अहो आचार्य, मान्य की तुम्हाला सत्ताधार्यांनी बहुजनांमध्ये धर्मप्रसार करण्यासाठी आडनाव बदलून सोडले. त्यासाठी तुम्ही शालिग्रामचे भोसले झालात हेही मान्य. शालिग्राम म्हणजे विष्णू. कृष्णाचाच अवतार. त्यामुळे अध्यात्मासाठी हा नवा अवतार तुम्ही धारण केला हेसुद्धा मान्यच. पण बोलताना जरा तर्कसंगत तरी बोला. उगीच विरोधकांच्या हाती कोलीत कशाला देता? भलेही ते तुम्हाला सत्ताधार्यांचे दलाल म्हणोत. आम्हीच काय कुणीही तसे मानत नाही. आधुनिक अवतार पुरुष म्हणूनच तुमच्याकडे बघतो. मग यावरून आगपाखड करताना उगीच नसबंदीला मध्ये आणायची गरज होती का? अहो, उदाहरणे तरी योग्य द्यायची ना! सध्या वेगाने विस्मृतीत जाणार्या काँग्रेसने तुमच्या आजोबा-पणजोबांचा छळ म्हणजे काय तर नसबंदी केली. आचार्य हा छळ कसा असू शकतो? लोकसंख्या नियंत्रणासाठी ती आवश्यक नाही का? भलेही हा कार्यक्रम राबवण्यात तेव्हा काँग्रेस चुकली असेल पण म्हणून काय या संतती नियंत्रणालाच चूक ठरवणार? अहो, आताचे तुमचे विश्वगुरूसुद्धा अधूनमधून लोकसंख्या नियंत्रणाविषयी बोलत असतात.
मग तुम्ही कसे काय त्याला दोष देता? ती नसबंदी फसली म्हणून तुम्ही या भूतलावर अवतरलात असे आता विरोधक म्हणू लागलेत. कशाला उगीच त्यांच्या शंकेला बळ देता? तेव्हा ती जबरदस्तीची नसबंदी लादली नसती तर अनेकांच्या घरात दहा दहा तोंडे जन्माला आली असती. अकारण संपत्तीत वाटेकरी वाढले असते. मग जे झाले ते एका दृष्टीने योग्यच नाही का? खरे तर तुम्ही यासाठी काँग्रेसचे आभार मानायला हवेत, ते न करता उगीच टीकेचे ‘तुषार’ कशाला अंगावर उडवून घेता? काँग्रेसी अत्याचाराच्या कथाच सांगायच्या तर बर्याच आहेत की? आणीबाणी, अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण, धर्मनिरपेक्षता हे तुमचे आवडते मुद्दे आहेतच ना.
यामुळे माझ्या पूर्वजांना त्रास झाला म्हणून मी सत्ताधार्यांच्या कळपात (नाव बदलून) सामील झालो असे सांगा. लोक चटकन विश्वास ठेवतील त्यावर. नसबंदीचा विषय काढून कशाला शंका-कुशंकांना जन्म देता? तुम्ही धारण केलेले नाव नुसते सर्वसाधारण नाही. ती एक जबाबदारी आहे हे कधी लक्षात घेणार तुम्ही? सारा महाराष्ट्र तुमच्या ओजस्वी वाणीतून रोज काय बाहेर पडते याची चातकासारखी वाट बघत असतो. पुराणकथांमध्ये वाचलेली अवतार पुरुषाची संकल्पना प्रत्यक्षात छोट्या पडद्यावर बघत आहोत या आनंदाने गद्गदीत होत असतो. तुम्ही ज्या पद्धतीने फु (पु) रोगाम्यांचा समाचार घेता त्याने सुखावून जात असतो. इतके मोठे वलय लाभलेल्या तुमच्यासारख्या वक्त्याने नसबंदीचा विषय काढावा, त्यातून स्वत:च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहू द्यावे, हे पटलेच नाही बुवा अनेकांना. ‘त्या’ नसबंदीची जबर शिक्षा तेव्हा काँग्रेसला मिळाली. त्यांचा दारुण पराभव झाला. म्हणून त्यांनी तो शब्द त्यागला आणि भरघोस मतांनी निवडून आले. हा इतिहास ठाऊक असेलच तुम्हाला. तसे काही तुमच्या पक्षाच्या बाबतीत न घडो म्हणजे मिळवले. हे वक्तव्य काँग्रेसने तुमची दखल घ्यावी यासाठी केले तर तेही चूक. तुमच्यासाठी दिल्ली अजून दूर आहे. असे शब्द वापरण्यापेक्षा अध्यात्माचा सखोल अभ्यास करा. तो वक्तव्यातून दिसला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. तसेही सत्ताधारी असल्यामुळे तुमच्यासाठी वाहिन्यांनी भरपूर वेळ उपलब्ध करून दिलेलाच आहे.
