आनंद हर्डीकर
‘निबंधमाला’ १८७४ च्या जानेवारी महिन्यात सुरू झाली, तर शेवटचा अंक ३० एप्रिल १८८२ रोजी प्रकाशित झाला, तो विष्णुशास्त्र्यांच्या अकाली झालेल्या निधनाच्या बातमीसह झाला. तो ‘माले’चा चौऱ्याऐंशीवा अंक होता. सात वर्षांच्या अवधीत त्यांनी सुमारे २८०० पृष्ठांचा मजकूर लिहून वाचकांसमोर ठेवला. त्यांनी एकहाती, एकटाकी लेखन करून ‘माले’च्या माध्यमातून जी कामगिरी बजावली, तिचे चिकित्सक मूल्यमापन करता येणे शक्य आहे; महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीचा व्यापक आढावा घेत असताना ते आवश्यकही आहे. तथापि, सध्या आपण राजवाड्यांवरील त्यांच्या प्रभावाच्या मर्यादित संदर्भातच विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाची माहिती करून घेतली, तरी ते पुरेसे ठरणार आहे.
त्या दृष्टीने फक्त दोनच निबंधांचा थोडासा तपशीलवार परिचय करून घेऊ या. पहिला आहे- ‘इतिहास’ हा पहिल्या वर्षीच सहाव्या, सातव्या आणि आठव्या अशा तीन अंकांमध्ये मिळून प्रसिद्ध झालेला एकूण ४७ पानांचा निबंध.
‘इति ह-आस’ हे तीन शब्द ज्याचे घटकावयव आहेत, त्या इतिहास विषयावर भारतात प्राचीन काळी फारशी ग्रंथनिर्मिती झाली नव्हती, ग्रीक किंवा रोमन लोकांमध्ये जसे सप्रमाण लिहिण्याची प्रवृत्ती विकसित झाली, तशी ती भारतात झाली नव्हती… ही वस्तुस्थिती विष्णुशास्त्र्यांनी आपल्या या निबंधात आपणहून प्रारंभीच मांडली होती. देशाच्या अनुल्लंघ्य राहिलेल्या चतु:सीमा, प्रवृत्तीमार्गापेक्षा निवृत्तीमार्गाकडे जास्त कललेली जनसामान्यांची मानसिकता वगैरे कारणे देऊन थोडासा बचाव त्यांनी केला होता, परंतु पाठोपाठ ‘राजतरंगिणी’ या काश्मीरच्या इतिहासावरील कल्हणाच्या ग्रंथाचा, काशिराज नावाच्या पंडिताने नबाबाच्या सांगण्यावरून फारशी भाषेत लिहिलेल्या पानपतच्या लढाईच्या बखरीचा दाखलाही दिला होता. हिरॉडट्स हा आद्या ग्रीक इतिहासकार, त्यानंतरच्या थुसिडिडीज, सॉक्रेटिसशिष्य जिनोफन वगैरेंबद्दलची रंजक माहिती विष्णुशास्त्र्यांनी दिली होती.
अर्थात असे केवळ माहितीपूर्ण विवेचन करून विष्णुशास्त्री थांबले नाहीत, तर मिल-मेकॉले-मॉरिस वगैरे तत्कालीन इंग्रज इतिहासकारांवर कडाडून टीका करण्याचे वैचारिक धाडसही त्यांनी दाखवले.
‘‘जेम्स मिलने ‘हिंदुस्थानचा इतिहास’ लिहिला; पण कसा, तर इंग्लंडमध्ये बसून; ज्याचा इतिहास लिहावयाचा आहे, तो देश सात-आठ हजार कोस दूर; तेथील लोक काळे का गोरे कधी पाहिलेलेही नाहीत; इथल्या भाषांचे ज्ञान अजिबात नाही. येथील स्थितीबद्दल इतर कुणी लिहून ठेवलेले असेल, तर त्यामधले हिंदूंविरुद्ध जे असेल ते घ्यायचे, प्रशंसेचा मजकूर आढळला तर तो गाळायचा आणि स्वत:चे लेखन म्हणून सर्वत्र मिरवायचे… हा प्रकार मूर्खपणाचा व लज्जास्पद आहे’’- हे विष्णुशास्त्र्यांनी त्या निबंधात विस्ताराने लिहिले होते.
‘मॉरिसने हिंदुस्थानच्या इतिहासाबद्दल लिहिलेल्या पुस्तकात शिवशाहीवर जेमतेम दोनअडीच पाने मजकूर आणि त्यात या विद्वान इतिहासकाराने शंभर चुका केल्या आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दहा वर्षे अगोदर ओढला आहे, अफझुलखानास तीन वर्षे उशिराने मारवला आहे, संभाजीची हत्या वगैरे गोष्टी शिवाजी जिवंत असतानाच घडवल्या आहेत!’ विष्णुशास्त्र्यांनी या शब्दांत त्या मान्यवर इतिहासकाराचे वस्त्रहरण करण्याचे ‘औद्धत्य’ त्या निबंधात दाखवले होते.
आणि मेकॉलेच्या वॉरन हेस्टिंग्जवरील निबंधातले अत्यंत प्रक्षोभक उद्धरण देऊन विष्णुशास्त्र्यांनी आपल्या निबंधात राष्ट्रीय स्वाभिमानाला केलेले आर्त आवाहन म्हणजे तर तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या दृष्टीने ‘राजद्रोह’च होता. मेकॉलेने त्या निबंधात लिहिले होते, ‘शहाण्या व्यापाऱ्यांना या देशातल्या संपत्तीबद्दल भ्रम होता. हिंदुस्थानात हिऱ्यांची जोती, रत्नांचे खांब, सोन्याचे वाडे आहेत, अशा वेड्या कल्पना त्यांच्या मनात घोळत. पण खरोखर हा सगळा भ्रम होता. युरोपात पोर्तुगाल देश किंवा त्याहूनही आयर्लंड देश भिकारी समजतात; पण हिंदुस्थान तर आयर्लंडहूनही भिकारी आहे!’
‘हिंदुस्थान आणि भिकारी?’ या शब्दांत विष्णुशास्त्र्यांनी केलेली मेकॉलेवर टीका पुढील लेखांकात…
anand47.hardikar@gmail.com
