आपल्या देशातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी चीन आजूबाजूच्या देशांसह भारताचाही घास घेतो, तेव्हा काय होते, हे दर्शवणार्या डिस्टोपियन कादंबरीविषयी… येत्या दशकभरात भयंकर युद्धाची शक्यता आणि त्यात ईश्वरी हस्तक्षेप, हे मुख्य कथासूत्र घेऊन मेघना पंत यांनी ‘द मॅन हू लॉस्ट इंडिया’ ही कादंबरी लिहिली आहे. यात पाण्यासाठी आजूबाजूच्या देशांचा घास घेणारा चीन अखेर भारतालाही गिळंकृत करतो. भारताची बरीच जीवितहानी होते. त्यानंतर सामान्य माणसाच्या जीवनात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक बदल होतात आणि ते कसे थोपवले जातात याचे चित्रण पुस्तकात आहे. प्रकाशकांनी ‘ब्लर्ब’मध्येच ही डिस्टोपियन कादंबरी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कथेतील गडदपणा अपेक्षित आहे, लिखाण कल्पक आहे पण पुरेसे रंजक नाही.
तिसरे महायुद्ध झालेच तर पाण्यासाठी होईल, असा इशारा तज्ज्ञ अधूनमधून देत असतात. तोच धागा कथेची सुरुवात करण्यासाठी पकडला आहे. कादंबरीचा काळ सुरू होतो २०३२पासून. चीनमध्ये दुष्काळ पडला आहे. आपली तहान भागवण्यासाठी त्यांना जगातील जास्तीत जास्त पाण्यावर ताबा हवा आहे. त्यासाठी आधी तिबेट आणि नंतर भारतावर कब्जा करण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. त्यांनी भारतावर आक्रमण करून जगातील ६० ते ७० टक्के पाण्यावर हक्क प्रस्थापित केला आहे. सर्वशक्तिमान चीनने जवळपास संपूर्ण भारत पादाक्रांत केल्यानंतरही पंजाबमधील लालबाग हे लहानसे शहर महादेवाच्या सक्रियतेमुळे आपले अस्तित्व कायम राखून आहे. कादंबरीतील घडामोडी तिथेच घडतात आणि तीच कथेची मर्यादाही आहे.
लालबागमधील सेठ हा सर्वात श्रीमंत माणूस. त्याची पत्नी, दोन मुले, त्यांचा नोकर रामू आणि त्याचे कुटुंबीय कथेच्या केंद्रस्थानी आहेत. या सर्वांच्या डोळ्यांदेखत, चिनी सैनिकांनी शेजारच्या घरातील कुटुंबप्रमुखाला ठार करून त्याच्या कुटुंबीयांना अपहृत केल्यापासून हे सर्वजण दहशतीत जगत आहेत. चिनी अधिकार्यांनी सेठचा व्यवसाय शहरातील दुसर्या शहा कुटुंबाच्या ताब्यात जाण्याची व्यवस्था केली आहे. सेठची स्वत:चे कुटुंब वाचवण्याची, विशेषत: सुंदर मुलगी चिनी सैनिकांच्या ताब्यात न जाऊ देण्याची धडपड सुरू आहे. त्यावर उपाय म्हणून ते आपल्या मुलीचा विवाह शहांच्याच कुटुंबात ठरवतात. वाग्दत्त वर हर्षकडे ‘नॅशनल आयडेंटिटी कार्ड’ आहे आणि त्याला इस्रायलला जाण्याची संधीही मिळू शकते. तसे झाले तर सेठची मुलगी चीनच्या तावडीतून वाचणार आहे. बरे, या सर्व गदारोळात जगातील कोणताही देश भारताच्या मदतीला येत नाही. इस्रायलने मात्र भारतीयांना आश्रय देण्याचे धोरण ठेवले आहे. इकडे सेठची मुलगी इदा हिचे नोकर रामूचा मुलगा मनू याच्याशी किशोरवयापासून सुरू असलेले (शारीर) प्रेमप्रकरण समांतर पातळीवर सुरू आहे. पण युद्धाच्या काळात हे प्रेम घेऊन जाणार कुठे हा त्यांच्यासमोरील यक्षप्रश्न आहे.
कादंबरीत अधूनमधून अप्रत्यक्ष राजकीय विधाने केली आहेत, तसे करताना संतुलन राखण्याचाही प्रयत्न लक्षात येतो. एके ठिकाणी उपहासाने ‘अपने दिन’चा उल्लेख आहे. त्याच वेळी देशातील सर्वांत मोठ्या राजकीय घराण्याचा वारस चीनला घाबरून आणि आपली सर्व संपत्ती घेऊन स्वित्झर्लंडला निघून गेला आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांना राग यायला नको! चीनला संपूर्ण भारत कम्युनिस्ट करायचा आहे, हे विधान करतानाच त्यांच्याकडे ्त्रिरयांसाठी समानता आपल्यासारखी केवळ तोंडी लावण्यापुरती नाही, अशीही भलामण आहे.
कादंबरी वाचून काही प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे सुरुवातीलाच देण्याचा लेखिकेने प्रयत्न केला आहे, पण ती फारशी पटत नाहीत. चीनने थेट महायुद्ध न करताच जगाच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. अमेरिका चुकीच्या परराष्ट्र धोरणांमुळे कमकुवत झाली आहे, युरोपला कोणाशीही काही देणेघेणे नाही आणि शेजारी देश अगदीच दुर्बळ आणि चीनच्या उपकाराखाली दबलेले आहेत. पाकिस्तान तर चीनचा अंकितच आहे. अशात भारतच थोड्याफार प्रमाणात चीनला टक्कर देऊ शकणारा देश आहे. पण चीनला अगदी सहज संपूर्ण देशावर ताबा मिळवता आला हे पटत नाही. चीन भारताला कितीही वरचढ असला तरी राजकीय आणि लष्करी नेतृत्वाने कोणताही प्रतिकार केल्याचे दिसत नाही. विशेषत: चीनने भारताची राज्ये कशी एकापाठोपाठ एक ताब्यात घेतली याचे वर्णन असताना भारत मुकाट्याने परिस्थितीला शरण गेला हे पटण्यासारखे नाही.
वास्तवात अस्तित्वात असलेल्या देशांची नावे वापरायची आहेत, तर इतर वास्तव घटकही लक्षात घेतले पाहिजेत. देशांची नावेही काल्पनिक असती तर हे प्रश्न पडले नसते. भारताची मोठी सैन्य क्षमता पाहता चीनला भारतीय सैन्य आपल्या सैन्यात विलीन करून घ्यायचे आहे, त्याच वेळी भारताची संरक्षणसिद्धता मात्र अगदीच कुचकामी आहे, हे कसे?
कथेच्या अखेरीस लालबाग उद्ध्वस्त झाल्यानंतर कथेतील मुख्य पात्रे पुन्हा एकदा ईश्वरी कृपेने एकत्र येतात, पण आता ते सर्व झोंबी झाले आहेत, म्हणजे ते स्वत:च तसे सांगतात. आता कलियुग संपून सत्ययुग पुन्हा सुरू झाल्याचेही ते जाहीर करतात. पण, ही घोषणा झोंबीमुखातून आल्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा असे काही वाटत नाही. कादंबरी वाचून झाल्यानंतर मनात अप्रसन्नतेची भावना उरते, त्यामुळे डिस्टोपियन असण्याचा निकष ती अर्थातच पूर्ण करते. पण तार्किकदृष्ट्या फारसे समाधान होत नाही हेही तितकेच खरे आहे.
द मॅन हू लॉस्ट इंडिया
लेखिका – मेघना पंत
प्रकाशक – सायमन
अँड शुस्टर इंडिया
पृष्ठे – ३०८ , किंमत – ४९९ रु.

