मानवाच्या उत्क्रांतीचे मूळ त्याच्या सतत उत्कृष्ट ते साध्य करण्याच्या ध्यासात दडले आहे. एक टप्पा गाठल्यावर माणसाला कायम पुढचा पल्ला खुणावत राहिला आणि त्यातूनच त्याची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात माणसाने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम प्रस्थापित केले. पण या प्रत्येक विक्रमाच्या उच्चांकाला कालमर्यादेचा शाप आहे. विक्रम हा मोडण्यासाठीच असतो. नवा विक्रम तयार झाला की आधीचा काळाच्या पडद्याआड जातो. याला अपवाद एकच – पहिला असण्याचा. कोणत्याही क्षेत्रात जी व्यक्ती पहिल्यांदा जी सरस कामगिरी करते, तिचे नाव इतिहासाच्या पानांवर कायमचे कोरले जाते. याच सर्व भारतातील पहिल्यांची माहिती ‘इंडियाज बुक ऑफ फर्स्ट्स’ या पुस्तकात मिळते. ही माहिती वाचताना विविध क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा इतिहासही आपल्या नजरेसमोरून सरकत राहतो.

भारताच्या इतिहासातील अशा पहिल्या घटनांचा, व्यक्तींचा आणि निर्णयांचा संक्षिप्त व नेमका आढावा घेऊन वाचकांसमोर मांडण्याचे काम ‘इंडियाज बुक ऑफ फर्स्ट्स’ करते. या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची सोप्या भाषेतील, मुद्देसूद मांडणी. राजकारण, प्रशासन, स्वातंत्र्य चळवळ, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, संरक्षण, क्रीडा, महिला सक्षमीकरण, न्यायव्यवस्था, कला-संस्कृती, क्रीडा, ग्रंथालये आणि संग्रहालये, माध्यमे आणि संवाद, पुरस्कार अशा विविध क्षेत्रांतील ‘पहिल्या’ कामगिरींची माहिती एका ठिकाणी एकत्रितपणे दिल्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. सुमारे एक हजारांवर ‘पहिले’ यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे भारताच्या प्रगतीचा आलेख वाचकांसमोर स्पष्टपणे उलगडतो. प्रत्येक क्षेत्रानुसार माहिती संकलित करण्यात आली आहे. मथळा आणि त्या विषयाचा लहानसा परिच्छेद अशी रचना आहे. जिथे शक्य तिथे छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. मुख आणि मलपृष्ठाची रचना निहार आपटे यांनी केली आहे. पुस्तकातील माहिती बहुतेक वेळा मुद्देसूद, प्रश्नोत्तर किंवा यादी स्वरूपात असल्याने ती लक्षात ठेवण्यास सोपी जाते. कोणताही फापटपसारा यात नाही आणि भाषा अतिशय सोपी आहे. अगदी थोडक्यात आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात माहिती देण्यात आली आहे.

यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बँकिंग अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांना संदर्भासाठी, उजळणीसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. कमी वेळेत अधिक माहिती मिळवून देणारा हा एक प्रभावी संदर्भग्रंथ आहे. यातून भारताचा इतिहास व प्रगती झटपट समजून घेता येते. इतिहासाचे केवळ तपशीलवार वर्णन न करता, ‘पहिली पायरी’ या दृष्टिकोनातून घटनांकडे पाहण्याची दृष्टी हे पुस्तक देते. त्यामुळे सामाजिक बदल, प्रशासकीय सुधारणा आणि राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होते. पुस्तक वाचताना घटनांचा कालक्रम, निर्णयांची पार्श्वभूमी आणि त्यांचे दूरगामी परिणाम यांची स्पष्ट जाणीव होते. विविध क्षेत्रांतील घडामोडींचा अभ्यास करताना प्रशासकीय धोरणे, सामाजिक सुधारणा आणि संस्थात्मक विकास यांचा परस्पर संबंध उलगडत जातो. त्यामुळे ही माहिती केवळ स्मरणासाठी नाही, तर विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीही उपयुक्त ठरते. अभ्यासक्रमाशी निगडित मुद्द्यांची उजळणी आणि तथ्यांची अचूक मांडणी करण्यात आली आहे.

भारतातील काही निवडक ‘पहिले’

  • पहिली महिला पदवीधर : कादंबिनी गांगुली-बोस आणि चंद्रमुखी बसू या कलकत्ता विद्यापीठातून १८८३ मध्ये बीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि देशातील पहिल्या महिला पदवीधर ठरल्या.
  • पहिली हाऊसबोट : ‘व्हिक्टरी’ नावाची हाऊसबोट काश्मीरच्या दाल तलावात १८८८ मध्ये बांधण्यात आली.
  • पहिली सिनेमालिका : ‘पाटणकर फ्रेंड्स अँड कंपनी’ची चार भागांची मालिका ‘राम बनवास’ १४ सप्टेंबर १९१८ ला प्रदर्शित झाली. तिचा प्रत्येक भाग काही आठवडे चालला.
  • पहिली ॲनिमेटेड फिल्म : ‘ऑन अ मूनलिट नाइट’ (१९३४) हा भारतातील पहिला ॲनिमेटेड (आवाज असलेला) चित्रपट आहे.
  • पहिले आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन : १८ मार्च १९७२ रोजी दिल्लीतील प्रगती मैदानात भरविण्यात आले होते.
  • पहिले कुटुंब न्यायालय : कुटुंब न्यायालय कायदा १९८४ लागून झाल्यानंतर १९८९ मध्ये राजस्थान राज्याने पहिले कुटुंब न्यायालय उभारले.
  • पहिले पूर्ण सेंद्रिय राज्य : सिक्कीम हे १८ जानेवारी २०१६ साली भारताचे पहिले पूर्णत: सेंद्रिय राज्य ठरले.