‘पद्मश्री’ १९८८ मध्ये, ‘पद्मभूषण’२००३, तर ‘पद्मविभूषण’ २०१९ मध्ये- या किताबांच्या आधीच भारत सरकारने तीजनबाईंच्या गुणांची कदर केली होती. पॅरिसला १९८५ मध्ये झालेल्या ‘भारत उत्सवा’त तीजनबाईचा सहभाग होता आणि त्यानंतर लगेच १९८६ सालापासून त्यांना भिलाई पोलाद प्रकल्प या सार्वजनिक उद्योगात नोकरीही देण्यात आली होती… भिलाई परिसराच्या सुकन्येचा बहुमान इतकेच त्या नोकरीचे स्वरूप असल्याने, प्रत्यक्षात या प्रकल्पात कधी काम करण्याची वेळ तीजनबाईंवर आली नाही.
मात्र निर्धास्तपणे कलासाधना करण्याची सोय या नोकरीने केली. केंद्रात काँग्रेसी सरकार, त्यात १९८६ हे वर्ष तर ‘शाहबानो’ प्रकरणाच्या निकालानंतर मुस्लीम पुरुषसत्ता-धार्जिणा कायदा त्या सरकारने केल्याचे. पण सरकारी धोरणे लोककलेची कदर करणारी होती; म्हणून पांडवांची कथा गाणार्या तीजनबाईंना नोकरी मिळाली. तो काळ पाहिलेल्या तीजनबाईंना धर्माच्या नावावर दुही माजवणार्या राजकारणाबद्दल काय वाटते, या प्रश्नावर त्यांचे उत्तर कलेच्याच संस्कारातून आलेले होते- ‘महाभारत हा राजकीय संघर्षच आहे. पण सदाचार म्हणजे धर्म, हा संदेश त्यात आहे’!
पंडवानी म्हणजे पांडवांची कथा सांगणारी वाणी. पारधी वा अन्य भटक्या जमातींची ही कला मध्य भारतातल्या गोंड समाजाने आश्रय दिल्यामुळे टिकली. या पंडवानीची बैठ्या भजनासारखी वेदमती किंवा वेदान्ती शैली महिलांसाठी; तर उभे राहून कीर्तन (किंवा सोंगी भजन/ भारूड यांसारखी) सादर करण्याची कपालिक शैली ही पुरुषांची मक्तेदारी मानली जाई. पण आजोबा (आईचे वडील) ब्रिजलाल पारधी यांच्याकडे ही शैली शिकून, पंडवानीतला हा स्त्री-पुरुष भेद तीजनबाईंनी मिटवला. लग्नानंतर ‘गाणे बंद कर, तरच नांदायला ये’ ही सासरच्यांची अट न मानता, सामाजिक बहिष्काराची किंमत मोजून ही कला त्यांनी जोपासली.
जगायचे कसे, या प्रश्नालाही तोंड दिले. ‘दहा रुपयांच्या बिदागीपासून सुरुवात केली’, ‘पेज पिऊन दिवस काढायचे’ असे त्यांनी विविध मुलाखतींत सांगितले आहे. पण तीजनबाईंचे सादरीकरण (त्या वेळी मध्य प्रदेशचाच भाग असलेल्या) छत्तीसगढी लोककलांचाचा सांधा ‘नया थिएटर’शी जुळवू पाहणारे रंगकर्मी हबीब तन्वीर यांनी पाहिले आणि इंदिरा गांधींनाही ते पाहण्याची विनंती केली. यानंतरचा पंडवानीचा इतिहास तीजनबाईंनी घडवला. एकतारा घेऊन खड्या आवाजात तीजनबाई कथा सादर करत.
महाभारतातल्या द्रौपदी स्वयंवर, वस्त्रहरण, कीचकवध, दु:शासनवध, कुरुक्षेत्र, गीता उपदेश अशी आख्यानांची खुमारी भावनांना हात घालणार्या दोह्यासारख्या गाण्यांनी वाढत जाई. या भावना पोहोचवण्याचे काम फक्त गाण्यातून नव्हे तर निवेदनातून आणि थोडक्या संवादांतूनही होत असे. पण तीजनबाईंच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य आणखी निराळेही होते. कौरवांच्या अन्यायाबद्दल, धृतराष्ट्राच्या पक्षपाताबद्दल किंवा द्यूतामध्ये द्रौपदीलाच पणाला लावण्यासारख्या अतर्क्य निर्णयाबद्दल, ‘माझ्याच माणसांशी लढू कसा’ या अर्जुनाच्या प्रामाणिक प्रश्नाबद्दल फक्त ‘भावना पोहोचवणे’ एवढेच न करता योग्य वेळी बोलण्या/गाण्यात विराम (पॉज) घेऊन प्रेक्षकांकडे त्या पाहात… त्या नजरेत ‘अहो तुम्हीच जरा विचार करा…’ असे आवाहन असायचे. पंडवानीचे अनेक कलावंत (त्यांनीच सांगितलेली संख्या २१७) तीजनबाईंनी घडवले. पण आधुनिक भारताला या कलेची ओळख करून देण्यात पहिलेपणाचा मान एकट्या तीजनबाईंचाच. पंडवानी होत राहील, पण आता तीजनबाई नसतील.
