍या, केवळ सुशिक्षित असण्याचाच नव्हे तर बहुभाषक कौशल्यांचा खुबीने वापर आणि मुख्य म्हणजे माणसांची अचूक पारख, शिस्त आणि अथक कार्यनिष्ठा हाच गाठीशी असलेला मुख्य ऐवज.

याच भांडवलाच्या जोरावर कापड उद्योग, चित्रपट निर्मिती (सायलेन्ट फिल्म्स), साखर उद्योग अशा अगदी भिन्न धर्माच्या व्यवसायात जम. वार्‍याची दिशा ओळखण्याची कुशाग्र व्यापारी बुद्धी आणि त्यामुळे तेजी खुणावत असलेल्या व्यवसायात उडी घेऊन चमत्कारिक यश. बघता बघता चाळीतल्या एका खोलीतील बिर्‍हाड थेट समुद्रकिनार्‍यावरील आलिशान बंगल्यापर्यंत पोहोचते आणि मुंबईच्या व्यापार वैभवात मानाचे स्थान मिळवते… १९ व्या शतकातील मुंबईतील ब्रिटिशांच्या गोर्‍या वर्तुळातील प्रभावशाली नामावलीत एक मराठी नावदेखील कर्तबगारी गाजवत होते.

ते नाव म्हणजे तात्यासाहेब अर्थात वामन श्रीधर आपटे. त्यांचीच पणती (नातवाची मुलगी, चौथ्या पिढीची प्रतिनिधी) आणि नामांकित लेखिका तेजस्विनी आपटे-राम यांनी लिहिलेल्या ‘तात्यासाहेब: द स्टोरी ऑफ ए बॉम्बे आंत्रप्रेन्युअर’ या चरित्रात हा दीडशे वर्षांपूर्वीचा उद्यम इतिहास ग्रथित आहे. १८७५ ते १९५२ असा तात्यासाहेबांचा केवळ जीवनकालच नव्हे, तर त्या काळात घडत गेलेल्या मुंबई आणि या नगरीच्या उद्यम ऊर्मीचा पटही त्यांनी प्रभावीपणे खुलवला आहे. 

भारतातील स्वदेशी वाणिज्यवादाचे युग ज्याला म्हटले जाते त्या १८६० ते १९४० या काळात एकीकडे डेव्हिड ससून, जीजीभॉय, वाडिया, टाटा तर, दुसरीकडे प्रेमचंद रायचंद, बिर्ला, रुईया या पंक्तीतच बसेल असे आपटे हेही एक नाव होते. पण कापूस, अफू अथवा दलाली-सावकारी या पारशी, माहेश्वरी, गुजराती समुदायाची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांचा अपवाद करत तात्यासाहेबांनी वेगळी वाट चोखाळत आपला ठसा उमटवला.

त्या काळी ‘मँचेस्टर ऑफ द ईस्ट’ असे वर्णन केला गेलेला मुंबईतील गिरणगाव उदयास आला होता. येथील क्षितिजावर कापड गिरण्यांची उंच धुरांडीच केवळ दिसत. लेखिका सांगतात, तेव्हा म्हणजे विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर, १९०० साली या परिसरात एकूण १३६ कापड गिरण्या सुरू होत्या. त्याआधीच म्हणजे १८९२ मध्ये १७ वर्षीय तात्यांनी मुंबईतील मुळजी जेठा (एमजे) या कापड बाजारात उमेदवारी सुरू केली होती. वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी मोठ्या बंधूंसह गुजरातमध्ये जावे लागलेले आणि तेथेच इंग्रजी माध्यमात मॅट्रिकपर्यंत शिकलेले तात्या हे मराठी, इंग्रजीसह, गुजराती भाषेतही निष्णात होते. द्वारका, गुजरातमध्येच त्यांची एमजे मार्केटमधील कापड व्यापारी वल्लभदास यांच्याशी झालेली ओळख पुढे उपयोगी ठरते.

सुरुवातीचा प्रशिक्षण काळ, एमजे मार्केटमधील वल्लभदास, पुढे मोरारजी वेलजी यांच्याकडे काही काळ काम करून, तात्यांचा गोविंदजी मोरारजींसह भागीदारीत स्वत:चा व्यवसाय १८९४ मध्ये सुरू होतो. पुढे प्लेग साथीच्या उद्रेकाने मुंबई सोडावी लागल्याने तोट्यात गेलेली ही भागीदारी गुंडाळावी लागते. व्यवसायातील पहिल्या पावलावरच्या या अपयशाने खचून जाण्याऐवजी तात्या १ जुलै १८९८ला गुजरातीबहुल एमजे मार्केटमध्ये स्वत:ची पेढी सुरू करतात.

पहिल्या वर्षीच कमावलेला ३०० रुपयांचा नफा ही तात्यांची उमेद वाढवणारी सुरुवात ठरते. दोन वर्षांत नफ्याचे प्रमाण १२,००० अशा त्या काळी अवाढव्य व अकल्पनीय स्तरावर पोहोचते. तोवर एमजे मार्केटमधील मोठे प्रस्थ झालेले तात्या पुढे ब्रिटिश अधिकार्‍याच्या अमलाखाली कोहिनूर मिल्सचे एकमेव विक्रेते होतात. त्या काळी कोणत्याही गिरणीची ‘सोल एजन्सी’ ही खासच होती. तात्यांची तेथील कामगिरी तर कोहिनूर मिल्सच्या यशाचीही मुख्य आधारस्तंभ ठरली.

या प्रवासात त्यांनी केलेल्या भागीदार्‍या पुढे जीवनभर उपयोगी पडल्या. विशेषत: कोहिनूरचे व्यवस्थापन पाहणारी ब्रिटिश कंपनी ‘किलिक निक्सन अँड कं.’ आणि तिचे अध्यक्ष थॉमस ब्रिकेट यांच्याशी संबंधांतून तात्यांना ब्रिटिश कॉर्पोरेट संस्कृतीचा जवळून परिचय झाला. यातून कोहिनूरच्या संचालक मंडळावरही त्यांना स्थान देण्यात आले. फलटणसारख्या ग्रामीण भागात साखर कारखाना सुरू करण्याचे धाडस जेव्हा तात्यांनी केले, तेव्हाही ब्रिकेट आणि किलिक निक्सन अँड कंपनीशी राहिलेले सख्य त्यांना लाभदायी ठरले.

मूकपटांच्या व्यवसायात तात्यांचा प्रवेश मात्र ठरवून झाला नाही. कापड व्यवसायातील काही भागीदारांच्या बैठकीत असतानाच, त्यांना एक पत्र सोपवण्यात आले. या पत्रात दादासाहेब फाळके यांना चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य करण्याची शिफारस करण्यात आली होती. ही शिफारस खुद्द लोकमान्य टिळक यांनीच केली होती. तात्या यांचा स्वातंत्र्यलढा अथवा राजकारणाशी संबंध नसला तरी त्यांच्या मनात टिळकांविषयी नितांत आदर होता. चित्रपटांविषयी काहीही माहिती नसतानाही, फाळके यांना अर्थसाहाय्यास ते तात्काळ राजी झाले. ‘हिंदुस्तान फिल्म कंपनी’ची मुहूर्तमेढ अशी रोवली गेली. १६ वर्षांच्या कालावधीत तात्यांनी सुमारे १०० मूकपटांची निर्मिती केली, ज्यापैकी साधारण ४० चित्रपटांचे दिग्दर्शक स्वत: फाळके होते.

ब्रिटिशांनी १९३० च्या सुमारास साखर उत्पादनाला प्रोत्साहनाचे धोरण आखले. तरी दुष्काळी आणि अत्यंत दुर्गम अशा फलटणमध्ये साखर कारखाना सुरू करण्याची कल्पनाही त्याकाळी अशक्य सोडाच, वेडेपणाचीच होती. मालोजीराजे हे फलटण संस्थानाचे राजे आणि द्रष्टे नेते, त्यांचे तात्यांशी कौटुंबिक मैत्रीचे संबंध हेच फलटण शुगर वर्क्स उभा राहण्यामागचा विश्वास होता, जो खराही ठरला. ‘वामन सेठ’च्या भरवशावर मफतलाल गगनभाई आणि नहालचंद लालूचंद हे साखर व्यवसायातील कसलीही माहिती नसलेले आर्थिक भागीदार उभे राहिले. पुढे १९४२ मध्ये कंपनीच्या समभागांची- प्रत्येकी १२५ सार्वजनिक विक्री होऊन, तिला ‘पब्लिक लिमिटेड’ रूप दिले जाते. तीन भागीदारांनी ४० लाखांच्या गुंतवणुकीतून उभ्या केलेल्या कंपनीतील ३० टक्के हिस्सा विकून ते ३० लाख रुपये परतावा स्वरूपात मिळवितात. सर्वांत उल्लेखनीय योगदान हे की, पश्चिम महाराष्ट्रात आज चांगल्याच फोफावलेल्या साखर पट्ट्याच्या उदयास फलटणचा हा यशस्वी प्रयोग कारण ठरला.

तेव्हाची म्हणजेच दीडशे वर्षांपूर्वीची मुंबई हीदेखील स्वप्नांची आणि संधींचीच नगरी होती. किंबहुना, ‘हिंदुस्तान फिल्म कंपनी’चे मॅनेजिंग पार्टनर या नात्याने, लोकांसाठी स्वप्ने विणण्यात खुद्द तात्यांचाही प्रत्यक्ष सहभाग होता. लेखिकेने हे पुस्तक लिहायला घेतले तोपर्यंत त्यांना त्यांचेच पणजोबा असले तरी तात्यांबाबत खूपच त्रोटक माहिती होती. अगदी इतिहास संशोधकाच्या भूमिकेत शिरून मिळेल त्या स्रोतातून माहिती मिळवत, त्याच्या अन्य स्रोतांद्वारे पडताळ्याच्या दशकभराच्या प्रयासातून हा लेखनप्रपंच त्यांनी पुरता निरपेक्षपणे पूर्ण केल्याचे त्या सांगतात. चरित्रपर लेखनातील केवळ गुणगानाचा मोह टाळणारा हा तटस्थपणा या पुस्तकाचे मोल निश्चितच वाढवणारा आहे.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईवर जो आज मुकुट सजला आहे तो अशा अनेक ध्येयासक्त, महत्त्वाकांक्षी कतृत्ववानांच्या असामान्य भासेल अशा उद्यम साहसातून एक एक वीट रचली जात आकाराला आला आहे. या स्वप्ननगरीच्या घडवण्याच्या जादूने हे लोक आकर्षित झाले आणि पुढे त्यांनीच मुंबईच्या घडणीत योगदान दिले. एकेकाळची सुंदर बेट नगरी मुंबईचे ते जुने रूप, झाडांनी डवरलेले मोकळे रस्ते, निवांतपणा वगैरेच्या आठवणी आज अनेकांसाठी केवळ मनांतील हळहळ बनून राहिल्या असतील. परंतु मुंबईचे अंगभूत सृजनरूप त्यांनाही नाकारता येणार नाही. या नगरीच्या त्याच वैशिष्ट्याला, तिच्या पूर्ववैभवाच्या इतिहासाला समजून घेण्यासाठी या पुस्तकाला जरूरच विचारात घेतले जावे.

‘तात्यासाहेब : दी स्टोरी ऑफ अ बॉम्बे आंत्रप्रेन्युअर’

लेखिका – तेजस्विनी आपटे-राम

प्रकाशक – वेस्टलँड बिझनेस

पाने– २७३, किंमत- ६९९ रु.

sachin.rohekar@expressindia.com