‘द वर्ल्ड आफ्टर गाझा’ हे पंकज मिश्रा यांचं पुस्तक २०२५ मध्ये प्रकाशित होणार आहे. ‘पेन्ग्विन रॅण्डम हाउस’च्या या पुस्तकाची पूर्वनोंदणी किंमत भारतीय संकेतस्थळांवर दोन हजार रुपयांच्या पुढे सध्या आहे.
पंकज मिश्रा हे महत्त्वाचे लेखक आहेत, यावर कॅनडातल्या ‘वेस्टन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’चं शिक्कामोर्तब परवाच झालं. पण त्याआधीही ते महत्त्वाचे होतेच. ‘रन अॅण्ड हाइड’ आणि त्याआधीची ‘द रॉमॅण्टिक्स’ या दोनच कादंबऱ्या लिहिणारे पंकज मिश्रा अधिक ओळखले जातात ते त्यांच्या ललितेतर लिखाणासाठी. ‘बटर चिकन इन लुधियाना’ हे पंकज मिश्रांचं पहिलं पुस्तक (१९९५) प्रचंड गाजलं. त्या काळातल्या, जागतिकीकरणाचे फायदे नव्यानं मिळवू पाहाणाऱ्या भारतातल्या इंग्रजी नववाचकांना ते आवडलं. मग ‘रोमॅण्टिक्स’ आली, हिमाचल प्रदेशातल्या मशोबरा या गावात मिश्रांनी घर बांधलंय वगैरे चर्चा त्यानिमित्तानं झाली खरी; पण त्याआधीची दोन-तीन वर्षं मिश्रा ब्रिटनमध्ये अधिक राहू लागले होते. एकंदर परदेशी राबता वाढला होता. न्यू यॉर्क टाइम्ससाठी मिश्रांचं लिखाण सुरू झालं होतं. ‘अॅन एण्ड टु सफरिंग : बुद्धा इन द वर्ल्ड’ (२००४) या पुस्तकाचा पुढल्या दोन पुस्तकांशी (इंडिया इन माइंड- २००५; टम्प्टेशन्स ऑफ द वेस्ट : हाउ टुबी मॉडर्न इन इंडिया अॅण्ड पाकिस्तान- २००६) संबंध नसला, तरी या तिन्ही पुस्तकांचा धागा अखेर २०२२ सालच्या ‘रन अॅण्ड हाइड’ या कादंबरीशी जुळला. या पंकज मिश्रांची भारतीयांना कमी माहीत असलेली पुस्तकं ही चीन, जपान आणि युरोपच्या ‘राष्ट्रवादा’चा आणि या प्रदेशांतल्या उदारमतवादाच्या अभावाचा किंवा ओहोटीचा अभ्यास करणारी आहेत.
‘लोकमान्य टिळकांनी उदारमतवादी (लिबरल) राजकारण लोकांपर्यंत पोहोचवलं’, ‘गेल्या २५ वर्षांपासून भारतात अतिराष्ट्रवाद रुजतो आहे, त्याची परिणती आता मोदींच्या कारकीर्दीत दिसते’ किंवा ‘ब्रिटिशांना आपल्या अपयशाचं खापर फोडायला कोणीच उरलं नाही, तेव्हा ‘ब्रेग्झिट’सारख्या प्रस्तावाला वाट फुटली आणि उजव्या प्रसारमाध्यमांनी परिणामांचा विचारही न करता त्याला खतपाणी घातलं’ या प्रकारची पंकज मिश्रांची विधानं कुणाला पटतीलच असं नाही, कदाचित- ‘अहो मिश्रा, आमचे टिळक तर जहालवादी होते ना?’ म्हणत त्यांचा तात्काळ प्रतिवादही करता येईल (अशा वेळी टिळकांची मागणी ‘स्वराज्या’ची होती आणि ‘स्वातंत्र्या’ची नव्हे, हे विसरलं जाईल.) परंतु काहीएक सखोल निरीक्षणाअंती मिश्रा व्यक्त होत आहेत, हे त्यांच्या वाचकांना वेळोवेळी जाणवलेलं आहे. मिश्रांच्या प्रकट मुलाखती वा अन्य जाहीर कार्यक्रम भारतात कमीच होत असले (त्यांच्यापेक्षा उदाहरणार्थ, पवन वर्मा यांच्या प्रकट मुलाखतींची भारतातली संख्या जास्त भरेल) तरी विविध ‘पॉडकास्ट’वरून त्यांचे विचार ऐकायला मिळत असतात. असंच एक पॉडकास्ट कॅनडात ‘भारतानं घडवल्या’चा संशय असलेल्या हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतरचं… तोवर सात ऑक्टोबर २०२३ उलटून गेला होता, इस्रायलनं पॅलेस्टाइनवर नायनाटकारक हल्ले सुरू केलेले होते. प्रामुख्यानं गाझाबद्दलचं ‘इंटरसेप्टेड’ पॉडकास्ट करणारे अमेरिकी पत्रकार मूर्तझा हुसेन यांनी पंकज मिश्रांना एका भागात पाहुणे म्हणून बोलावलं, कॅनडा आणि भारत यांच्याबद्दलचे प्रश्न विचारले, तेव्हा ‘मुळात खलिस्तानवाद ही काही आता चळवळ उरलेली नाही… काही अनिवासी भारतीयांना मायदेशाबद्दल जे स्वप्नाळू, हुळहुळं प्रेम वाटतं, तसलंच उरलंय ते- पण तीन दशकांपूर्वी पंजाबातही सामान्यजनांचा पाठिंबा नसलेल्या आणि केवळ हिंसेवर चाललेल्या त्या खलिस्तानच्या तथाकथित चळवळीनं काही परदेशस्थ शिखांना मात्र आजतागायत ‘स्वतंत्र राष्ट्रा’च्या दिवास्वप्नातच ठेवलं आहे, हे शोचनीयच’ – अशी मीमांसा करून मगच पंकज मिश्रांनी भारताच्या कॅनडा-धोरणात सातत्य कितपत आहे, हा प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा: अन्वयार्थ: शेतकऱ्यांना आता सोयाबीन रडवणार?
तर, मिश्रांना मिळालेला पुरस्कार कॅनडाचा असण्याशी त्यांच्या कॅनडाविषयक मतांचा काहीही संबंध नाही. मतप्रदर्शनात समतोल कसा साधायचा, हेही मिश्रांना माहीत आहेच.
४६ लाख ६६ हजार ९८४ रुपये आजच्या दरानं भरतील, इतका – ७५ हजार कॅनेडियन डॉलरचा हा पुरस्कार आहे. ब्रिटनमधलं ‘बुकर प्राइझ’ ५० ब्रिटिश पौडांचं असतं, त्या तुलनेत हा पुरस्कार जरा कमीच (४२ हजार पौंडांचा) भरेल. पण पैशापेक्षाही, कॅनडातल्या लेखकांच्या महासंघामार्फत दिला जाणारा हा पुरस्कार, कॅनडाबाहेरच्याच आणि ललितेतर गद्या लिखाण करण्यासाठी दिला जाणारा आहे हेही महत्त्वाचं.
म्हणजे नोम चॉम्स्की, फ्रान्सिस फुकुयामा, युवाल नोआ हरारी, जोसेफ स्टिगलिट्झ, गेलाबाजार अरुंधती रॉय, रमचंद्र गुहा… अशा कोणालाही हा पुरस्कार मिळू शकतो. पुरस्काराचं यंदाचं अवघं दुसरं वर्ष. याआधीचा पुरस्कार अतिदुर्गम डोंगराळ भागांबद्दल अनेकांगी लिखाण करणारे ब्रिटिश लेखक रॉबर्ट मॅक्फर्लेन यांना मिळाला होता. मॅक्फर्लेन वयानं पंचेचाळिशीचे, तर पंकज मिश्रा ५५ वर्षांचे आहेत. थोडक्यात, वयानं फार ज्येष्ठ नसलेल्यांना हा कारकीर्द-गौरवासारखा पुरस्कार दिला जातो आहे. टोरोंटो शहरातल्या रॉयल ओन्टारिओ संग्रहालयात येत्या १६ सप्टेंबर रोजी पंकज मिश्रांचं व्याख्यानही पुरस्काराच्या आयोजकांनी ठेवलं आहे.
हेही वाचा: संविधानभान: संविधानाच्या तटबंदीचे संरक्षक
पुरस्काराला ज्या वेस्टन यांचं नाव आहे, त्यांनी कॅनडापुरता एक निराळा पुरस्कार ठेवला आहेच, त्यासाठी कॅनडात प्रकाशित झालेल्या पाच ललितेतर गद्या पुस्तकांची लघुयादी जाहीर होते आणि विजेत्याला ७५ हजार, तर चौघाही उपविजेत्यांना प्रत्येकी २० हजार कॅनेडियन डॉलर दिले जातात; असं हे मालदार प्रकरण. यंदा या पुरस्काराचं दुसरंच वर्ष असल्याकारणानं असं नक्की म्हणता येईल की, एकंदर वेस्टन पुरस्कारांच्या मानकऱ्यांपैकी मिश्रा हेच सर्वाधिक वाचकांपर्यंत पोहोचलेले लेखक आहेत! पंकज मिश्रांबद्दल वाचकांची मतं काहीही असोत, ते वाचनीय ठरतात हे कुणीही नाकारू शकत नाही.
हेही वाचा…
जेम्स जॉईस ते ऑस्कर वाईल्ड किंवा सॅम्युअल बेकेट ते ब्रॅम स्टोकर या सर्वच आयरिश लेखकांची परंपरा अजून का टिकून आहे? पुस्तकांच्या दुकानांत गर्दी करणारे दर्दी वाचक आणि जागतिक पातळीवर मान्यता मिळविणारे ताजे लेखक तिथे का घडत आहेत, या सर्वांची उत्तरे देणारा लेख येथे वाचता येईल.
https:// shorturl. at/ RoAF0
योको ओगावा या जपानी लेखिकेची ‘मिनाज मॅचबॉक्स’ ही कादंबरी याच महिन्यात दाखल झाली असून खूपविक्या याद्यांमध्ये सध्या अग्रभागी आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या साहित्य पुरवणीमध्ये नवे पुस्तक प्रकाशित झालेल्या साहित्यिकांची आठवडी लघु-मुलाखत घेतली जाते. त्यात वाचनापासून बरेच तपशील असतात. येथे त्याचा वानवळा मिळेल.
https:// shorturl. at/ V9 pDH
गूढ-भय, विस्मयकारक आणि चमत्कारिक घटनांनी भरलेल्या कथा लिहिणाऱ्या अमेरिकी लेखिका केली लिंक यांची ही दीर्घ मुलाखत. नारायण धारप यांची जन्मशताब्दी सुरू झालेली असताना, त्या प्रकृतीचे आणि वकुबाचे लिहिणाऱ्या एका अमेरिकी साहित्यिकाची ओळख यातून व्हावी.
https:// shorturl. at/5 uYd0