‘२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे’ हे वाक्य गेली अनेक वर्षे आपण ऐकतो… मात्र त्याआधी तंत्रज्ञानाची सार्वजनिक जीवनात काय भूमिका होती? तंत्रज्ञानाचा प्रवेश मानवी जीवनात सर्वप्रथम कधी झाला? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा प्रवास मानवी उत्क्रांतीपर्यंत पोहोचतो. एका निरीक्षणानुसार तंत्रज्ञान हे मानवी जीवनाच्या आधीपासून या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. खोबणीतले किडे खाण्यासाठी एप माकडांनी केलेला काठीचा वापर, पक्ष्यांकडून घरटे बांधण्यासाठी झालेला नैसर्गिक वस्तूंचा वापर ही सर्व तंत्रज्ञानाचीच तर स्वरूपे! इतिहासाची पाने चाळताना निअँडरथल आणि क्रोमॅग्नन मानवाने वापरलेली दगडी हत्यारे आणि छायाचित्रे कदाचित तुम्हाला आठवत असतील. तंत्रज्ञानाचा मानवी जीवनाला परिचित असलेला हा पहिला आविष्कार! त्यानंतर अश्मयुगात दगडापासून सुरुवात होऊन लाकूड, माती, कांस्यासारखे धातू वा संयुगे यांचा वापर करून मानवाने कौशल्ये विकसित करणे चालू केले, याचा प्रभाव सामाजिक आणि राजकीय जीवनावर पडला. चाकाचा शोध आणि अग्नीवर नियंत्रण मिळविण्याची क्षमता या दोन गोष्टींमुळे मानवाच्या आकांक्षा गगनाला भिडल्या.

नवपाषाण युगातील क्रांतीने, भटके मानवी जीवन स्थिर होऊन कृषीकेंद्रित समाजाकडे वाटचाल सुरू झाली. ओबडधोबड नांगर, जमिनीत पाट खोदून सिंचन… या त्या वेळच्या तांत्रिक नवकल्पनांनी, संक्रमणाला चालना दिली. याचा अन्न उत्पादन आणि लोकसंख्या वाढीस हातभार लागला. अन्नसाठा वाढल्यामुळे समाजाच्या मूलभूत गरजांची पूर्तता होऊन जीवन सुखकर करण्याच्या प्रयत्नांमुळे गुंतागुंतीच्या, श्रेणीबद्ध संरचनेसह समाजांची स्थापना झाली. उदाहरणार्थ, मेसोपोटेमियामध्ये, टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या अनियमित पुरांमुळे प्रगत सिंचन तंत्राची गरज भासली. कालवे, बंधारे आणि जलाशयांची निर्मिती केवळ कृषी उत्पादकतेस चालना देत नाही; तर संघटित श्रम आणि केंद्रीकृत प्रशासनाची गरज निर्माण करून राज्य निर्मितीची पायाभरणीही करते. जलसंपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता उर आणि बाबेलसारख्या मेसोपोटेमियन शहर-राज्यांच्या राजकीय उदयासाठी महत्त्वाचा घटक ठरला.

C P Radhakrishnan emphasized combining education technology and research for developed agricultural sector
अकोला : ज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची जागतिकस्तरावर मोठी झेप, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
The helmet
२४५० वर्षे जुन्या अस्सल सोन्याच्या शिरस्त्राणाची चोरी; का आहे हे शिरस्त्राण महत्त्वाचे?
Colonial hegemony through technological superiority
तंत्रकारण: तांत्रिक श्रेष्ठतेतून वसाहती वर्चस्ववाद
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?

अवजारांपासून शस्त्रांकडे…

धातुशास्त्रातील प्रगतीमुळे, विशेषत: कांस्य आणि नंतर लोखंडाच्या वापरामुळे, युद्धनीती आणि राज्यव्यवस्थेत एक मोठी क्रांती झाली. कांस्याच्या तुलनेत लोखंड अधिक मजबूत, टिकाऊ आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे लोखंडी शस्त्रांची निर्मिती खूप वेगाने झाली. हिटाइट या अॅनाटोलियातील (सध्याचे तुर्की) प्रभावशाली साम्राज्याने लोखंड वितळवण्याच्या आणि शस्त्रांमध्ये रूपांतर करण्याच्या तंत्रात प्रावीण्य मिळवले होते. लोखंडी तलवारी, भाले आणि रथांनी त्यांची लष्करी ताकद वाढवली. या अत्याधुनिक शस्त्रसामग्रीमुळे त्यांनी मेसोपोटेमिया आणि लेव्हँटसारख्या पश्चिम आशियातील मोठ्या भूभागांवर सत्ता मिळवली. या तांत्रिक प्रगतीने हिटाइट साम्राज्याला केवळ लष्करीच नव्हे तर राजकीय व आर्थिक क्षेत्रातही वर्चस्व प्रस्थापित करण्यास मदत केली. नागरी क्रांतीच्या काळात (इ.स.पूर्व ५००० ते ३०००) शहरांच्या उदयाला बांधकाम, वाहतूक आणि उत्पादन क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीचा हातभार लागला. शहरे ही नवसर्जनाची केंद्रे बनली, त्यातून गुंतागुंतीच्या राजकीय आणि प्रशासकीय प्रणालींची निर्मिती झाली. हडप्पा मोहेंजोदाडो येथील भव्य बांधकाम प्रकल्प हे प्राचीन शहरी समाजांच्या तांत्रिक आणि संघटनात्मक क्षमतांचा परिचय देतात. या विशाल शहर संकुलांसाठी केवळ प्रगत अभियांत्रिकी कौशल्यच नव्हे तर एक सुव्यवस्थित मजूरशक्ती आणि संसाधनांचे सुयोग्य व्यवस्थापन आवश्यक होते. अशा प्रकल्पांनी सत्ताधाऱ्यांना सत्तेचा खुंटा बळकट करण्यास वाव मिळाला आणि सत्ता त्यांच्या अधिकार आणि धार्मिक निष्ठेचे प्रतीक बनली. अधिक उत्पादन कौशल्यामुळे व्यापाराची कला लोकांना अवगत झाली. व्यापार विस्तारामुळे तांत्रिक ज्ञान आणि नवकल्पनांचे आदानप्रदान सुलभ झाले. धातू, कापड आणि मौल्यवान वस्तूंच्या मागणीमुळे व्यापारी मार्गांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. कांस्ययुगातील विविध राजवटींनी भूमध्य समुद्रावर विस्तृत सागरी व्यापारजाळे निर्माण केले. कांस्यनिर्मितीसाठी अत्यावश्यक असलेल्या कथलासारख्या संसाधनाच्या देवाणघेवाणीतून त्यांची तांत्रिक आणि लष्करी क्षमता टिकून राहिली. उत्कृष्ट जहाजबांधणी आणि दिशादर्शन कौशल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फोनिशियन लोकांनी तांत्रिक नवकल्पना प्रसारित करण्याबरोबरच विविध प्रदेशांमध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

तांत्रिक प्रगतीची परिणीती नेहमीच राजकीय मजबुतीकरणासाठी झाली आहे, कारण नवकल्पनांचा प्रभावी उपयोग करणाऱ्या शासकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर लक्षणीय मात करता आली. रस्ते, किल्ले आणि जलवाहिन्यांसारख्या पायाभूत सुविधा उभारणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे मोठ्या साम्राज्यांच्या प्रशासन व संरक्षणासाठी अत्यावश्यक होते. रोमन साम्राज्याच्या अभियांत्रिकी आणि बांधकाम तंत्रज्ञानातील प्रावीण्य हे त्यांच्या भू-राजकीय यशाचे मुख्य कारण होते. जगप्रसिद्ध एपियन मार्गासारख्या रस्त्यांच्या बांधकामामुळे सैन्याच्या जलद हालचाली आणि साम्राज्याच्या कार्यक्षम प्रशासनाला चालना मिळाली. शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांनी शहरीकरणाला गती दिली आणि गटारांमुळे सार्वजनिक आरोग्य सुधारले, ज्यामुळे रोमन समाज अधिक स्थिर आणि भक्कम बनला.

भारतीय राजकीय व्यवस्था व तंत्रज्ञान

भारतीय राज्यकर्त्यांच्या बाबतीत विचार करता, आर्य लोकांच्या भारतातील शिरकावानंतर लोखंडी आयुधांचा युद्धातील वापर वाढला आणि गो-पशुपालन केंद्रित समाज व्यवस्था उभी राहण्यास सुरुवात झाली. पुढल्या मौर्य, गुप्त वगैरे साम्राज्यांच्या अस्तित्वाला धक्के बसण्यात परकीय आक्रमकांच्या तंत्रज्ञानातील बदल हा फार मोठा घटक होता. ग्रीक, शक, हूण आणि कुशाण यांचा भारताच्या सामाजिक, राजकीय आणि लष्करी जीवनावर मोठा प्रभाव पडला; त्यामुळे प्रशासन, युद्धतंत्र आणि सांस्कृतिक एकात्मता यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडले. ग्रीक किंवा यवनांनी प्रगत नाणेमुद्रण तंत्र भारतात आणले. यामुळे आर्थिक व्यवस्था सुधारली आणि केंद्रीकृत प्रशासन सुलभ झाले. भारतीय वैज्ञानिक परंपरा समृद्ध करण्यास खगोलशास्त्र आणि गणितातील त्यांचे ज्ञानही उपयुक्त ठरले. तसेच, गांधार शैली आणि वास्तुकलेतील योगदानामुळे ग्रीक-भारतीय संस्कृतीचा अद्वितीय संगम घडून आला. युद्धतंत्राच्या बाबतीत, ग्रीकांनी दिलेले फॅलॅन्क्स तंत्र आणि दुर्ग भेदण्याची साधने यांची स्थानिक भारतीय सत्तांना अधिक प्रभावी बनवण्यात मदत झाली. (फॅलॅन्क्स ही एक व्यूहरचना असून, त्यामध्ये शस्त्रसज्ज पायदळ सैनिकांच्या गटाचा समावेश असतो. हे सैनिक खांद्याला खांदा लावून आघाडीवर उभे राहतात. फॅलॅन्क्सचा उद्देश हा विरोधकांवर एकत्रितपणे आणि मजबूत सामूहिक ताकदीने हल्ला चढवणे असतो. हा प्रकार ग्रीक युद्धतंत्रात अत्यंत प्रभावी मानला जात असे आणि पायदळाच्या संघटित हालचालींसाठी प्रसिद्ध होता.) शक हे मध्य आशियातील भटके लोक, भारताच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी अति-शुष्क भागात पाणी व्यवस्थापनासाठी प्रगत सिंचन तंत्रज्ञान आणले, त्यामुळे शेती उत्पादन वाढले आणि नागरीकरण रुंदावले. शकांच्या दिनदर्शिका आणि कालमापन क्षेत्रातील प्रगतीमुळे प्रशासन आणि सांस्कृतिक जीवनावर दीर्घकालीन प्रभाव पडला. युद्ध क्षेत्रात, शकांनी प्रगत घोडदळाचे तंत्र आणि धातुकाम कौशल्य आणले, त्यामुळे शस्त्रास्त्र आणि संरक्षण यांत मोठी सुधारणा झाली. भारतीय राजे हत्तींचा आणि घोड्यांच्या रथाचा वापर करत. त्या तुलनेत घोड्यांच्या थेट वापरामुळे हालचालींमध्ये चपळता आली. सिकंदर आणि भारतीय राजा पोरस यांच्या लढाईत युद्धाच्या आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे रणांगणात रथ कुचकामी ठरले, याचा फायदा सिकंदराच्या घोडदळाला झाला. घोड्याचा लगाम, खोगीर, सुरवारीसारखी वस्त्रे यांमुळे घोडेस्वारी सुलभ झाली. तलवारीपेक्षा हूणांच्या धनुष्य बाणासारख्या शस्त्रांचा प्रसार झाला कारण या तंत्रामध्ये सैनिकांच्या प्रत्यक्ष शारीरिक निकटतेची गरज नव्हती आणि हीच छुप्या आक्रमणाचीदेखील सुरुवात होती. ग्रीस ते भारत यांच्यातील दळणवळण सुलभ होऊन ‘रेशीम मार्गा’चा विकास झाला- तो युरोप ते चीनपर्यंतच्या संस्कृतींच्या देवाणघेवाणीतील दुवा ठरला.

प्राचीन काळाचा आढावा घेतल्यानंतर हे लक्षात आले की तंत्रज्ञान विकासाआधी मानवी जीवन हे मोठ्या प्रमाणावर असंघटित, उद्देशविहीन आणि दूरदृष्टीच्या अभावाचे होते. मानवी कौशल्यांच्या उत्कृष्टतेसाठी तंत्रज्ञान एक प्रभावी माध्यम बनले, त्याने सामाजिक-राजकीय परिवर्तनांना चालना दिली आणि विकासाचा मार्ग संरचित, परस्परसंलग्न जगाकडे वळवला. चाकाच्या शोधापासून ते धातुकामाच्या प्रावीण्यापर्यंत, तंत्रज्ञान हा मानवी उत्क्रांतीचा सततचा सोबती राहिला आहे. प्राचीन काळापासून तंत्रज्ञान कायमच मौल्यवान राहिले आहे मात्र २१ व्या शतकात जर यामध्ये बदल झाला असेल तर तो तंत्रज्ञानाच्या वेग आणि आवाक्याचा!

Story img Loader