एका अख्ख्या देशाच्या सेमीकंडक्टर उद्याोगाचं ‘सीईओ’पद दिलं जाणं, हे स्वप्नवतच! यातून तैवानचीही स्वप्नपूर्ती झाली; ती कशी?

तैवाननं १९६० च्या दशकात स्वत:ला अमेरिका-नियंत्रित सेमीकंडक्टर पुरवठा साखळीचा एक अविभाज्य घटक बनवलं, यामागे रोजगारनिर्मितीतून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं आर्थिक कारण तर होतंच. पण त्याचबरोबर विस्तारवादाच्या दृष्टीने तैवानकडे पाहणाऱ्या माओच्या चीनपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका भक्कम साथीदाराची तैवानला गरज होती आणि यासाठी अमेरिकेपेक्षा योग्य सहकारी शोधूनही सापडला नसता. आपलं साम्यवादविरोधी भांडवलशाही धोरण जगभरात राबवण्यासाठी अमेरिकेला अधिकाधिक देश आपल्या कंपूत यायला हवेच होते. विशेषत: आशिया खंडात, जिथं तत्कालीन सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्या साम्यवादी धोरणांचा प्रभाव शेजारी देशांवर पडण्याची शक्यता होती, तिथं या धोरणाची अधिकच गरज होती. म्हणूनच सुरुवातीला टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स (टीआय) आणि पुढे अनेक अमेरिकी चिपनिर्मिती कंपन्यांनी चिप जुळवणी-चाचणी (असेम्ब्ली-टेस्ट) तसेच पॅकेजिंगचे कारखाने तैवानमध्ये हलवले, तेव्हा अमेरिकी शासनाने कसलीही आडकाठी केली नाही.

thermax collaborates with ceres power for green hydrogen production
थरमॅक्सच्या ‘सेरेस’शी भागीदारी; पर्यावरणपूरक हायड्रोजनची किफायतशीर निर्मिती देशात शक्य
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
pm narendra modi sets usd 500 billion target for electronics sector by 2030
इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी ५०० अब्ज डॉलरच्या टप्प्याचे लक्ष्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २०३० पर्यंतचे उद्दिष्ट 
Digital Revolution in Indian Agriculture
विश्लेषण : कृषी क्षेत्रातही होणार डिजिटल क्रांती? काय आहेत केंद्र सरकारच्या योजना?
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
Smart and Prepaid Electricity Meters
स्मार्ट व प्रीपेड वीज मीटर: वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हवा
recession in india latest news in marathi
मंदीच्या कृष्णछाया दिसत आहेत?
jio financial fda marathi news
जिओ फायनान्शिअलला विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत नेण्यास मंजुरी

सत्तरच्या दशकाच्या अंतापर्यंत तैवान हा चिपनिर्मितीमधल्या जुळवणी-चाचणी प्रक्रियांचं सर्वात मोठं केंद्र बनला होता. तैवानी शासनाच्या या औद्याोगिकीकरणाच्या धोरणाचा अर्थव्यवस्था वाढीला तसेच रोजगारनिर्मितीला फायदा निश्चितच झाला होता. पण तैवानला एवढ्यावरच थांबून राहायचं नव्हतं. १९८० पर्यंत भूराजकीय क्षेत्रात बऱ्याच घडामोडी होत होत्या. १९७६ मध्ये माओ निवर्तल्यानंतर तैवानसाठी चिनी आक्रमणाचा धोका काहीसा कमी झाला असला तरीही चीननं उद्याोगस्नेही धोरण राबवायला सुरुवात केली असल्यानं आर्थिक आव्हानं वाढत होती. चिनी प्रशासकांना चीनला चिपनिर्मिती क्षेत्रात क्रमांक एकचा देश बनवण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्या दृष्टीनं, चिपनिर्मिती तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी चीनचे प्रयत्न जोमानं सुरूही झाले होते. आपण कोणत्याही बाबतीत (आर्थिक पाठबळ, उपलब्ध पायाभूत सुविधा व मनुष्यबळ, करसवलती इत्यादी) चीनशी मुकाबला करण्यास असमर्थ आहोत याची तैवानला पुरेपूर जाणीव होती. चीनच्या बरोबरीनं सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम या देशांचं वाढतं आव्हान होतंच.

दुसरीकडे गेल्या दीड दशकात चिपनिर्मिती शृंखलेत केवळ जुळवणी-चाचणी-पॅकेजिंग या प्रक्रियांपुरतंच तैवानचे स्थान सीमित राहिल्यामुळे, संपूर्ण चिपनिर्मिती प्रक्रियेत होणाऱ्या नफ्याचा मर्यादित हिस्साच तैवानला मिळत होता. सेमीकंडक्टर पुरवठा साखळीमधला आपला सहभाग आणि नियंत्रण वाढवायचं असेल तर चिपनिर्मिती प्रक्रियेत अधिक मूल्य असणाऱ्या पायऱ्यांवर चढण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आणि त्यासाठी युरोपीय अमेरिकी कंपन्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा एखाद्या नव्या तैवानी कंपनीची उभारणी करणं गरजेचं होतं.

१९८० मध्ये तैवानी सरकारनं त्यासाठी ‘युनायटेड मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन’ (यूएमसी) या कंपनीची स्थापना केली. पहिल्यापासूनच यूएमसीचं उद्दिष्ट हे किफायतशीर पद्धतीनं उच्च दर्जाची अद्यायावत चिपनिर्मिती करण्याचं होतं. त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान तैवाननं अमेरिकेच्या आरसीए (रेडिओ कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका) या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या तत्कालीन आघाडीच्या कंपनीकडून परवाना तत्त्वावर घेतलं होतं. पण प्रचंड खटपटीनंतरही यूएमसीची वाटचाल रडतखडतच सुरू होती.

इंटेल, एएमडी, मायक्रॉन वगैरेंच्या तुलनेत यूएमसीचं सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आणि चिपनिर्मिती प्रक्रियांची कार्यक्षमता कित्येक योजनं मागे होती. आज यूएमसी केवळ चिपनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांमधली (ज्यांना सिलिकॉन फाऊंड्री असंही म्हणतात) आघाडीची कंपनी असली (जवळपास आठ टक्के बाजारहिस्सा) आणि प्रामुख्यानं एलईडी स्क्रीनच्या दर्शनी भागाचं नियंत्रण करण्यासाठी वापरात येणाऱ्या चिपनिर्मितीतली क्रमांक एकची कंपनी असली, तरीही १० नॅनोमीटर किंवा त्याहूनही कमी लांबीरुंदीच्या चिपचं उत्पादन करण्याची क्षमता तिला अजूनही प्राप्त झालेली नाही. असो.

पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतरही तैवान सरकारची चिपनिर्मिती शृंखलेच्या वरच्या स्तरावर जाण्याची महत्त्वाकांक्षा यूएमसीकडून पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती. या ‘जैसे थे’ परिस्थितीतून तोडगा काढण्यासाठी अखेरीस १९८५ मध्ये तैवाननं मॉरिस चँग या आपल्या हुकमाच्या एक्क्याशी पुन्हा एकदा संधान साधायला सुरुवात केली. तसं बघायला गेलं तर १९६८ मध्ये ‘टीआय’नं चिप जुळवणी-चाचणीसाठीचा अमेरिकेबाहेरचा आपला पहिला कारखाना तैवानमध्ये उभारल्यापासून टीआयच्या मार्क शेफर्ड, पॅट हॅगॅर्टी या प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चँगनं तैवानी शासकीय अधिकारी व मंत्र्यांशी भेटीगाठी सुरूच ठेवल्या होत्या. पण १९८५ पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं.

टीआयमधल्या तब्बल २५ वर्षांच्या झळाळत्या कारकीर्दीला चँगनं १९८३ मध्ये पूर्णविराम दिला होता. टीआयमध्ये सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, त्यामागचं संशोधन व पुढे इंटिग्रेटेड सर्किटची निर्मिती यात प्रामुख्याने जॅक किल्बी आणि पदार्थविज्ञान शाखेतल्या इतर संशोधकांचा सिंहाचा वाटा असला तरीही या तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत किफायतशीरपणे व त्याच वेळी अत्युच्च कार्यक्षमतेच्या नावीन्यपूर्ण प्रक्रिया राबवून घाऊक प्रमाणातील चिपनिर्मिती करण्याचं श्रेय बरंचसं चँगलाच द्यावे लागले असते. सर्वार्थाने लायक असूनही जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी चँगला डावलण्यात आलं तेव्हा मात्र हा घाव त्याच्या जिव्हारी लागला. त्यानं तडकाफडकी टीआयमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रॉबर्ट नॉईसनं याच कारणासाठी फेअरचाइल्ड सेमीकंडक्टरला सोडचिठ्ठी देऊन इंटेलची स्थापना केली होती. जवळपास दोन दशकांनंतर मॉरिस चँग तोच कित्ता गिरवायला निघाला होता.

त्यानंतर चँगनं एखाद दीड वर्ष इतर अमेरिकी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमध्ये उच्चपदांवर काम करून पाहिलं. पण टीआयमधल्या २५ वर्षांच्या अनुभवानंतर सेमीकंडक्टर तंत्रज्ञान- त्यातही चिपनिर्मिती प्रक्रिया – हेच चँगच्या नसानसांत भिनलं होतं. त्यामुळे चिपशी संलग्न अशा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्येही चँगचं मन रमेना. काही महिन्यांतच विशेष आव्हानात्मक काम नसल्याचं कारण देऊन चँगनं अशा कंपन्यांना रामराम ठोकला. १९८५ सालाच्या प्रारंभी चँग त्याच्या कुवतीला साजेशा संधीच्या शोधात होता आणि नेमक्या त्याच वेळी को टिंग ली या तैवानच्या अत्यंत प्रभावशाली नेत्याकडून त्याला भेटीचं आमंत्रण आलं.

ली हे तैवानच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जातात. १९६० पर्यंत प्रामुख्यानं कृषी क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्थेला औद्याोगिक चेहरा देऊन नागरिकांच्या जीवनमानाचा स्तर कमालीचा उंचावण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. विशेषत: तैवानला सेमीकंडक्टर तंत्रज्ञान व चिपनिर्मिती क्षेत्राचा जागतिक केंद्रबिंदू बनवण्यामध्ये त्यांनी आखलेल्या तंत्रस्नेही व व्यापारसुलभ धोरणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे १९८५ मध्ये आपल्या अमृतमहोत्सवी वर्षातही कार्यमग्न असणाऱ्या लींकडून जेव्हा चँगला भेटीचे निमंत्रण आलं तेव्हा वयानं, अधिकारानं ज्येष्ठ असलेल्या या नेत्याचं निमंत्रण तो अव्हेरू शकला नाही.

लींच्या तैपेई शहरातील कार्यालयात जेव्हा या दोघांची भेट झाली तेव्हा लींनी चँगसमोर ठेवलेला प्रस्ताव अगदी थेट आणि सुस्पष्ट होता. ‘‘येत्या दशकभरात तैवानला चिपनिर्मितीचं जागतिक केंद्र बनवायचं आहे. या महाप्रकल्पाचं नेतृत्व तू करशील का? यासाठी लागणारा सर्व निधी, सोयीसवलती आणि पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासन घेईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ध्येयपूर्ती करण्यासाठी जी धोरणं किंवा योजना तू आखशील त्यात सरकार जराही ढवळाढवळ करणार नाही.’’

थोडक्यात एका अख्ख्या देशाच्या सेमीकंडक्टर उद्याोगाचं ‘सीईओ’पद चँगकडे चालून आलं होतं. त्याचबरोबर निर्णय घेऊन ते राबवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि ते राबवण्यासाठी लागेल तेवढा पैसा पुरवण्याची शासकीय हमी, असा स्वप्नवत प्रस्ताव सरकारने चँगसमोर ठेवला होता. असं असूनही चँगने या प्रस्तावाला लगेच होकार दिला नाही. प्रस्ताव कितीही आकर्षक असला तरीही वयाच्या चोपन्नाव्या वर्षी तो स्वीकारावा का याबद्दल त्याचं मत दुभंगलेलं होतं. गेल्या तीन दशकांहूनही अधिक काळ त्याने अमेरिकेत (विशेषत: टेक्सासमध्ये) व्यतीत केला होता त्यामुळे ही घडी विस्कटवून पुन्हा तैवानमध्ये बस्तान बसवणं कितपत योग्य ठरेल याबद्दल तो साशंक होता.

चँग असा द्विधा मन:स्थितीत असताना ली आणि तैवान सरकारनं मात्र त्याचं मन वळवायचे आपले प्रयत्न जराही सोडले नाहीत. अखेरीस बऱ्याच भवति- न-भवतिनंतर चँगनं शासनाचा प्रस्ताव स्वीकारला! १९८५ मध्ये तो तैवानच्या अग्रगण्य अशा प्रौद्याोगिकी संशोधन संस्थेचा (इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट) प्रमुख बनला. दोनच वर्षांत, १९८७ मध्ये त्यानं ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ची (टीएसएमसी) स्थापना केली. सेमीकंडक्टर क्षेत्रात ‘फाऊंड्री मॉडेल’ची स्थापना करून चिपनिर्मिती उद्याोगाची व्यावसायिक परिभाषाच बदलून टाकणाऱ्या या कंपनीविषयी आणि चँगच्या ‘फाऊंड्री’ संकल्पनेविषयी पुढल्या सोमवारी!