गडचिरोलीतील भामरागड उपविभागाअंतर्गत येणार्‍या छत्तीसगड सीमेलगतच्या अबुझमाड जंगल परिसरात नक्षलवाद्यांविरोधात अलीकडे तब्बल ७२ तास चाललेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले तर सी-६० पथकातील जवान दीपक मढावी शहीद झाला. ‘क्रॅक-६०’ म्हणजेच ‘सी-६०’ कमांडो पथक जेव्हापासून गडचिरोलीतील नक्षलबहुल परिसरात कार्यरत झाले तेव्हापासून नक्षलवाद्यांच्या वर्चस्वाला जोरदार तडा गेला. आता बातम्या येतात त्या अमुकअमुक नक्षलवादी ठार झाल्याच्या वा शरण आल्याच्या. याआधी पोलीस वा सरपंच, पोलीस पाटील वा सरकारी अधिकार्‍यांच्या नक्षलवाद्यांकडून झालेल्या अपहरणाच्या वा निर्घृण हत्येच्या तसेच सुरुंगस्फोटात पोलीस ठार झाल्याच्या बातम्या येत. त्या काळात अधीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या क्रिशिपाल ऊर्फ के. पी. रघुवंशी यांनी नक्षलवाद रोखण्यासाठी सी-६० कमांडो पथक स्थापन केले आणि नक्षलविरोधी कारवाईला जोर आला.

राज्य पोलीस दलातून महासंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या रघुवंशी यांच्या केवळ नक्षलवाद्याविरोधी कारवाईचाच नाही, तर संपूर्ण कारकीर्दीचा अप्रकाशित राहिलेला थरारक प्रेरणादायी प्रवास वृत्तवाहिनीतील पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी ‘ट्रबल शूटर’ या पुस्तकातून मांडला आहे. पोलीस दलात प्रवेश केल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंतच्या रघुवंशी यांच्या कर्तव्यदक्ष कारकीर्दीवर दीक्षित यांनी प्रकाशझोत टाकला आहे. रघुवंशी मुंबईत स्पेशल टास्क फोर्सचे अतिरिक्त आयुक्त होते तेव्हा म्हणजे २००० मध्ये जितेंद्र दीक्षित यांची त्यांच्याशी ओळख झाली. गडचिरोलीत सी-६० कमांडोंनी मोठी कारवाई केली तेव्हा दीक्षित यांना तिथे वार्तांकनासाठी पाठविण्यात आले. पुढे दीक्षित रघुवंशींच्या नियमित संपर्कात राहिले.

१९७९ तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले रघुवंशी यांना खरेतर आयएएस अधिकारी व्हायचे होते. परंतु गावात एका क्षुल्लक कारणावरून जेव्हा पोलिसांनी त्यांना व मित्राला विनाकारण त्रास दिला तेव्हाच त्यांनी आयपीएस होण्याचे लक्ष्य निश्चित केले. पहिल्याच प्रयत्नात ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी पुणे ग्रामीण, सोलापूर येथे संवेदनशील परिस्थिती समर्थपणे हाताळली. त्यामुळेच त्यांची ठाणे आयुक्तालयात लगेचच बदली झाली. बदलीमागे राजकीय दबाव हे एक कारण असले, तरी भिवंडी-कल्याण या अतिसंवेदनशील परिसरात खमका अधिकारी राज्य शासनाला हवा होता. त्यांनी एका बड्या राजकीय नेत्याच्या दादागिरीविरोधात निडरपणे केलेल्या कारवाईमुळे कल्याण शांत झाले. पुढे सशस्त्र विभाग आणि नंतर चेंबूर, घाटकोपरमध्ये नियुक्ती होऊन स्थिरस्थावर होत असतानाच त्यांना गडचिरोलीचे अधीक्षक म्हणून बदलीचा आदेश आला. गडचिरोलीत नियुक्ती ही त्या वेळी शिक्षा मानली जात होती. तिथे नक्षलवादी कारवाया जोरदार सुरू होत्या. या काळात दंडकारण्यातील आदिवासी समाजाशी कशी नाळ जुळविली आणि नक्षलवादी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी सी-६० या नव्या कमांडो पथकाची कशी निर्मिती केली याचे वर्णन अंगावर शहारे आणणारे आहे. सी-६०ची स्थापना करणारे पोलीस अधिकारी म्हणून रघुवंशी ओळखले जातात, मात्र त्याआधी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती हे पुस्तक वाचून घेणे अधिक आवश्यक आहे. आजही गडचिरोलीत नियुक्त होणार्‍या पोलिसांना रघुवंशी यांचे हे अनुभव निश्चितच उपयुक्त ठरतील. सराफ यांचा विश्वास रघुवंशी यांनी सार्थ ठरविला, यापेक्षा नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी अचूक अधिकारी सराफ त्यांनी निवडला, असेच म्हणावे लागेल. रघुवंशी यांची गडचिरोलीतून बदली झाली तेव्हा सराफ यांनी कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. ही आपली पुंजी आहे, असे रघुवंशी या पुस्तकात म्हणतात.

त्यांच्या या प्रभावी कार्यशैलीमुळेच राज्यात श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा रघुवंशी यांचे नाव समोर न येते तर नवलच. त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी बढती मिळाली खरी. परंतु अस्तित्वात नसलेल्या ‘स्पेशल टास्क फोर्स’चे प्रमुख म्हणून त्यांना शून्यापासून कशी सुरुवात करावी लागली व आज दहशतवादविरोधी पथक (एटीएस) म्हणून ओळखला जाणारा विभाग रघुवंशी यांनी कसा स्थापन केला, याची माहिती या पुस्तकातून मिळते. त्या वेळी तो विभाग मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत येत असे. तत्कालीन आयुक्त अनामी रॉय यांचाही विश्वास रघुवंशी यांनी संपादन केला होता. अबू सालेमला भारतात पाठविण्यात आले तेव्हा त्यांचा ताबा एटीएसलाच देण्यात आला. ११ जुलै २००६ चे बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट हे तपास रघुवंशी यांच्याच काळात घडले. एटीएस हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला आव्हान वाटू लागले होते. त्यातूनच ११ जुलैचे बॉम्बस्फोट लष्कर-ए-तय्यबा नव्हे तर इंडियन मुजाहिद्दीनने घडवले होते, हा युक्तिवादही रघुवंशी यांना खोडावा लागला होता. हेमंत करकरे २६/११ हल्ल्यात शहीद झाल्यावर एटीएसची पुन्हा धुरा सांभाळणारे रघुवंशी हे ११ जुलैच्या बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात यशस्वी ठरले होते. उच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली असली तरी सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना आशा आहे. त्या निकालामुळे रघुवंशी यांना आलेली अस्वस्थताही जितेंद्र जोशी यांनी या पुस्तकात मांडली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे अनुभव गुन्हेविषयक वार्तांकन करणार्‍या पत्रकाराने शब्दबद्ध असल्यामुळे कारवाईतील बारकावे वाचकाला जाणून घेता येतात. या पुस्तकाच्या निमित्ताने एका कर्तव्यतत्पर पोलीस अधिकार्‍याचे आजवर पडद्याआड राहिलेले योगदान वाचकांसमोर आले आहे.

ट्रबल शूटर
लेखक – जितेंद्र दीक्षित
प्रकाशक – पॅन मॅकमिलन
पृष्ठे – ३३३ , किंमत – ४९९ रु.

nishant.sarvankar@expressindia.com