राजेश बोबडे

श्रद्धेची गरज व निर्मिती याचे महत्त्व विशद करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘सेवा करणाऱ्या आणि करून घेणाऱ्याच्या सेवाप्रियतेच्या मुळाशी एक डोळस श्रद्धा असली पाहिजे; ती जर नसेल तर दोन्हीही कार्यात निश्चयीपणा राहूच शकणार नाही. कारण कोणतेही कार्य करताना कार्य करून घेणाऱ्याचा भाव जसा कार्यफलावर पूर्ण निर्भर असतो, तशीच कार्य करणाऱ्याची श्रद्धाही मुख्य कार्यकर्त्यांवर असलीच पाहिजे.

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

असे जर नसले तर फुलांच्या भरवशावर फळे लागतीलच याची खात्री कुणी द्यावी? असेच म्हणावे लागेल. बागवान म्हणतो की- मित्रांनो! झाडाला विश्वासाने पाणी घाला म्हणजे फळे लागतातच! आणि त्या पाणी घालणाऱ्याने म्हणावे की- आम्ही तुमच्यावर श्रद्धाच का ठेवावी? असे झाले तर झाडाच्या फळांऐवजी पानेच ओरबाडून खावी लागतील. पण या व्यवहारात ते चालूच शकत नाही. असे बरेचसे विषय आहेत ज्याविषयी गुरुजींना आणि शिष्यांना परस्परांवर श्रद्धाच ठेवावी लागते. कोणत्याही मनुष्यावर श्रद्धा ठेवणे हेही तेवढेच वेडगळपणाचे आहे, असे मी सांगू शकेन, पण त्याचबरोबर आम्ही जो विषय इच्छितो त्याची पूर्वतयारी आमच्यात झालेली नसते म्हणूनही कधी कधी विश्वासाचे कटू फळ मिळते, असेही दिसून येते. तथापि देणाऱ्यांत आणि घेणाऱ्यांतही डोळस विश्वासाची भूमिका मात्र असली पाहिजे.

महाराज म्हणतात, ‘आता ही गोष्ट मात्र खरी की, विश्वास निर्माण करून दिल्याने तो निर्माण होत नसतो; तर योग्य कार्य पाहूनच विश्वास वाढतो. गारुडय़ाने- मी ब्रह्मदेव आहे, असे म्हणून जर अवेळी आंब्याच्या वाळलेल्या बीजाचे पाच मिनिटांत झाड तयार करून लगेच आंबे लावून दाखविले, तर काय ते आंबे कुणास रसाच्या उपयोगी पडतील? आणि जर ते समाजाच्या उपयोगी पडणार नसतील तर लोक- तुमचे कार्य विश्वसनीय आहे, असे कसे म्हणतील? फार झाले तर- आपला हा खेळ फार मजेदार होता, एवढेच पारितोषिक मिळू शकेल. लोक त्याला- तुम्ही खरोखरच ब्रह्मदेव आहात, असे थोडेच म्हणणार आहेत?

तात्पर्य, कार्याची सत्यनिष्ठताच डोळस व टिकाऊ विश्वास निर्माण करू शकते आणि असा विश्वास निर्माण करून देण्याइतका प्रामाणिकपणा आमच्यात आल्याशिवाय आम्ही घरच्या लोकांनाही दुरुस्त करू शकत नाही, मग समाजाचे कार्य तर दूरच राहिले. तसेच ज्यांच्यात समाजाची सेवा करण्याचे प्रेम नाही त्यांच्यात त्याग येणेच दुरापास्त आहे. ज्याच्यात त्याग नाही, त्याने भगवंताची भक्ती करावी असे म्हणणे म्हणजे गादीवर लोळून मौजेने आलाप घेऊन करमणूक करून घेणेच नव्हे का? मनुष्यात देव-भक्तीच्या आधी, धर्माच्या उदात्त कल्पनेच्या आधी आणि समाजसेवेच्याही आधी शुद्धाचरण, करारीपणा आणि आपल्याच सद्वृत्तीवर विश्वासून निष्ठा टिकविणारी दृढ बुद्धी आली पाहिजे, म्हणजे बाकीच्या कार्याचा उदय झाला, असे समजावे,’ असे महाराज म्हणतात.