न्यू यॉर्करच्या समर फिक्शन विशेषांकाचे गणित गेल्या काही वर्षांत थोडे कोसळत गेले. वास्तविक युरो-अमेरिकी उन्हाळ्यातला हा अंक जूनच्या पहिल्या आठवड्यातच यायचा. पण करोनानंतर जूनच्या मध्यापासून जुलैच्या आरंभीच्या आठवड्यात कधीही तो प्रकाशित होऊ लागला. यंदा मात्र जून महिन्यातील पहिलाच अंक पारंपरिक मुहूर्ताबरहुकूम फिक्शन विशेषांक म्हणून सादर झाला आहे. नोबेल विजेत्या फ्रेन्च साहित्यिका ॲनी अर्नो, अमेरिकी-आफ्रिकी लेखिका तायी सेलासी, अफगाणी- अमेरिकी नागरिकांचे जगणे कथांमधून मांडणारे जमिल जन कोचाई आणि ज्येष्ठ अमेरिकी लेखक जोनाथन फ्रॅन्झन आदींच्या कथा यावर्षी कथा विशेषांकात आहेत. त्याशिवाय एक पानी निबंध यावेळी ‘फॅमिली व्हॅल्यूज’ या संकल्पनेभोवती आखला आहे. या दुव्यातील पहिल्या चार कथा ताज्या अंकातील.
https://tinyurl.com/y439u53h
बुकर आणि वाचन…
‘इंटरनॅशनल बुकर’ पारितोषिकाच्या निवड समिती सदस्यांत यंदा निलंजना रॉय या ‘फायनान्शिअल टाइम्स’मध्ये पुुस्तकांवर सदर लिहिणार्या समीक्षिकेचाही समावेश होता. कोलकाता येथे जन्मलेल्या रॉय गेली २० वर्षे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये लिहिताहेत. ‘द गर्ल हू एट बुक्स’ हे त्यांचे पुस्तकप्रेमावरील निबंधांचे पुस्तकदेखील लोकप्रिय. त्यांनी सात-आठ महिन्यांत प्रत्येक सदस्याने वाचलेल्या पुस्तकांचा तपशील दिला आहे. रोजच्या जगण्यावर तसेच सामाजिक आयुष्यावर झालेला परिणाम यांवरही चर्चा केली आहे. तो लेख सशुल्क आहे; पण माहितीसाठी पर्याय म्हणून बुकरच्या संकेतस्थळावर असलेली ही मुलाखत वाचता येईल. निवड समिती सदस्यांचा आणखी तपशीलदेखील या मजकुरात स-छायाचित्र मिळेल.
सर्वोत्कृष्ट कादंबरीच्या मागावर…
ब्रिटनमधील निम्मी जनता पुस्तके वाचत नसल्याचा अहवाल गेल्या वर्षी ‘गार्डियन’मध्ये विस्तृत सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध करण्यात आला होता. मोबाइलमुळे मनोरंजन आणि ज्ञानाच्या इतक्या माहितीपोया तयार झाल्या आहेत की आबालवृद्ध त्यात गुंतलीत. बहुतांश नागरिकांचे अभ्यासापलीकडे विरंगुळा हे वाचनकारण उरलेले नाही. अजूनही १२० ते २०८ पानांचे वृत्तपत्र जिथे विकले जाते तिथली ही स्थिती नेटफ्लिक्स युगातच झाली, हा निष्कर्ष. आता यात बदल घडावा यासाठीच म्हणून की काय तीन आठवड्यांपूूर्वी जगभरच्या कित्येक लेखकांशी, समीक्षकांशी चर्चा करून सर्वोत्तम १०० कादंबर्यांची यादी ‘गार्डियन’मध्येच जाहीर झाली. यादीत (शंभर पुस्तकांसह) पहिल्या दहा कोणत्या ते जाणून घेण्यासाठी आणि निष्णात लेखकांकडून या यादीच्या निमित्ताने घडलेली चर्चा जाणून घेण्यासाठी पुढील दुवे.
https://tinyurl.com/386834ny
https://tinyurl.com/5an44ztn
