अहो, थलपती! पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक विजय मिळाला म्हणून उगीच हुरळून जाऊ नका. सत्ताकारण करतानाचे संवाद आणि सिनेमातील संवाद यात जमीन अस्मानचा फरक आहे, हे आधी लक्षात घ्या. तिथले पटकथाकार वेगळे. ते मोबदला घेऊन हवे तसे संवाद लिहून देतात. इथे तसे नाही. राजकारणात कोण कुणाची पटकथा लिहील व कोण कुणाला अडचणीत आणेल हे अनेकदा कळतही नाही. तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंदच आहे पण मीच सत्ताकेंद्र, उजवीकडे, डावीकडे, मागे-पुढे असे काहीच नसेल हे तुमचे वाक्य विजयाचा उन्माद दर्शवणारे. मुख्यमंत्री म्हणजे सिनेमाचा नायक नाही. आजवर तुमचे नायकपण खपून गेले. तीन तासांच्या चलचित्रातल्या समस्या चुटकीसरशी सोडवता येणे सोपे. कारण नायक कधी हरत नसतो. मात्र राजकारणाचे तसे नाही. इथे लोक ज्या वेगाने डोक्यावर घेतात त्याच वेगाने खाली आपटतात. एमजीआर, करुणानिधी, जयललिता यांचे पराभव ठाऊक आहेत ना तुम्हाला? नसेल तर इतिहासाची पाने चाळा ! सत्ताकारण वास्तवातल्या सिनेमासारखे असते. अशी डायलॉगबाजी तिथे चालत नाही. तुमच्या टीममधील सर्वांनी चांगली कामगिरी केली तरच तुम्ही यशस्वी ठरता. ती करण्यासाठी जे जे पदावर आहेत त्यांना लोककल्याणाचे अधिकार हवेत. मीच सत्ताकेंद्र असे म्हणून तुम्ही तुमच्याच सहकार्‍यांची अवस्था दात नसलेल्या वाघांसारखी कराल तर अपयश पक्के समजा.

नायक मी, मग माझी नायिका कोण, साहाय्यक नायक व खलनायक कोण हे मीच ठरवणार हे सिनेमापुरते ठीक. इथे तुम्ही जे सहकारी निवडले त्यांना वास्तवातला अभिनय कसा करायचा हे सांगत बसू नका. त्यांनाही त्यांच्या त्यांच्या खात्याचे नायक होऊ द्या की जरा! सध्या ते सारे नवखे आहेत म्हणून तुमचे सत्ताकेंद्र खपवून घेतील. एकदा का त्यांना सत्तेची चटक लागली की तेही लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होतील. नेमके हेच तुम्हाला नकोय का? तसे असेल तर तुमच्या नवजात पक्षात बेदिली ठरलेली हे ध्यानात ठेवा. कारण त्यांच्यावर एक मोठा राष्ट्रीय पक्ष डोळा ठेवून बसलाच आहे. आजवर तुम्ही अनेक पटकथाकारांबरोबर बैठका केल्या असतील पण राजकारणात तुम्हाला यशस्वी करण्यासाठी कारणीभूत ठरणार्‍या प्रशासनाची पटकथा कुणीच ऐकवली नसेल. ती आहेच गुंतागुंतीची. राजकारणातले नायकपण हे सर्वांच्या साथीने सिद्ध होत असते. सध्या तुमच्या ‘गोट’ सिनेमातील एक चित्रफीत प्रचंड व्हायरल होतेय. त्यात तुमच्या वाहनाचा क्रमांक टीएन-सीएम-२०२६ असा आहे. याच्याच प्रेमात पडून लोकांनी बसवले तुम्हाला खुर्चीवर. आता त्यांना बसणारे वास्तवातले चटके दूर करण्यासाठी ‘मी तुमच्यातलाच’ म्हणून काम करावे लागेल. त्यासाठी भाषा सौजन्याची हवी, अहंकाराचा दर्प येणारी नको.

सत्ताकेंद्र न बोलता निर्माण करायचे असते. विजय मिळवल्यावर राज्यपालांनीच तुम्हाला पहिला झटका दिलाच ना! राजकारण ही अडथळ्याचीच शर्यत असते. तेव्हा यातून सावध व्हा व लोकप्रिय होण्यासाठी अशी संवादफेक करू नका. तुम्हाला विजय अजूनही स्वप्नवत वाटत असेल तर काहीही बोलण्यापूर्वी एकदा अंगाला चिमटा काढा. भानावर येण्यासाठी अशी कृती केव्हाही चांगली.