काम करणार्‍याचा उत्कर्ष होईलच असे काही नाही, पण काम करण्याचे समाधान भरपूर मिळते… हेच पोलीस आणि निमलष्करी दलांतील अनेक उच्चपदांवर राहिलेले आयपीएस अधिकारी त्रिनाथ मिश्रा यांच्या कारकीर्दीचे सार. पोलीस दलातून २००२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लेखन केले, अनेकांना त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनही मिळाले.. त्रिनाथ मिश्रा यांच्या गुणांचे, त्यांच्या सचोटीचे पुरेसे चीज झाले नसल्याचा विषाद इतरांना असला तरी. मिळालेले आयुष्य समाधानाने जगून त्यांनी १ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला.

मिश्रा हे अविभाजित बिहारमधल्या रांचीचे. बिहारच्याच लातेहार जिल्ह्यात ‘सर्वांगीण विकास करणारे शिक्षण ही धनिकांची मक्तेदारी असू नये’ अशा ईर्षेने सुरू झालेल्या ‘नेतरहाट आवासीय विद्यालया’च्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी. पाटणा विद्यापीठात इतिहासाचे पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन, भारतीय पोलीस सेवेत १९६५ मध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर प्रदेश केडर निवडले. मेरठ, आजमगढ, मोरादाबाद आदी जिल्ह्यांत काम करतानाच, डाकूंच्या टोळ्यांविरोधी पथकातही त्यांनी काम केले. अलाहाबादचा (तेव्हाचे नाव) कुंभमेळा १९७७ मध्ये निर्वेधपणे पाडण्याचे काम त्यांनी केले. ही कार्यक्षमता पाहूनच उत्तर प्रदेशातून काही काळासाठी मणिपूरसारख्या राज्यात त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. मात्र त्यांना खरा वाव मिळाला तो केंद्रीय दलांमधल्या प्रतिनियुक्तींमुळे. केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) अधीक्षक म्हणून काम करण्यापासून त्यांची ही कामगिरी सुरू झाली. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) कमांडण्ट, नव्यानेच स्थापन झालेल्या ‘विशेष सुरक्षाकवच गटा’चे (एसपीजी) भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) महानिरीक्षक, सरदार वल्लभभाई पटेल पोलीस प्रबोधिनीचे संचालक, मग सीबीआयच्या संचालकपदाचा कार्यभार (आधी हंगामी संचालक, मग संचालक) आणि तिथून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) या निमलष्करी दलांचे महासंचालक असा त्यांचा प्रवास झाला.

सीबीआयच्या संचालकपदी असताना सर्वपक्षीय राजकारण्यांना अतिप्रिय अशा तेव्हाच्या एकमेव ‘अ’द्योगपतीवर त्यांनी छापे घातले. लगोलग राजकारण्यांनी ‘लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून मिश्रांचा मनमानी कारभार सुरू आहे’ अशा टीकेचा भडिमार केला आणि त्यांच्या संचालकपदाचा कार्यकाळ मध्येच संपवण्यात आला. पुढे, सीबीआय संचालकांना त्यांच्या ठरावीक कार्यकाळात हटवता येऊ नये अशा याचिकेच्या सुनावणीवेळी मिश्रा यांचे उदाहरण देण्यात आले, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी झाल्या प्रकाराबद्दल नापसंतीदर्शक प्रतिक्रिया दिली… पण तोवर मिश्रा निवृत्तही झालेले होते. कार्यरत असताना ‘सुरक्षा एवं संरक्षा’ आणि ‘फर्स्ट चार्ज- अ हॅण्डबुक फॉर पोलीस ऑफिसर्स’ ही मार्गदर्शक पुस्तके लिहिणार्‍या मिश्रांनी छंद म्हणून सूफी पद्यरचनांचा जो अभ्यास केला होता, त्यातून त्यांच्या निवृत्तीनंतर ‘ मौलाना जलालुद्दीन ‘रूमी’’ हे पुस्तक सिद्ध झाले, तेही केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केले (सध्या प्रती उपलब्ध नसलेल्या या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘रेख़्ता .कॉम’वर मोफत वाचता येते). ‘हिंदू बुक ऑफ द डेड’ हे अंत्यविधी आणि श्राद्धविधींमागच्या श्रद्धांचा ठाव घेणारे पुस्तक, कुंभमेळ्याचा इतिहास आणि वर्तमान यांबद्दलचे पुस्तक, अशी त्यांची ग्रंथसंपदा आता मागे उरली आहे, ती उत्तर भारताची संस्कृती कधीकाळी ‘गंगाजमनी’ असल्याची साक्ष देत राहील.