इमर्सन विद्यापीठाच्या ‘प्लाऊशेअर्स’ मासिकाची ‘इमर्जिंग रायटिंग’ स्पर्धा वर्षातून एकदाच होते. रक्कम भक्कम नसली तरी कथाकार मात्र पुढे नाव कमावणाराच निघतो. तर यंदा मॅक्स स्टायनर या तरुणाची ‘ग्रेस झिरोज आऊट’ नामक प्रायोगिक कथा विजेती ठरली आहे. यातला प्रयोग म्हणजे त्याची मांडणी. तीन तीन पटांचे (त्रिपुटी, त्रिधारा म्हणा हवे तर) आठ भाग असलेली ही कथा या मासिकाने मोफत वाचण्यासाठी उपलब्ध केलीय. विजेती कथा आणि लेखदेखील दिलाय. त्याचबरोबर बोनस म्हणून ताज्या अंकातल्या तीन कथा एकाच वेळी कुलूपमुक्त केल्यात. काहीच दिवसांसाठी हा लाभ असल्यानं त्याचा आस्वाद घ्या. याच मासिकाच्या आदल्या अंकाच्या प्रकाशनाचा पूर्ण कार्यक्रम आणि त्यासह त्यातल्या लेखनाचं अभिवाचन असा तासाभराचा कार्यक्रमसुद्धा इथल्या दुसर्‍या दुव्यावरून यूट्युबवर पाहता येईल.

https://tinyurl.com/4h4b954h

https://tinyurl.com/yh3y7yn6

जपानची ताजी कादंबरी निर्यात…

‘डायरी ऑफ ए व्हॉईड’ या जपानी कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाने तीनेक वर्षांपूर्वी बराच वाचकवर्ग मिळविला. एमी यागी या लेखिकेला देशातले परमोच्च सन्मान मिळाल्यानंतर ही पहिली कादंबरी इंग्रजीत अनुवादित झाली. आता नुकतीच दुसरी कादंबरी ‘व्हेन द म्युझियम इज क्लोज्ड’ जपानमधून जगासाठी निर्यात होऊन इंग्रजीत आलीय. महिला मासिकाची चाळिशीच्या आतील संपादक असलेली ही लेखिका तिरकस विनोदी आणि स्त्रीवादाकडे देखील गमतीने पाहते. पहिल्या कादंबरीत एका मुर्दाड कार्यालयात असलेली एकमेव महिला कर्मचारी तिथल्या कामाच्या धबडग्यात आपण गर्भार असल्याचे नाटक रचते आणि धमाल उडवते. नव्या कादंबरीत पुराण वस्तुसंग्रहालयात पुतळ्याशी संवादाची अतिरिक्त नोकरी करणार्‍या तरुणीची गोष्ट साकारली आहे. त्या कादंबरीचे लघुप्रकरण पहिल्या दुव्यावरून वाचता येईल. तर दुसर्‍या दुव्यात ताजी मुलाखत सापडेल.

https://tinyurl.com/2bw5xjze

https://tinyurl.com/29uznxru

‘सिनर्स’ची सांस्कृतिक समीक्षा 

ऑस्करच्या अंतिम आणि मुख्य गटांतील नामांकने गेल्या आठवड्यात जाहीर झाली. एकाच चित्रपटाला १६ इतकी मानांकने मिळविण्याचा विक्रम ‘सिनर्स’ या चित्रपटाने केला. भय आणि उत्कंठेने भरलेल्या या चित्रपटात असे काय आहे, ज्यामुळे त्याने सगळ्या गटांतील ऑस्कर पारितोषिकांसाठी शड्डू ठोकले? हा चित्रपट कोणत्याही कादंबरी अथवा अकथनात्मक लेखनाची प्रेरणा घेऊन साकारलेला नसून अमेरिकेतील कृष्णवंशीय समुदायाची अतिमानवी शक्तींशी लढाई हा तिचा विषय आहे. ऑस्करची नामांकने जाहीर होण्यापूर्वी या चित्रपटाची महत्ता सांगणारा अमेरिकी चित्रपटावरचा हा ब्रिटिश दैनिकातला लेख. ttps://tinyurl.com/5cvf4pyy