tehreek e labbaik pakistan party saad rizvi says quran in one hand nuclear bomb in other to threaten the world zws 70 | Loksatta

अन्वयार्थ : उद्ध्वस्त ‘धर्म’शाळा!

नाणेनिधीचे पथक सध्या पाकिस्तानात असून, पाकिस्तानला आणखी एक मदतनिधी किंवा बेलआउट देण्याविषयी वाटाघाटी गत सप्ताहाअखेपर्यंत सुरू होत्या.

अन्वयार्थ : उद्ध्वस्त ‘धर्म’शाळा!
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

‘तेहरीक- ए- लबैक’ या पाकिस्तानातील जिहादी संघटनेच्या कोणा रिझवी नामे म्होरक्याने नुकताच त्या देशावरील भीषण आर्थिक संकटावर मात करण्यासाठी एक नामी नुस्खा त्याच्या समर्थकांसमोर मांडला..  आणि सभा जिंकली! – ‘कशाला दुसऱ्या देशांसमोर आणि वित्तीय संघटनांसमोर जाऊन हात पसरता? त्याऐवजी एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घेऊन जगासमोर जा. पैशांच्या राशी पायाशी लोळतील आणि आपल्यावरील संकट चुटकीसरशी दूर होईल’! ठार विनोदी ठरतील अशी वक्तव्ये करणारी रिझवीसारखी रत्ने पाकिस्तानात विशेषत: खैबर पख्म्तूनख्वा प्रांतात उजळ माथ्याने फिरतात आणि त्यांच्या मतांना तेथे वजनही असते. या ‘तेहरीक- इ- लबैक’ संघटनेच्या मंडळींनी नुकतीच तेथील अहमदिया पंथीयांची मशीद जमीनदोस्त केली. ‘तेहरीक- ए- लबैक’ आणि ‘तेहरीक- ए- तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या दोन्ही संघटना अलीकडे पुन्हा चर्चेत येऊ लागल्या आहेत. पेशावरमध्ये नुकताच तेथील मुख्य पोलीस वसाहतीमधील एका मशिदीत १००हून अधिक नागरिक व पोलिसांचे प्राण घेणारा भीषण बॉम्बस्फोट झाला, त्याचे धागेदोरे टीटीपीपर्यंत येतात. खुद्द या संघटनेने स्फोटात आपला हात नसल्याचे (असा नकार खरे तर टीटीपीसाठी दुर्मीळच) म्हटले असले, तरी त्यांच्या सहभागाविषयी स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना खात्री वाटते.

टीटीपी हे तालिबानचे पाकिस्तानातील भावंड. ‘लष्कर- ए- तोयबा’, ‘जमात – उद – दावा’ या संघटना म्हणजे कोपऱ्यावरचे विचारकट्टे ठरावेत, इतकी टीटीपीची जहालत! आठ वर्षांपूर्वी पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये १३२ लहानग्या विद्यार्थ्यांसह १४९ जणांना कंठस्नान घालणारी हीच ती संघटना. त्या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने या संघटनेच्या म्होरक्यांना टिपून टिपून मारायला सुरुवात केली. परंतु पावणेदोन वर्षांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता फेरप्रस्थापित केली आणि टीटीपीचे भूराजकीय महत्त्व अचानक पुन्हा वाढले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीच सर्व संकेत आणि शहाणपण गुंडाळून टीटीपी आणि तेहरीक- ए- लबैकसारख्या संघटनांशी नव्याने बोलणी सुरू केली आणि त्यांना जणू राजमान्यता दिली. आता या दोन्ही संघटनांनी पाकिस्तानात आणखी उच्छाद मांडल्यास आश्चर्य वाटू नयेच. कारण पाकिस्तानचे विद्यमान सरकार गेल्या काही दशकांतील सर्वाधिक हतबल आणि रडके ठरलेले आहे. उद्ध्वस्त अर्थव्यवस्था हे प्रमुख कारण असले, तरी  शाहबाझ शरीफ यांचा राजकीय आणि बौद्धिक कमकुवतपणा हाही या घसरणीमागील निर्णायक घटक ठरला आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कशा जाचक अटी आमच्यावर लादत आहे, असा टाहोच ते फोडते झाले.

नाणेनिधीचे पथक सध्या पाकिस्तानात असून, पाकिस्तानला आणखी एक मदतनिधी किंवा बेलआउट देण्याविषयी वाटाघाटी गत सप्ताहाअखेपर्यंत सुरू होत्या. असे मदतनिधी अर्थातच सशर्त असतात आणि मदत स्वीकारण्याबाबत अटीशर्ती जाचक असतात. सरकारी खर्चात काटकसर करणे ही पहिली प्रमुख अट. खासगी उद्यमशीलता जवळपास नगण्य असलेल्या देशांसाठी ते दुहेरी संकट ठरते. त्यामुळे पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल सव्वादोनशेपार पोहोचले आहे. विजेच्या वापरात कपात करावी असे सरकारलाच सांगावे लागते. त्यामुळे बाजार, मॉल सायंकाळीच आवरावे लागतात. पाकिस्तानी रुपया डॉलरच्या (१ डॉलरसाठी २२५ पाकिस्तानी रुपये) आणि इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत रसातळाला पोहोचला आहे (भारतीय एक रुपया म्हणजे पाकिस्तानातील ३ रु. ३५ पैसे). चलनवाढ २५ टक्क्यांवर पोहोचली आहे. परकीय गंगाजळी चार अब्ज डॉलरच्याही खाली आलेली आहे. कर्जाची परतफेड नियमित होईलच, याविषयी कुणाला खात्री नाही. श्रीलंकेसारखी किंवा त्याहीपेक्षा अभूतपूर्व परिस्थिती पाकिस्तानवर ओढवेल असे सांगितले जाते. चीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, तुर्कस्तानसारखे मित्रदेश पाकिस्तानवर कदाचित तशी वेळ येऊ देणार नाहीत. परंतु त्यासाठी स्वतंत्र आणि अधिक जाचक अटी लादल्या जातील. या वर्षी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. विद्यमान सत्तारूढ आघाडीतील दोन पक्ष – पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी – ती एकत्र लढविण्याची शक्यता नाही. इम्रान खान यांचा तेहरीक- ए- इन्साफ पाकिस्तान हा पक्ष सत्तेवर येण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे.  त्याहीमुळे राजकीय अस्थैर्यात भर पडत आहे. इतके सगळे होत असताना, भल्याबुऱ्या सर्व मार्गानी नेहमीच पाकिस्तानवर भक्कम नियंत्रण ठेवणारे लष्कर नवीन प्रमुख आल्यामुळे पूर्वीइतके सुस्थिर नाही. या विस्कटलेल्या परिस्थितीत तेथील जिहादी गट सोकावणार हे नक्की. वर्षांनुवर्षे या देशाची ‘धर्म’शाळा बनलेलीच होती. ती उद्ध्वस्त झाल्यामुळे हा संपूर्ण टापूच अधिक धोकादायक बनला आहे, जे भारतासाठी कमी चिंताजनक ठरत नाही.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 03:44 IST
Next Story
लालकिल्ला : ‘सूटबूट की सरकार’चा डाग गडद