एल्विस प्रेस्लीच्या झंझावाताने ‘रॉक अॅण्ड रोल’ या नवसंगीताचे बारसे वगैरे झालेले असताना शेतकरी कुटुंबातल्या एका कृष्णवंशीय पोरीने संगीतवृंदाच्या प्रमुखाला, ‘मला गायिका व्हायचंय’ अशी टेचात गळ घातली. या पोरीसह तिच्या बहिणीला कोरसमध्ये गाण्याचे काम मिळाले. पण त्या कोरसमध्येही खणखणत्या आवाजाने तिने संगीतवृंदाच्या प्रमुखावर मोहिनी पाडली. टिना टर्नरचे ‘क्वीन ऑफ रॉक अॅण्ड रोल’ बनण्याच्या दिशेने पडलेले ते पहिले पाऊल. कलेचे घोडदौडीत रूपांतर होण्याआधी अडचणींचे अनंत-अडथळे सुरू होण्यापूर्वीचे. १९५८ साली आईक टर्नर या वाद्यवृंदप्रमुखाकडे झळकलेला आवाज १९६१ मध्ये टिना टर्नर या नावाने ओळखला गेला आणि पुढल्या काही वर्षांत आईक आणि टिना टर्नर या नवदाम्पत्याने ‘रॉक अॅण्ड रोल’ संगीतात डझनांहून अधिक हिट गाण्यांचा पाऊस पाडला. या काळात उदयाला आलेल्या बहुतांश सर्व रॉक अॅण्ड रोल संगीतकार-गायकांचा पुढल्या दोन दशकांत विविध कारणांनी अस्त झाला. पैसा, प्रसिद्धी, मानमरातब यांच्या गर्तेत ड्रग्ज-सेक्स आणि आत्महत्येने शेवट झालेल्या कितीतरी नावांचे दाखले येथे देता येतील. टिना टर्नरचे वैशिष्टय़ म्हणजे तिची खरी कारकीर्द फुलली ती आपले आरंभिक समकालीन रॉक-कलाकार सर्वार्थाने संपल्यानंतर. तेही दु:ख आणि कफल्लकतेच्या परमोच्च अवस्थेत असताना.
अॅना माये बुलक हे नाव घेऊन जन्मलेल्या या मुलीने आपले वडील नोकरीला असणाऱ्या शेतात कापूस काढणाऱ्या मजुरांसह कामही केले. कुटुंबाला वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकांच्या घरात बहिणींसह जगाचे विविधांगी अनुभव घेताना केवळ आपल्या आवाजावर विश्वास ठेवून तिने वाद्यवृदांत शिरकाव केला. पुढे आईक टर्नर या कलाकाराची गायिका पत्नी म्हणून लोकप्रिय होत असताना, त्याच्या मारझोड आणि जाचाला तिला सामोरे जावे लागले. १९७६ साली तिने आर्थिक तडजोड टाळून घटस्फोट घेतला. तेव्हा केवळ २६ सेंट्स पाकिटात असताना गाणेच आपल्याला तारून नेईल हा विश्वास तिला होता. १९८३ साली कॅपिटॉल रेकॉर्डसने तिला करारबद्ध केले आणि म्युझिक व्हिडीओ आणि एमटीव्हीच्या नव्या युगात टिना टर्नर हे नाव जगभर पोहोचण्यासाठी सज्ज झाले. वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी ‘पॉपस्टार’ बनण्याची किमया तिने करून दाखविली. १९८८ मध्ये १,८०,००० अशी विसाव्या शतकातली विश्वविक्रमी प्रेक्षकसंख्या असलेल्या मैफलीत तिने आपल्या खणखणीत आवाजाची पेशकश केली. मेल गिब्सनच्या ‘मॅड मॅक्स : बियॉण्ड थंडरडोम’ चित्रपटात ती झळकली. मायकेल जॅक्सनच्या झिंगाळवर्षांतही समांतररीत्या अल्बमविक्रीचे आणि स्टेज परफॉर्मन्सचे विक्रम रचत होती. एकूण ११ ग्रॅमी (त्यांतील आठ स्पर्धात्मक व इतर जीवनगौरवासम) पुरस्कार मिळविणाऱ्या आणि नव्वदोत्तरीत उगवलेल्या बहुतांश कलाकारांसह गायनाची हौस भागविणाऱ्या टर्नर यांचे उत्तरायुष्यातील वैवाहिक जीवन सुफळ आणि संपूर्ण गेले. विविध आजारांतही आवाज दुमदुमता राखणाऱ्या या गायिकेने नुकत्याच झालेल्या मृत्यूपूर्वी शेकडो कलावंतांना उभरण्याची प्रेरणा दिली.