‘मुंढे मार्गाच्या मर्यादा!’ हा अग्रलेख (३१ ऑगस्ट) वाचला. तुकाराम मुंढे यांच्यावर टीका आणि त्यांच्या असण्याची अपरिहार्यता असे विरोधाभास लेखात आहेत असे वाटते. बीडमध्ये प्रशासनावर ही वेळ का आली? वर्षानुवर्षे स्थितीशील प्रशासक आणि पावलोपावली त्यांच्यावर दबाव आणणारे लोकप्रतिनिधी यामुळेच हे अध:पतन झाले, हे मान्य करणार की नाही?
शेषन, खैरनार, खेमका यांनी भारतीय राजकीय व्यवस्थेची वस्तुस्थिती समोर आणली नाही का? ते नसते तर आज प्रशासन आणि पोलीस यांच्यावर राजकारण्यांच्या अधिकाराचा जो बुलडोझर चालतो त्याचा परिणाम केवळ गुन्हेगारी वाढण्यातच झाला नसता का? किंबहुना हे असे अधिकारी संख्येने कमी असल्यानेच लोकशाहीचे खच्चीकरण झाले आहे. पुण्यामध्ये अरुण भाटिया यांनी ज्या धडाक्यात कामे केली त्याचा परिणाम म्हणून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन अविश्वास ठराव संमत करतात आणि त्यांची हकालपट्टी करतात हे आपल्या राजकीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण. मुंढे पुण्यात पीएमपीएलचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी वाहतूक समस्येचे मूळ दुखणे शोधून काढले. त्यामुळे पुणेकरांना अल्पकाळ का होईना इतकी चांगली सुविधा मिळाली की कित्येक लोक स्कूटरऐवजी बसने जाऊ लागले. रस्त्यावरील कोंडी कमी झाली. पण कुर्हाड चालवली गेली, ती बेपर्वा खासगी बस कंत्राटदारांवर! यात गैर काय होते? सरंजामी वृत्तीच्या नेत्यांना खमके अधिकारीच तोंड देऊ शकतात, अन्यथा डॉक्टरला मारणारे लोकप्रतिनिधी अनेक.
– उमेश जोशी, पुणे</strong>
‘पतंजली’कडेही नजर वळवा
‘मुंढे मार्गाच्या मर्यादा!’ हा अग्रलेख वाचला. मी तुकाराम मुंढे याना विनंती करू इच्छितो की, त्यांनी ‘पतंजली’कडे आपली करडी नजर वळवावी आणि आयुर्वेदिक म्हणून विकल्या जाणार्या औषधांत भेसळ तर होत नाही ना, याची शहानिशा करावी. आम्ही आरोग्य कार्यकर्ते एक वेळ बहुराष्ट्रीय कंपन्यांना नियमांवर बोट ठेवून जाब विचारण्याचा प्रयत्न करतो, पण ‘महामानवा’चा वरदहस्त असलेल्या बाबाचे बिंग फोडण्याची जबाबदारी घेत नाही वा त्याला जाब विचारण्याचे धाडस दाखवत नाही.
– सुहास कोल्हेकर, पुणे
अप्रामाणिकपणा रक्तातच…?
‘मुंढे मार्गाच्या मर्यादा!’ हा अग्रलेख वाचला. केवळ राजकीय पक्षांनीच नव्हे समाजानेसुद्धा आपापला अजेंडा राबवताना आपण देशाला खालच्या पातळीवर नेत आहोत याचे भान सोडले. दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे आणि चारचाकीत सीट बेल्ट बांधणे सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असते, हे माहीत असूनही तसे न करणे अभिमानाने मिरवणारे महाभाग पावलोपावली आढळतात. समाजहिताचे नियम वा संकेत पाळणारेही आहेत, पण ते अपवादात्मकच. त्यांची खिल्ली उडवण्याचा दांभिकपणा समाजाला अधोगतीकडे नेत आहे. अप्रामाणिकपणा आपल्या रक्तातच भिनलेला आहे की काय?
– डॉ. कैलास कमोद, नाशिक
न परवडण्यासारखे काय?
‘वर्तमानपत्र परवडेना!’ हे वृत्त वाचले. हे राज्य सरकारच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रतीकच म्हणावे लागेल. केशकर्तनालयामध्ये, चहाच्या टपर्यांवर, रिक्षांमध्येही ग्राहकांसाठी वर्तमानपत्र ठेवले जाते. या हातावर पोट असणार्यांना वर्तमानपत्र परवडते. राज्य सरकारला अनावश्यक जाहिरातींवर, मंत्र्यांच्या कार्यालयातील खानपानावर, बैठकांवर, त्यांच्यासाठीच्या वाहनांवर वारेमाप खर्च परवडतो, मग साधे वृत्तपत्र विकत घेण्यात अडचण काय आहे? यामध्ये वृत्तपत्र व्यवसाय व वृत्तपत्राच्या दैनंदिन व्यवहारांची शृंखला खंडीत होण्याची भीती आहे.
– विलास सावंत, दहीसर (मुंबई)
