प्रतीक राजुरक
न्यायालयांच्या रूक्ष दैनंदिन कामकाजातही काही वेळा हास्याची लकेर उमटते. कधी वकिलांच्या तर कधी न्यायाधीशांच्या भाषिक कौशल्यांतून मार्मिक विनोदांची निर्मिती होते. काही वेळा त्यांचे अजब स्वभाव चर्चेचा विषय ठरतात. देशविदेशांतील अशा घटना टिपणारे हे पुस्तक भारतातील न्यायालयांना स्पर्श करणे मात्र टाळते…

घटनात्मक पदावर असल्यामुळे असेल कदाचित, मात्र भारताचे महान्याय अभिकर्ता (सॉलिसिटर जनरल) तुषार मेहता यांनी ‘द लॉफूल अँड द ऑफुल, क्वर्की टेल्स फ्रॉम द वर्ल्ड ऑफ लॉ’ या आपल्या पुस्तकात जगभरातील विधि व न्याय क्षेत्रातील अनेक व्यंग, विनोद, घटना, इतिहास इत्यादींवर भाष्य करताना भारतीय न्याय व्यवस्थेला मात्र त्यातून वगळले आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय विधि क्षेत्रातील अनेक मान्यवर नानी पालखीवाला, फली नरिमनसारख्यांनी लिहिलेली पुस्तके आणि तुषार मेहता यांच्या या पुस्तकाची तुलना होऊ शकत नाही. पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्यांनी त्याबाबतची कारणे स्पष्ट केली आहेत. मेहता आवर्जून लिहितात की, पुस्तकातील मते ही त्यांची वैयक्तिक मते असून ते संलग्न असलेल्या कोणत्याही संस्थेचा अथवा भारत सरकारचा या मतांशी दुरान्वयेही संबंधित नाहीत. विधि व न्याय क्षेत्रातील आजवर प्रकाशित पुस्तकांचे अवलोकन करायचे झाल्यास भारतीय लेखकाने भारतीय न्यायव्यवस्थेला वगळून इतर देशांतील विधि व न्याय क्षेत्रातील अनेक घटनांचा उल्लेख करत लिहिलेले कदाचित हे एकमेव व पहिलेच पुस्तक असावे.

राम जेठामलानी यांचे ‘स्मॉल मेन बिग इगोज’, अभिनव चंद्रचूड यांचे ‘सुप्रीम व्हिस्पर्स’, फली नरिमन यांचे ‘बिफोर मेमरी फेड्स’, एम. सी. छागला यांचे ‘रोझेस इन डिसेंबर’ अथवा नानी पालखीवाला यांची अनेक पुस्तके ही विधि व न्याय क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय आहेत. तुलनाच करायची झाली तर व्ही. जे. तारापोरवाला यांच्या ‘टेल्स फ्रॉम द बार अँड बेंच’ या पुस्तकाशी मेहतांच्या पुस्तकाची विषयाच्या निकषावर आधारित तुलना होऊ शकेल; परंतु तरीही तारापोरवाला यांचेच पुस्तक अत्यंत उजवे ठरेल. लेखकाने कोणता विषय निवडावा आणि आपले लिखाण किती मर्यादेत ठेवावे हा लेखकाचा निर्विवाद अधिकार आहे. भारतीय वाचकांना आजवर विधि व न्याय क्षेत्रासंबंधित जे साहित्य उपलब्ध झाले, त्या तुलनेत मेहतांचे साहित्य चोखंदळ वाचकांच्या कितपत पसंतीस उतरेल याबाबत साशंकता आहे. जागतिक स्तरावरील लहान पण महत्त्वाच्या घटनांचे त्यांनी आपल्या पुस्तकात केलेले उल्लेख मेहतांनी व्यग्र वेळापत्रकातही जोपासलेला व्यासंग अधोरेखित करणारे आहेत. जगातील विधि व न्याय क्षेत्रातील लहानसहान घटना, विनोद, अगदी विविध देशांतील न्यायाधीश असले तरी त्यातही आढळणार्‍या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती याची प्रचीती निश्चितच मेहतांचे पुस्तक देते.

‘बेंच विदाउट बॉर्डर्स’ नावाच्या पहिल्याच प्रकरणात मेहतांनी न्यायाधीशपदावरील व्यक्तींचा स्वभाव, गुणधर्म यांचे चपखल वर्णन केले आहे. न्यायाधीशांचे न्यायालयातील वर्तन आणि वाघ-सिंहाचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील वर्णन यांची तुलना मेहता यांनी केली आहे. न्यायाधीशांनी न्यायालयाच्या बाहेरसुद्धा त्यांची कर्तव्ये बजावल्याच्या अनेक घटनांचा उल्लेख विधि व न्याय क्षेत्राबाहेरील व्यक्तींसाठी नवीन माहिती उपलब्ध करून देणारा आहे. न्यायालय हेच न्याय देण्याचे ठिकाण, ते परिस्थितीनुरूप कसे बदलत गेले आणि कोविडकाळात त्याला लाभलेली विश्वमान्यता याचा मागोवा यात घेतला आहे. पहिल्या प्रकरणात जगभरातील अनेक घटनांचे संदर्भ दिले आहेत. अगदी व. पु. काळे यांच्या बदली या कथेतील समारोपाच्या वाक्याची प्रचीती देणारे हे पहिले प्रकरण आहे. न्यायाधीशांचा ‘नैसर्गिक अधिवास’ बदलला तरी वकिलांचे नशीब बदलत नाही.

न्यायाधीशांच्या विक्षिप्तपणाविषयी तुषार मेहतांनी ‘वियर्ड टेल्स ऑफ वियर्डर जजेस’ हे शीर्षक असलेले दुसरे प्रकरण लिहिले आहे. न्यायाधीश पदावरील व्यक्तीही शेवटी माणूसच असते. त्यामुळे मानवी आयुष्यातील गुणदोष न्यायाधीशांच्या अंगी आल्यास नवल ते काय. अनेक देशांतील न्यायाधीशांच्या कृष्णकृत्यांचा मेहतांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे. त्यांचे गुन्हे, गैरवर्तन, अरेरावीच्या घटना याविषयी वाचताना न्यायाधीशांची नियुक्ती करताना संबंधित व्यक्तीचे सर्वांगीण मूल्यांकन होणे किती गरजेचे आहे, याची प्रचीती येते. मेहतांनी अशा अनेक घटनांची वर्णने करताना त्या व्यक्ती न्यायाधीशपदासाठी कशा अयोग्य होत्या हे अधोरेखित केले आहे. इतिहासात अशा न्यायाधीशांना आजच्या तुलनेत कठोर शासन होत होते हे सांगताना त्यांनी त्याबाबत अल्फ्रेड राजाने ४४ न्यायाधीशांना फासावर लटकवण्याची शिक्षा दिल्याचा ऐतिहासिक संदर्भही उदाहरणादाखल नमूद केला आहे. प्रकरणाची सांगता करताना ते लिहितात, शेवटी कायदा न्यायाधीशांना जगवतो पण न्यायाधीश आपल्या विक्षिप्तपणातून अपवादानेच वाचू शकतात.

व्ही. जे. तारापोरवाला यांच्या ‘टेल्स फ्रॉम बार ॲण्ड बेंच’ या न्यायालयाच्या गंभीर वातावरणात कठोर न्यायाधीशांवर अथवा न्यायाधीशांनी केलेले विनोद, हजरजबाबीपणा, मार्मिक टिप्पणी याचा समावेश आहे. पुस्तकात एक प्रकरण- ‘द ब्रिटिश आर्ट ऑफ कोर्टरूम विट’ हे पूर्णत: ब्रिटिश न्यायाधीश, वकिलांना समर्पित आहे. या पुस्तकात भारतीय विधि व न्याय क्षेत्रातील अनेक प्रसंग लिहिलेले आहेत. वकील व न्यायाधीश यांचा हजरजबाबीपणा, त्यातील शब्दकळा मेहतांच्या पुस्तकातील प्रकरणापेक्षा अधिक रंजक असल्याचे आढळते. इंग्रजांच्या ‘ब्रिटिश इंग्लिश’मधील आणि भारतीय विद्वानांच्या अस्खलित इंग्रजीतील शब्दकळा वेगळी भासते. मेहतांनी उल्लेख केलेल्या घटना आणि प्रसंग विनोदी, मार्मिक नाहीत असे नाही परंतु गुणात्मक तुलना केल्यास व्ही. जे. तारापोरवाला यांच्या पुस्तकातील विनोद अधिक श्रेष्ठ आहेत. घटनांतील आपलेपणाच्या अभावामुळे या पुस्तकातील उदाहरणे तितकी प्रभावी वाटत नाहीत. गंभीर विनोद विरुद्ध निखळ व्यंग यात जितके अंतर आहे ते अनुक्रमे मेहतांच्या पुस्तकातील प्रकरण ‘द ब्रिटिश आर्ट ऑफ कोर्टरूम विट’ व व्ही. जे. तारापोरवाला यांच्या ‘टेल्स फ्रॉम बार ॲण्ड बेंच’ यात दिसून येईल. विधि क्षेत्राशी दूरान्वये संबंध नसलेल्या सामान्य वाचकांना तारापोरवाला यांच्या पुस्तकातील घटनांचा अधिक आनंद लुटता येईल. मेहतांच्या पुस्तकातील हे प्रकरण काही अपवाद वगळता विनोद व्यंग निकषाच्या फारच खालच्या पायरीवर विसावणारे आहे. अगदी निरस असे वर्णन केल्यास अतिशयोक्ती ठरू नये. व्यंग, विनोदाचा आनंद चिरंतन टिकणे गरजेचे आहे. कुठल्याही क्षणी त्याचे तारुण्य टवटवीत असले पाहिजे.

‘फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन ऑफ जजेस’ हे प्रकरण अधिक वाचनीय आणि वाचकाला वैचारिक खाद्य देणारे आहे. न्यायालयीन निकालपत्र, आदेश, निवाडे सामान्य व्यक्तींना वाचताना अत्यंत निरस आणि क्लिष्ट भासतात. मेहतांनी या प्रकरणात अनेक देशांतील अतिशय रंजक, विनोदबुद्धीने लिहिलेले निकाल, लहानसे आदेश, न्यायालयीन विश्लेषण यांचे संदर्भ दिले आहेत जे वाचनीय आहेत. प्रकरणाच्या अखेरीस त्यांनी न्यायालयीन निकाल हे सामान्य वाचकांना अधिक रंजक वाटतील, अशा पद्धतीने लिहिले जावेत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मांडले आहे, ही अपेक्षा स्वागतार्ह आहे.

 मेहतांनी आपल्या पुस्तकात अँटॉनिन स्कॅॅलिया यांच्यावर ‘द कोर्ट ऑफ वन’ नावाने प्रकरण लिहिले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात ३० वर्षे न्यायाधीश असलेल्या न्या. स्कॅलिया यांची ख्याती ‘असहमतीचे न्यायाधीश’ अशी होती. न्या. स्कॅलिया यांच्या विविध निकालांचे मेहतांनी विश्लेषण केले आहे आणि संदर्भ दिले आहेत. स्कॅलिया यांची मते, त्यांचा आत्मविश्वास या आणि अशा अनेक बाजू मेहतांनी मांडल्या आहेत. ३० वर्षे न्यायाधीश असलेले स्कॅलिया यांनी या प्रदीर्घ कालावधीत अनेक निकाल दिले. मेहतांनी त्यांचे वर्णन ‘ते केवळ न्यायाधीश नव्हते तर न्यायिक सद्सद्विवेकबुद्धीचेसंरक्षक होते,’ असा उल्लेख केला आहे. जागतिक न्यायक्षेत्रातील एका न्यायाधीशाच्या संदर्भातील माहितीत भर घालणारे प्रकरण म्हणून याचे वर्णन करता येईल.

‘द ॲनाटॉमी ऑफ ए रॉटन जज’ या प्रकरणात मेहतांनी अमेरिकेतील न्यायाधीश जेम्स क्लार्क मॅकरेनॉल्डस यांच्या न्यायाधीश म्हणून कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. न्या. मॅकरेनॉल्डस यांच्या अनेक निकालांचे संदर्भ देताना त्यांच्या निकालांत त्यांचे व्यतिमत्त्व कसे प्रतिबिंबित होते हे वाचकांच्या लक्षात आणून दिले. न्या. मॅकरेनॉल्डस यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या सहकारी न्यायाधीशांपैकी कुणीही त्यांना भेटण्यास गेले नाही, अगदी त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचा एकही सहकारी त्यांच्या अंत्यदर्शनाला हजर नव्हता याचा उल्लेख यात आहे. प्रकरणाचे शीर्षकच त्या व्यक्तीबद्दल सारे काही सांगून जाते.

 पुस्तकातील अखेरची दोन प्रकरणे ही निकालपत्रातील वैविध्य दर्शवणारी आहेत. ‘लीगल रिझनिंग विथ पर्पल सीझनिंग’ या प्रकरणात क्लिष्ट कायदेशीर भाषेत लिहिल्या जाणार्‍या निकालपत्रात अलंकारिक भाषेचा करण्यात आलेला वापर याचा मागोवा घेण्यात आला आहे. ‘पर्पल प्रोज’ या लिखाण कौशल्याचा काही न्यायाधीशांनी निकालपत्रात केलेला वापर लेखकाने संदर्भासहित उपलब्ध करून दिला आहे. ‘पर्पल प्रोज’ म्हणजे काय तर, शशी थरूर यांच्यासारख्या भाषेवर पकड असलेल्या व्यक्तीने आपल्या नैसर्गिक भाषेत निकालपत्र लिहिले तर ते ‘पर्पल प्रोज’च्या श्रेणीत गणले जाईल.

एकूण पुस्तक आणि अखेरचे प्रकरण विरोधाभासी आहे. ‘ऑल इज वेल दॅट बिगिन्स वेल’ या अखेरच्या प्रकरणात निकालपत्रांची सुरुवात ही एक कला असल्याचे नमूद केले आहे. काही कलात्मक निकालांचे संदर्भ आणि लेखक न्यायाधीशांचे निकाल यात नमूद केले आहेत. निकाल लिहिणे, त्यातही कलात्मक लिखाणातून सुरुवात करणे हे प्रत्येक न्यायाधीशाला शक्य होईलच असे नाही. शेवटी निकाल सर्वांपर्यंत उत्तम भाषेच्या माध्यमातूनच पोहोचवता येतो, याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.

तुषार मेहतांचे पुस्तक आणि त्यातील प्रकरणे बघता हे पुस्तक एका मर्यादित वाचकवर्गासच पसंत पडेल. तुषार मेहतांनी पुस्तकात जगभरातील विधि व न्याय क्षेत्रातील बरीच माहिती दिलेली आहे. स्वत:वर मर्यादा घालून वाचकांना काहीतरी नवीन वाचनीय देण्याच्या मेहतांच्या प्रयत्नांचे निश्चित स्वागत केले पाहिजे. त्यांनी व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत साहित्यनिर्मिती केली असणार हे निश्चित. सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता सर्वांना परिचित आहेतच, पुस्तक वाचताना त्यांच्यातील तटस्थ वकिलाची अनेकदा प्रचीती येते. असे असले तरीही मेहतांसारख्या ज्येष्ठ विधिज्ञाकडून लेखक म्हणून ज्या अपेक्षा होत्या, त्यांची पूर्तता होत नाही. मेहतांचे पुस्तक अधिक ‘लॉफुल’ आणि ‘ऑफुल’ होऊ शकले असते आज त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना लेखक म्हणून त्यांच्यावर काही बंधने निश्चितच येत असतील, हे समजण्याजोगे आहे. भविष्यात कधीतरी या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर कदाचित ते तटस्थपणाने भारतीय विधि व न्याय क्षेत्रावर मोकळेपणाने लिखाण करतीलसुद्धा…

द लॉफुल ॲण्ड द ऑफुल, क्वर्की टेल्स फ्रॉम द वर्ल्ड ऑफ लॉ

लेखक – तुषार मेहता

प्रकाशक- रूपा प्रकाशन

पृष्ठे- ३४४, किंमत- ९९५ रु.