पार्थ एम. एन.

‘द फाइल’ या वेबसाइटनं कर्नाटकामधल्या भ्रष्टाचाराचीप्रकरणे बाहेर काढली आणि ‘द न्यूज मिनिट’ने तेथील वाढत्या धर्माधतेवर लक्ष केंद्रित केले..

International Country Relations in Electoral Politics
लेख: निवडणुकीच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय संबंध!
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
indian constitution to
संविधानभान: एकलव्याच्या अंगठय़ाचे रक्षण
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी

गेल्या आठवडय़ात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला हरवून २२४ आमदारांच्या सभागृहात काँग्रेसने तब्बल १३६ जागा जिंकल्या. १९८९ नंतर एवढं यश या राज्यात कोणत्याही पक्षाला मिळालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक सभा घेतल्या, रोड शो केले, पण तरीही भाजपला ६५ जागांच्या वर मजल मारता आली नाही.

निवडणुकीचा प्रचार करताना काँग्रेसने राज्यातल्या भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रित केलेलं होतं. आणि ते स्वाभाविकही म्हणायला हवं, कारण भाजप सरकारच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीला आली होती.

मात्र, कर्नाटकामधल्या भ्रष्टाचाराच्या ज्या अनेक प्रकरणांवर काँग्रेसने हल्ला चढवला त्यातली बहुतेक प्रकरणं बाहेर काढली होती ‘द फाइल’ या वेबसाइटनं. जी. महन्तेश यांनी स्थापन केलेली ही स्वतंत्र वेबसाइट. महन्तेश सुरुवातीला मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधून काम करत. पण बहुधा मनासारखं काम करता येत नाही म्हणून त्यातून ते बाहेर पडले आणि शोध पत्रकारिता कशी करावी याचं उत्तम उदाहरण ‘द फाइल’मधल्या आपल्या कामातून त्यांनी तरुण पत्रकारांसाठी घालून दिलं.

एप्रिल आणि ऑगस्ट २०२०च्या दरम्यान, ‘कोविड-१९’ चा धुमाकूळ चालू असताना औषधं आणि वैद्यकीय उपकरणं खरेदी करण्यात कर्नाटकामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झालेला होता. यासंबंधीच्या ५० बातम्या ‘द फाइल’ने प्रसिद्ध केल्या. यात कोविडबाधितांकडून अवाजवी फी आकारणाऱ्या अनेक नावाजलेल्या हॉस्पिटलांचाही समावेश होता.

सन २०२२ च्या उत्तरार्धात कर्नाटकामधल्या शिक्षकांच्या भरतीमध्ये झालेल्या प्रचंड गैरव्यवहाराबद्दल त्यांनी एक मालिकाच लिहिली. राज्यात कित्येक वर्ष अनधिकृतपणे नोकरीवर ठेवलेले अनेक शिक्षक कार्यरत असल्याचं निरीक्षण त्यात होतं. या मालिकेमुळे शिक्षण विभागाशी संबंधित ६१ शिक्षक, दोन संचालक, तीन निवृत्त साहाय्यक संचालक, एक प्रथम श्रेणीचा साहाय्यक आणि एक कॉम्प्युटर प्रोग्रॅमर यांना अटक करण्यात आली.

नोव्हेंबर २०२२ मध्ये महन्तेश यांनी याच मालिकेचा फॉलोअप घेत आणखी एक स्टोरी केली. अटक झालेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाला पुन्हा एकदा त्याच्या पदावर घेण्यात येणार आहे अशा अर्थाची ती स्टोरी होती. या बातमीला पुष्टी देणारी कागदपत्रं पुराव्यादाखल त्यांनी दिलेली होती. स्टोरी प्रसिद्ध झाली आणि काही आठवडय़ांनी त्यांना पोलिसांकडून नोटीस मिळाली. ही माहिती तुम्हाला कोणाकडून मिळाली आहे, तुमच्या स्टोरीचा सोर्स कोण आहे, ते सांगा अशी धमकी देणारी ही नोटीस होती. महन्तेश यांनी अर्थातच या नोटिशीला भीक घातली नाही, आपल्या बातमीवर ते ठाम राहिले.

निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ‘द फाइल’ने तोवर केलेल्या अशा १३० स्टोरीजची एक यादीच आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली. यातल्या बहुतेकांकडे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी दुर्लक्ष केलेलं होतं. मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी आणखीही काही गोष्टी लोकांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. उडुपीमध्ये भाजपने यशपाल सुवर्णा नावाच्या एका गोरक्षकाला तिकीट दिलं होतं. उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये सुवर्णाची लोकप्रियता वाढायला सुरुवात झाली ती २००५ पासून. कर्नाटकाच्या किनारी भागात त्यानं एका जमावाचं नेतृत्व करत दोन मुसलमान मेंढपाळांवर हल्ला केला, त्यांचे कपडे फाडले आणि त्यांची िधड काढली होती. तेव्हापासून सुरू झालेल्या त्याच्या गोरक्षणाला भाजपने अशा प्रकारे ‘सन्मानित’ केलं होतं.

भ्रष्टाचाराच्या बरोबरीनं धर्माधता हाही कर्नाटकच्या निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा होता. गेल्या दोन वर्षांमध्ये या संदर्भातल्या अनेक घटना कर्नाटकामध्ये घडलेल्या होत्या. हिजाब घातलेल्या तरुण मुलींना वर्गामध्ये यायला बंदी करून शिक्षणाच्या त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणे ही त्यातलीच एक घटना. याचे भयंकर परिणाम बघायला मिळाले. हिजाबने निर्माण झालेल्या वादंगामुळे उडुपी जिल्ह्यातल्या पदवी महाविद्यालयांमधल्या किमान २३२ आणि पीयू (प्री युनिव्हर्सिटी) महाविद्यालयांमधल्या १८३ मुली वर्गात गेल्या नाहीत. त्यांना परीक्षांना बसता आलं नाही.

या दोन्ही महत्त्वाच्या बातम्या दिल्या त्या प्रज्वल भटने. ‘द न्यूज मिनिट’ या स्वतंत्र वेबसाइटसाठी प्रज्वल काम करतो. ज्येष्ठ पत्रकार धन्या राजेंद्रनने सुरू केलेल्या या वेबसाइटमध्ये तिने अशा अनेक तरुण, उत्साही पत्रकारांना एकत्र जमवलं आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘द न्यूज मिनिट’ने निवडणुकीशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची स्टोरी प्रसिद्ध केली. बंगळूरुस्थित उद्योगपती रविकुमार कृष्णप्पा यांनी स्थापन केलेल्या चिलुमे ट्रस्टने बंगळूरुमधल्या मतदारांची माहिती खोटेपणाने मिळवली होती. आपल्या फील्ड एजंट्सना त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून लोकांकडे पाठवलं आणि ही माहिती जमा केली असं त्या स्टोरीत म्हटलं होतं. मतदारांची माहिती अशा प्रकारे या ट्रस्टला चोरता आली कारण त्याला अनेक सरकारी आदेशांचं पाठबळ होतं. या आदेशांमुळेच एका खासगी ट्रस्टला मतदारांच्या अधिकारांविषयी ‘जागरूकता’ निर्माण करण्याच्या नावाखाली खासगी माहिती गोळा करणं शक्य झालं!

मतमोजणीच्या दिवशी ‘द न्यूज मिनिट’ने ‘द वायर’, ‘कॅराव्हान’, ‘न्यूजलाँड्री’ आणि ‘स्क्रोल’ या इतर स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या माध्यमांसह एकत्र येऊन निवडणूक विश्लेषणाचा कार्यक्रम केला. मुख्य प्रवाहातल्या टीव्ही चॅनेल्सवर चाललेल्या आरडाओरडय़ाच्या तुलनेत इथली चर्चा अतिशय संतुलित आणि शांतपणे होत होती. गंमत म्हणजे, मुख्य प्रवाहातल्या टीव्ही चॅनेल्सवर संध्याकाळपर्यंत कर्नाटकाचे निवडणूक निकाल मागे पडून उत्तर प्रदेशातल्या पालिका निकालांची चर्चा होऊ लागली होती, तिथे भाजपने कशी चांगली कामगिरी केली आहे हे सांगितलं जात होतं.

निवडणूक निकालानंतर तीन दिवसांनी टीव्ही चॅनेल्सवर काँग्रेसला मुख्यमंत्र्यांची निवड करता येत नसल्याची ओरडसुद्धा सुरू झाली. लक्षात घ्या, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवस महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालेलं नव्हतं. उत्तर प्रदेशातल्या २०१७ च्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपने साधारण दोन आठवडय़ांनी योगी आदित्यनाथ यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं होतं. पण या टीव्ही चॅनेल्सनी तेवढा विचार करणं अपेक्षितच नव्हतं.

या तुलनेत, ‘द फाइल’ आणि ‘द न्यूज मिनिट’ यांनी कोणताही आव न आणता, निंदानालस्ती न करता कागदपत्रांचे पुरावे देत वार्ताकन केलं.

सर्वसाधारणपणे या सदरात माझा भर पर्यायी माध्यमांत काम करणाऱ्या तरुण पत्रकारांविषयी लिहिण्यावर असतो. महन्तेश आणि राजेंद्रन त्या अर्थाने ‘तरुण पत्रकार’ नाहीत. पण त्यांच्यासारखे पत्रकार तरुण पत्रकारांनी कसं काम करायला हवं याचे धडे घालून देताहेत. आपल्या कामातून त्यांना मार्ग दाखवत आहेत. आणि तेही तितकंच महत्त्वाचं आहे.

बहुतेक मोठे पत्रकार आपल्या यशाचं श्रेय त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात भेटलेल्या आणि मार्गदर्शन केलेल्या मेन्टॉरना देतात. ‘द ब्लिट्झ’मध्ये काम करत असताना रुसी करंजियांनी केलेल्या संस्कारांविषयी पी. साईनाथ आवर्जून सांगत असतात. डॉ. प्रणय रॉय नसते तर पत्रकारितेत आपण जे साध्य केलं ते करू शकलो नसतो असं रवीश कुमार सातत्यानं बोलत असतात.

महन्तेश आणि राजेंद्रन यांच्यासारखे पत्रकार आहेत तोवर तरुण पत्रकारांना नेहमीच आशा वाटत राहील. कर्नाटकाच्या निवडणूक निकालाची दिवसभर चर्चा केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सुगाता श्रीनिवासराजू आणि महन्तेश यांच्यामध्ये एक गमतीशीर देवाणघेवाण झाली. तुमच्या कामाचा जो परिणाम कर्नाटकाच्या निवडणुकांवर झाला त्यामुळे तुम्ही खूश आहात का, असा प्रश्न सुगाताने महन्तेशना विचारला. त्यांचं उत्तर म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात खरंच काही तरी करू इच्छिणाऱ्या पत्रकारांसाठी एक पाठ आहे. ते म्हणाले, ‘आता काँग्रेसच्या विरोधातल्या बातम्या द्यायला मी सज्ज झालोय. ‘द फाइल’ हा कायमस्वरूपी विरोधी पक्ष आहे.’

लेखक ‘पारी’साठी काम करतात.

ट्विटर :@parthpunter