काशीनाथ नारायण साने (आणि जनार्दन मोडक) यांनी ‘काव्येतिहाससंग्रह’ या नियतकालिकाच्या माध्यमातून मराठी साहित्याची, संस्कृतीची आणि पर्यायाने महाराष्ट्रीय समाजाची जी सेवा केली, तिचा अगदी संक्षिप्त आढावा घेण्यापूर्वी एक महत्त्वाची नोंद कृतज्ञतापूर्वक करायला हवी आणि ती म्हणजे ‘राज्य मराठी विकास संस्थे’द्वारे प्रतिमुद्राधिकाराची म्हणजेच कॉपीराइटची मुदत संपलेेले जुने दुर्मीळ ग्रंथ व नियतकालिकांचे अंक महाजालावर उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळेच अभ्यासकांना ‘काव्येतिहाससंग्रह’सारख्या नियतकालिकांचा धांडोळा घेणे सहज शक्य झाले आहे. अर्थात राज्यामधील अनेक जुन्या ग्रंथालयांच्या संदर्भविभागांचाही त्या श्रेयात सिंहाचा वाटा आहे.

का. ना. साने यांनी ‘काव्येतिहाससंग्रहा’मधून प्रसिद्ध केलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये शिवपूर्वकालीन लेख फारसे आढळत नाहीत. ‘कैफियत शहाजी महाराज भोसले यांची…’ या शीर्षकाचा जो प्रदीर्घ दस्तऐवज छापलेला आढळतो, त्यात शिवपूर्वकालीन काही घटनांचा व शहाजीराजांच्या समकालीन काही व्यक्तींचा उल्लेख आढळतो. इतर बरेचसे लेख हे शिवकालीन आणि उत्तरकालीन आहेत. छोटी छोटी पत्रेदेखील आहेत, त्याचप्रमाणे कोल्हापूरकर संभाजी व शाहूराजे यांनी परस्परांच्या मुलखांच्या हद्दी ठरवून घेतल्या, त्या तहनाम्यांचाही या संग्रहात समावेश केेलेला आढळतो. याशिवाय साने यांनी केलेेले महत्त्वाचे दखलपात्र काम म्हणजे जुन्या बखरी शोधून काढून त्यांच्यावर संपादकीय संस्कार करणे आणि मग त्यांचे प्रकाशनही करणे.

बखर हा एक मध्ययुगीन महाराष्ट्राने घडवलेला विशेष वाङ्मयीन अलंकार आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. शिवकाल उदयाला येण्यापूर्वीची वाङ्मयनिर्मिती गद्यापेक्षा पद्याचे माध्यम अधिक वापरून होत असे. शिवाय प्रारंभापासून धार्मिक वळण मिळाल्यामुळे काही लिहायचे असेल, तर ते धार्मिक-आध्यात्मिक असायला हवे, अशी एक पक्की मानसिकताच निर्माण झाली. यादवकाळात महानुभाव पंथीयांनी गद्याचा वापर केला खरा; पण ते गद्यही धार्मिक-आध्यात्मिक आशयाशीच जोडले गेलेेले होते. शिवकालात आणि नंतरही महाराष्ट्रात जे पराक्रमाचे, स्वाभिमानाचे, वीरश्रीचे, हौतात्म्याचे विविध आविष्कार दिसले, त्यामुळे भारतभर महाराष्ट्राला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली. या मातीतल्या विजिगीषू स्त्री-पुरुषांनी गाजवलेल्या कर्तृत्वाचे चित्र रेखाटण्यासाठी गद्याचा नव्याने वापर करण्यात येऊ लागला. हे नव्या स्वरूपातले गद्य धार्मिक-आध्यात्मिक नव्हते, तर ते चक्क ऐहिकतेकडे झुकलेेले होते. त्याची नाळ जोडलेली होती, ती प्राचीन काळातल्या पुराणलेखनाशी. प्राचीन काळात कर्तबगार व्यक्तींनी जसे काही पराक्रम केले, आंतरिक सामथ्र्याच्या बळावर जशी विलक्षण कृत्ये करून दाखवली, तशाच प्रकारच्या गोष्टी अलीकडच्या काळात कोणी कोणी कसकशा केल्या, हे सांगण्याचा हेतू ठेवून जो नवा वाङ्मयप्रकार उदयाला आला, तो ‘बखर’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

बखर या वाङ्मयप्रकाराची यापुढेही अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भांत चर्चा करावी लागणारच आहे; तथापि या टप्प्यावरच एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. कोणतीही बखर ऐतिहासिक दृष्टीने शंभर टक्के खर्‍याखुर्‍या वर्णनांनीच सजलेली असते, असे मानणे चुकीचे ठरेल. बखर म्हणजे नेमके काय, याबद्दल विविध अभ्यासकांनी व्यक्त केलेली भिन्न मते नंतर यथावकाश विचारात घेता येतील; तूर्त फक्त शिवकाळामध्ये फारसी-अरबी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द देणारा जो ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्यात आला होता, त्यातले वर्णन प्रमाण मानून पुढे जाऊ या. त्या कोशात ‘आख्यायिका बखर’ असे नेमके वर्णन करण्यात आले आहे.

बखर म्हणजे आख्यायिका. ऐतिहासिक थोर पुरुषांच्या व प्रसिद्ध घटनांच्या संदर्भात समाजमनात रूढ असणार्‍या सर्वसामान्य आख्यायिका म्हणजे बखर. काही वेळा बखरीचा लेखक प्रसंगाचे वर्णन करताना कल्पनाविलासाला रान मोकळे सोडतो, असे प्रत्यक्ष दस्तऐवजातील तथ्याशी ताडून पाहता जाणवते. त्यामुळे सरसकट बखरीतील वर्णनावर विसंबून चालत नाही. आणि तरीही इतिहासाच्या आकलनाचे एक साधन म्हणून बखरवाङ्मयाचे महत्त्व अबाधितच राहते आणि त्यामुळेच त्या क्षेत्रातील साने यांच्या कार्याचेही!

आनंद हर्डीकर