आपले पंतप्रधान, दिशाभूल करणारी माहिती जाणीवपूर्वक पसरवणारे लोक, आणि भाजपचे फिरकीपटू या सगळय़ांनी सेंगोलबद्दल जे काही अजबगजब म्हटलं आहे, ते तिरुवल्लुवर, एलांगो अडिगल या प्राचीन काळातील आणि अववैय्यर तसंच संगम युगातील कवींनी ऐकलं तर त्यांना आता भूकंप होऊन धरणीमाता आपल्याला पोटात घेईल तर बरं असंच वाटण्याची शक्यता आहे. ऐहिक शक्तीचं प्रतीक असा या लोकांनी सेंगोलचा अर्थ लावला आहे. खरंतर एखाद्या धर्मगुरूने किंवा एखाद्या शासकाने नव्या शासकाला सेंगोल देणं हे प्रतीकात्मक आहे. पण सध्या त्याचं चित्रण सत्तेचं हस्तांतरण असं केलं जात आहे.
इतिहास आणि नैतिक तत्त्वं यांचा कसा निर्लज्जपणे विपर्यास केला जाऊ शकतो, याचंच प्रदर्शन २८ मे २०२३ रोजी मांडलं गेलं. त्या दिवशी तुतारी, रणिशगं अशी वाद्यं वाजवली गेली. दरबाऱ्यांनी सत्ताधीशांवर आपली निष्ठा व्यक्त केली. तो संसदेच्या दोन्ही सभागृहांना सामावून घेणाऱ्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा नव्हे तर जणू काही राज्याभिषेकाचाच सोहळा होता. लोकशाही प्रजासत्ताकाशी विसंगत अशा या राज्याभिषेकाच्या शाही समारंभात लॉर्ड माऊंटबॅटन आणि सी. राजगोपालाचारी (राजाजी) यांचा उल्लेख करण्यात आला होता. धर्मनिरपेक्ष असणं अपेक्षित होतं, अशा कार्यक्रमाला धार्मिक रंग देण्यासाठी शैव अधीनम (मठ) प्रमुखांना बोलावलं जाणं ही खरंच दुर्दैवाची गोष्ट होती.
दूरचित्रवाणीवर हा कार्यक्रम बघताना लोकांना नक्कीच २५ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती मुर्मू यांच्या शपथविधी सोहळय़ाची आठवण झाली असेल. हा शाही कार्यक्रम आणि तो साधासुधा सोहळा यामधली विसंगती त्यांच्या नक्कीच लक्षात आली असेल. आणि लोकांना, विशेषत: कर्नाटकातल्या लोकांना तर नक्कीच या प्रश्नाचे आश्चर्य वाटले असेल की ‘नेमकं कोण कोणाकडे सत्ता हस्तांतरित करत आहे?’
सेंगोलची व्याख्या
तिरुवल्लुवर हे इ.स. पूर्व २०० ते इ.स. पूर्व १० या कालावधीत कधीतरी होऊन गेलेले तमिळ कवी आणि तत्त्वज्ञानी. तिरुक्कुरल ही त्यांची काव्यरचना तमिळ भाषेतील अक्षर साहित्य आहे. तिरुक्कुरल या ग्रंथामधील संपत्ती या भागामध्ये, त्यांनी सेंगोनमाई (नीतिमान राजदंड) आणि कोडुनगोनमाई (क्रूर राजदंड) असे दोन अध्याय समाविष्ट केले. त्यातील ५४६ क्रमांकाच्या दोन ओळी अशा आहेत,
‘वेलंद्री वेंद्री थारुवथु मान्नवन्
कोल अदूम कोडथु एनिन्
कोल म्हणजे राजदंड. श्लोकाचा अर्थ असा आहे की ‘राजाला भाल्यामुळे नाही, तर राजदंडामुळे विजय मिळतो’, पण या कवीचे शेवटचे तीन शब्द लक्षात घ्या. तो म्हणतो राजदंड वाकता कामा नये. तो ताठ असायला हवा. तो या किंवा त्या बाजूला झुकता किंवा वाकता कामा नये. पंतप्रधानांनी पदाची शपथ घेतली तेव्हा त्या शपथेमध्येही हाच विचार आहे. ‘‘मी सर्व प्रकारच्या लोकांशी आपुलकीने तसेच कोणतीही भीती न बाळगता, कोणताही पक्षपात न करता, द्वेषभावना न ठेवता, तसेच राज्यघटना आणि कायद्यानुसार योग्य पद्धतीनेच वागेन’’. कोल म्हणजेच राजदंड हा दुसरेतिसरे काही नाही तर नीतिमान राजवटीचे प्रतीक आहे. तो वाकला नाही तर तो सेंगोनमाई म्हणजे नीतिमान राजदंड असेल आणि वाकला तर कोडुनगोनमाई म्हणजे क्रूर राजदंड असेल.
सेंगोलचा अर्थ फक्त सत्ता किंवा शासन असा नाही तर न्याय्य शासन असा आहे. राजदंड धारण करणारा शासक न्यायाने राज्य करण्याचे वचन देतो. तिरुवल्लुवर म्हणतात की ‘दान, करुणा, नीतिमान शासन आणि दुर्बलांचे संरक्षण हे चांगल्या राजाचे चार गुण आहेत’ (कुरल ३९०). त्यांच्या मते सेंगोल हा राजाच्या या चार गुणांपैकी एक असतो. त्यांच्या काव्याच्या दुसऱ्या प्रकरणाचे शीर्षक कोडुनगोनमाई असे आहे. कोडुनगोनमाई म्हणजे सेंगोनमाईच्या विरुद्ध. म्हणजेच क्रूर किंवा अन्यायकारक राजवट.
सेंगोल स्तुतीची कवने
संगम काळातील एका कवीने करिकालन या महान चोल राजाच्या कोल म्हणजेच राजदंडाची ‘अरनोडू पुनरंदा तिरनारी सेंगोल’ अशी प्रशंसा केली. त्याचा अर्थ असा की या राजाच्या राज्यात नैतिकतेला महत्त्व होते. दुसऱ्या एका संगम कवीने त्या राजाचे वर्णन ‘एरेरकु निझंद्र कोलिन’ असे केले आहे. त्याचा अर्थ अन्न उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची तो राजा काळजी घेत असे. सिलाप्पथीकरम हे महाकाव्य लिहिणारे जैन मुनी एलांगो अडिगल यांनी कन्नगीवर झालेल्या अन्यायाबद्दल शोक व्यक्त केला आणि सेंगोल झुकण्यास कारणीभूत ठरलेल्या राजाच्या विनाशाची भविष्यवाणी केली.
अववैय्यर या लोककवीने अगदी सोप्या भाषेत आपले काव्य रचले. त्याची एक प्रसिद्ध कविता अशी आहे..
बंधारा वाढला की पाणी वाढेल,
पाणी वाढले की भात वाढेल,
भात वाढला की कुटुंबे वाढतील,
कुटुंबे वाढली की कोल (राजदंड) वाढेल,
राजदंड ताठ असेल तरच राजा टिकेल
झुकलेला राजदंड हे अन्यायकारक किंवा क्रूर शासनाचे प्रतीक आहे. कोणत्याही विभागाबाबत पक्षपात असता कामा नये. कोणताही समाज, धर्म किंवा भाषेच्या विरोधात द्वेष असता कामा नये.समकालीन उदाहरणं द्यायची तर, चांगल्या शासकाच्या राजवटीत द्वेषयुक्त भाषणं, कायदा हातात घेणं, लव्ह जिहाद किंवा बुलडोझर पद्धतीचा न्याय असता कामा नये. अशा शासकाच्या राज्यात शेजारच्या कोणत्याही देशातले मुस्लीम, नेपाळमधले ख्रिश्चन आणि बौद्ध तसंच श्रीलंकेतील तमिळ यांच्याबाबत भेदभाव करणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) स्थान असू शकत नाही. शेतकऱ्यांना व्यापारी आणि मक्तेदारांच्या तोंडी देणाऱ्या शेती कायद्यांना वाव असू शकत नाही. एखादा प्रकल्प महाराष्ट्राकडून हिसकावून घेऊन गुजरातमध्ये नेणं न्याय्य ठरू शकत नाही. नुकतीच कर्नाटकात विधानसभा निवडणूक झाली. त्यात मुस्लीम किंवा ख्रिश्चन समुदायातील उमेदवार उभे करण्यास अशा राज्यातील कोणताही राजकीय पक्ष नकार देऊ शकत नाही. तसंच न्यायासाठी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या पदकविजेत्या खेळाडूंचे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून मोडून काढू शकत नाही.
सेंगोलचे पावित्र्य टिकवा
राजदंड आणि सत्ता यांची बरोबरी करणं किंवा त्यांना समान मानणं म्हणजे सेंगोलच्या संकल्पनेचे पावित्र्य घालवून टाकणं होय. लॉर्ड माऊंटबॅटन आणि राजाजींचा उल्लेख करणं म्हणजे इतिहासाचं फक्त विकृतीकरणच नाही तर एका व्यवहारचतुर व्हाईसरॉयला आणि विद्वान-मुत्सद्दी राजकारण्याला कमी लेखणं आणि त्यांच्याकडे सामान्य व्यवहारज्ञान नाही असं मानणं आहे.
सभापती ज्या व्यासपीठावर बसतील तिथे सेंगोल ठेवून दोहोंची शान वाढवा. सेंगोल सभागृहाच्या कामकाजाचा मूक साक्षीदार होऊ दे. सभागृहात मुक्त वादविवाद होत असेल, भाषण आणि अभिव्यक्ती- स्वातंत्र्यास पूर्ण वाव असेल; सहमत आणि असहमत असण्याचं स्वातंत्र्य असेल; आणि अन्यायकारक किंवा घटनाबाह्य कायद्यांविरुद्ध मतदान करण्याचं स्वातंत्र्य असेल तर सेंगोल ताठ उभा राहील. सेंगोल आणि तो ज्यासाठी आहे ते सेंगोनमाई (नैतिकतेचे राज्य) विजयी होवो..