डॉ. विनया जंगले
भारतातील जैवविविधता ही अचंबित करणारी गोष्ट आहे. इथे बर्फाळ आणि वाळवंटी प्रदेश आहेत, तशाच डोंगररांगाही आहेत, मैदानी प्रदेश, समुद्रकिनारे आणि नद्यांची समृद्ध खोरी आहेत. जगातील एकूण प्रजातींपैकी सात-आठ टक्के प्रजाती एकट्या भारतात आढळतात. एक लाखांवर प्राणी प्रजाती आणि ४५ हजारांहून अधिक वनस्पतींच्या प्रजाती इथे आहेत. भारतात जैवविविधतेचे चार महत्त्वाचे जागतिक हॉटस्पॉटस आहेत. त्यात हिमालय, पश्चिम घाट, इंडो बर्मन प्रदेश (ईशान्य भारत) आणि सुन्दालँड (अंदमान आणि निकोबार बेटे) यांचा समावेश आहे. इतकी प्रचंड जैवविविधता असलेल्या देशातील पर्यावरणावर एकाच पुस्तकात लिहिणे, त्यातील बर्‍याचशा पैलूंना स्पर्श करणे ही खर तर खूप अवघड गोष्ट. परंतु टी. आर. शंकर रमण यांनी त्यांच्या ‘द वाइल्ड हार्ट ऑफ इंडिया’ या पुस्तकात हे शिवधनुष्य बर्‍यापैकी पेलले आहे

रमण मुळचे चेन्नईचे. चेन्नईच्या गिंडी राष्ट्रीय उद्यानातून त्यांची वन्यजीव अभ्यासाची सफर सुरू झाली. पुढे त्यांनी ‘वाइल्ड लाइफ इ्स्टिटट्यूट ऑफ इंडिया’ या नामवंत संस्थेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथे त्यांची दिव्या मुद्प्पा यांच्याशी भेट झाली. दोघांनाही जंगल भटकंती, वन्यजीव संशोधन, संवर्धनात रस होता. भारतातील विविध जंगले फिरून त्यांनी तेथील वन्यजीवनाचे, निसर्गाचे निरीक्षण केले. कधी निसर्ग अभ्यास तर कधी केवळ जंगल भटकंती हा उद्देश त्यामागे होता. याच दरम्यान त्यांनी कधी भर पावसात दुथडी भरून वाहणारी नदी पार केली, कधी नामदाफासारख्या उंचावरील अभयारण्यात चिंचोळ्या धोकादायक वाटेवरून प्रवास केला.

या प्रवासात त्यांना पर्यावरण क्षेत्रात काम करणारी काही माणसे भेटली. जंगलात दिसलेले विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, त्यांचे परस्परावलंबित्व त्यांनी जवळून पाहिले. निसर्ग आणि माणूस यांच्यातील गुंतागुंतीच्या व बदलत्या संबंधांचा त्यांनी अभ्यास केला. या पुस्तकात राजस्थानमधील वाळवंटी राष्ट्रीय उद्यानातील माळढोक पक्ष्यांपासून समुद्रातील डॉल्फिनपर्यंत, बेंगळूरुतील वृक्ष लागवड चळवळीपासून मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्या आणि मानव सहजीवनासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांपर्यंत विविध विषयांना स्पर्श करण्यात आला आहे.

पुढे जाण्याआधी टी. आर. शंकर रमण आणि दिव्या मुद्प्पा यांनी तमिळनाडूतील निसर्गसंवर्धनासाठी केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या कामाची माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते. हे दोघे तमिळनाडूतील अण्णामलाई येथील वर्षावनांचे तुटलेले तुकडे जोडण्याचे काम करत आहेत. तमिळनाडूच्या आग्नेय भागात पूर्वी वाल्पराई हा २२० चौरस किमीचा जंगलाचा भाग होता, परंतु ब्रिटिशांनी तेथील मोठमोठ्या जमिनींच्या तुकड्यांवर चहा लागवड सुरू केली. आता चहा लागवड करणार्‍या मोठमोठ्या कंपन्या तिथे आहेत. चहाच्या मळ्यांमुळे वर्षावने अनेक ठिकाणी खंडित झाली आहेत. त्या भागात ‘सिंह  पुच्छ वानर’ (  lion tailed macaque) ही अतिदुर्मीळ माकडाची प्रजात आढळते. जंगल सलग नसल्यामुळे ही माकडे कधी कधी चहाच्या मळ्यांजवळील वस्तीत येतात. महामार्ग ओलांडताना माकडांचे आणि इतर वन्यप्राण्यांचे अपघात होतात. ‘नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून शंकर आणि दिव्या हे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करतात.

माकडांना महामार्ग ओलांडता यावेत म्हणून महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या झाडांवरून दोरखंड बांधले जातात, लोकांनी माकडांना खायला घालू नये असे आवाहन केले जाते, वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी फलक लावले जातात. चहा कंपन्यांशी बोलून जमिनीचे जे तुकडे चहा लागवडीसाठी योग्य नाहीत त्या जमिनी त्यांनी जंगल लागवडीसाठी कंपन्यांकडून घेतल्या आहेत. त्या जमिनींवर स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड करून पक्षी, प्राणी, कीटक यांच्यासाठी जंगलात पोहचण्याचे मार्ग तयार केले आहेत. शंकर आणि त्यांच्या संस्थेने २००१ पासून १७० स्थानिक प्रजातींच्या एक लाख रोपट्यांची लागवड केली आहे. वर्षावनांचे ३५ तुटलेले तुकडे जोडताना एकूण १०० हेक्टर जमिनीवर जंगलाचे पुनर्निमाण केले आहे. आता चहा कंपन्या व स्थानिकांमधील तरुण पिढी या प्रक्रियेत हिरिरीने उतरली आहे याचे दिव्या आणि शंकर यांना समाधान वाटते. या कामातून त्यांनी आता देशभरात विविध जंगलांच्या पुनर्निमाणाची चळवळच उभारली आहे.

हे पुस्तक सुरू होते ते शंकर रमण यांच्या एका आठवणीतून. ते आपल्या आई-वडिलांच्या घरी आलेले असतात. आई त्यांना त्यांची खोली आवरायला सांगते. त्या खोलीत त्यांना वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लिहिलेला एक लेख सापडतो. त्या लेखात १४ वर्षांच्या शाळकरी मुलाने आपला दिवस कसा गेला याविषयी आणि त्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल लिहिलेले असते. त्या स्वप्नात तो मुलगा टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात सूर्योदयाच्या वेळी उभा असतो. आजूबाजूला हिरवीगार झाडे, किलबिलणारे पक्षी आणि अद्भुत शांतता असते. तो मुलगा शेवटी लिहून जातो ‘I was in the western ghats-  at the Annamalai jungles at the foot of the awesome Nilgiris.  I was where I had always wanted to be.

पुस्तकात हाच शाळकरी मुलगा वाचकाचा हात हातात घेऊन हळूहळू त्याला जंगलात फिरवू लागतो. पहिल्याच लेखात चेन्नईच्या गिंडी राष्ट्रीय उद्यानातील सहा ऋतूंची विविध रूपे रेखाटलेली आहेत. चितळ हा गिंडी राष्ट्रीय उद्यानातील महत्त्वाचा प्राणी. विविध ऋतूंत चितळांमध्ये दिसणारे बारकावे यात टिपलेले आहेत. उन्हाळ्यात मिलनासाठी मादीच्या शोधात फिरणारा चितळ नर ते जानेवारीच्या थंडीत आईच्या उबेत लपलेले चितळाचे पिल्लू हे निसर्गाचे स्थित्यंतर रेखाटताना रमण एकाच वेळी ललित लेखक आणि शास्त्रज्ञ होतात. गिंडी उद्यानातील उन्हाळ्यात जंगलातील कोकीळ नराचे स्वर, पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीतून प्रकट होणारे लालबुंद रेशमी किडे, हिवाळ्यात फुलणारी विविधरंगी फुले हा गिंडीच्या जैवविविधतेचा शास्त्रीय दस्तावेज तर आहेच, परंतु कविमनाच्या लेखकाने टिपलेले बारकावे तरलतेने यात आलेले आहेत. त्यानंतर लगेचच चेन्नई शहरात रात्रीच्या वेळी दिसणारे प्राणी-पक्षी यांचे वर्णन ‘नाइट लाइफ इन चेन्नई’ या लेखात वाचायला मिळते. शंकर यांनी सुरुवातीला लिहिले आहे की, ‘काही लोकांना वाटते की निसर्ग फक्त मानवी वस्तीपासून दूर जंगलातच दिसतो’, परंतु रमण आपल्याला दाखवून देतात की निसर्ग फक्त गिंडीसारख्या जंगलांत नसून गजबजलेल्या शहरांत रात्रीच्या काळोखातही दडलेला आहे. तो शोधण्याची दृष्टी हे पुस्तक वाचताना विकसित होते.

चेन्नईमधील रात्रीचे वन्यजीव जसे लेखकाने दाखवले आहे, त्याचप्रमाणे गुवाहाटीच्या नैऋर्त्येला वसलेल्या डीपॉर बील या तलावाच्या बाजूला असलेल्या कचरा डेपोचे भयाण वर्णन यात केले आहे. या कचरा डेपोवर क्षत्र बलाक ((Greater Adjutant) हा दुर्मीळ पक्षी चरत असतो. संपूर्ण जगात काही शेकड्यांत उरलेल्या या पक्ष्याच्या स्थितीविषयी वाचून अस्वस्थ वाटते. तिथूनच जवळून जाणार्‍या रेल्वेमार्गावर अपघातात मृत्यू पावणार्‍या हत्तींबद्दल यात वाचायला मिळते. बेंगळूरु शहरात लावलेल्या भल्यामोठ्या होर्डिंग्जमुळे रस्त्याच्या बाजूची मोठी झाडे तोडली जातात. वन्यजीव संवर्धन हे केवळ अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानापुरते मर्यादित ठेवून चालणार नाही तर आधुनिक विकासाच्या प्रत्येक कृतीत वन्यजीव संवर्धनाचा विचार झाला पाहिजे ही बाब या पुस्तकातून अधोरेखित होते.

लेखकाने जंगलांच्या संवर्धानांसाठी उपाययोजना सुचवताना चहाच्या मळ्यात केलेल्या छोट्या छोट्या बदलांमुळे तेथील वन्यजीवांचा आसरा सुरक्षित होऊ शकतो याकडे लक्ष वेधले आहे. जंगलातील उघडे माळरान हरणांसाठी सुरक्षित आहे हे सांगतानाच लेखकाने मिझोरामची झूम ही स्थलांतरित शेती मैलोनमैल केलेल्या पामच्या एकसुरी लागवडीपेक्षा पर्यावरणासाठी किती तरी सुरक्षित आहे हे सांगितले आहे. झूम शेती कमी होत असतानाच तेथील पारंपरिक बांबू नृत्याची संस्कृती हा केवळ एक दिखावू उपचार ठरला आहे, याची जाणीव हे पुस्तक करून देते. रस्त्यावर वाहनांमुळे होणारे वन्यजीवांचे मृत्यू यावरही लेखकाने पोटतिडकीने लिहिले आहे.

जगातून नष्ट झालेल्या प्राणी आणि पक्ष्यांबद्दल लिहिताना शंकर यांची लेखणी मानवाला त्याच्या चुकांची जाणीव करून देते. तर त्याच वेळी जंगलात अचानक दिसलेल्या वन्यजीवांमुळे अनुभवलेला थरार आणि आनंद याचे वर्णन करताना तीच लेखणी कवी मनाची हळवी होते. बाहेरच्या निसर्गाचा शोध घेताना लेखक नकळत माणसाच्या आतल्या अथांगतेकडे पोहोचू लागतो. डॉल्फिनवर लिहिलेल्या लेखात तो एके ठिकाणी म्हणतो k Will our search for new world and other intelligent life bring us new discovery from the starry sea above or from the yielding sea below Or will it come instead from the sea within us,  in surprise and joy and revelation?l पक्क्या शास्त्रीय पायावर उभारलेले हे लेखन वाचकाला उत्तम साहित्यिक आनंद देते, हे या पुस्तकाचे मोठे वैशिष्ट्य  आहे.

मिझोरामच्या खेड्यांतील घरांवर लिहिलेले डीडीटी फवारणीचे संदेश आणि दक्षिण भारतातील चहाच्या मळ्यांत कीटकनाशकांच्या अतिफवारणीमुळे वाढलेले हानीकारक कोळी किडे बघून लेखकाला राचेल कार्सनचे ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक आठवते. अंदमान निकोबार बेटांवर हत्ती, चितळांसारखे त्या बेटांच्या दृष्टीने हानीकारक व परके प्राणी वेगाने वाढत आहेत आणि तेथील मूळ रहिवासी असलेले जारवा आदिवासी मात्र तेथे ‘परकीय’ ठरत आहेत हा विरोधभास लेखकाने मांडलेला आहे. 

पुस्तकात एकूण ५७ छोटेखानी लेख आहेत. पुस्तक तीन भागांत विभागलेले आहे. पहिला भाग लेखकाची जडणघडण, शाळकरी आणि महाविद्यालयीन जीवनातील निसर्गाच्या सहवासातील भटकंती, संशोधन यावर आधारित आहे. दुसर्‍या भागात भारतातील विविध भागांत असलेले महत्त्वाचे प्राणी, पक्षी त्यांच्या संवर्धनाचे होत असलेले प्रयत्न किंवा त्याची गरज याबाबत मुख्यत: लिहिले आहे. तर तिसर्‍या भागातील लेख आधुनिक जगात पर्यावरण आणि त्याच्याशी भारतीयांचे बदलते नाते याबद्दल आहेत. नद्यांचे प्रदूषण, अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारी येणार्‍या कासवांना होणारा प्रदूषणाचा त्रास, जंगलतोड इत्यादी विषयांवरचे लेख आहेत. पुस्तकातील सर्व लेख स्वतंत्र असूनही झाडाच्या मुळांप्रमाणे खोलवर परस्परांशी जोडलेले आहेत. या सगळ्या लेखांचा मिळून जणू एक कोलाज तयार झाला आहे. त्यातून आजच्या भारतातील पर्यावरणाचे एक सलग चित्र समोर येते.

शंकर यांचे गुरू आर. के. जी. मेनन यांच्यावर लिहिलेला ‘kLone Palm Tree ,  Sir’ हा लेख व्यक्तिचित्रणाचा उत्कृष्ट नमुना आहे. दूरवरून दिसणार्‍या उंच पाम झाडाकडे जाणार्‍या काल्पनिक रेषेवरून चालत जाऊन वन्यप्राणी गणना करायची पद्धत लेखकाला मेनन यांनी शिकवली. प्रसिद्धी, पैसा यापासून दूर राहून आपले संशोधन निष्ठापूर्वक करणारे मेनन लेखकाला आकाशात उंच गेलेल्या, परंतु एकाकी राहून इतरांना दिशा दाखवणार्‍या पाम वृक्षासारखे वाटतात. ‘द वाइल्ड हार्ट ऑफ इंडिया’ हे पुस्तकसुद्धा भारतातील निसर्ग व पर्यावरणविषयक लेखनामध्ये ठळक उठून  दिसणारे, आकाशाकडे झेप घेत नव्या दिशेचा वेध घेणारे आहे. भारतातील पर्यावरण संवर्धनात गोडी असणारे, त्याचा अभ्यास करू इच्छिणारे या सर्वांना हे पुस्तक दिशादर्शक ठरेल, हे निश्चित.

द वाइल्ड हार्ट ऑफ इंडिया

लेखक – टी. आर. शंकर रमण

प्रकाशक – वेस्टलँड नॉन फिक्शन

पृष्ठे – ५६३, किंमत – ७९९ रु.

Vetvinaya@gmail.com