राष्ट्रीय अस्मिता पार रसातळाला गेली असेल आणि कमालीच्या न्यूनगंडाने पछाडलेले असेल, तर एखाद्या विशिष्ट कालखंडात प्रसिद्ध झालेला देशभक्तसुद्धा कशी धक्कादायक विधाने करू शकतो, याचे एक नमुनेदार उदाहरण ग. त्र्यं. माडखोलकर यांनीच आपल्या चिपळोणकरांवरील प्रबंधात दिले आहे. उदाहरण आहे, आधुनिक हिंदी राष्ट्रीयत्वाचे एक प्रमुख प्रवक्ते आणि पुढील काळात अखिल भारतीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य असलेले सर फिरोझशहा मेरवानजी मेहता यांचे. १८६७ साली लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’च्या एका बैठकीत त्यांनी वाचलेल्या निबंधाचे शीर्षक होते – ‘मुंबई इलाख्यातील शिक्षणपद्धती’. १८२१ मध्ये एल्फिन्स्टनने पुण्यात जी संस्कृत पाठशाळा स्थापन केली होती, तिचा प्रयोग अपयशी ठरल्याचा निर्वाळा तर मेहतांनी त्या निबंधात दिला होताच; ‘पण विकासक्षमतेच्या दृष्टीने संस्कृत भाषा व साहित्य वांझोटे असल्याचे’ मतही त्यांनी व्यक्त केले होते; एवढेच नव्हे, तर ‘एकोणिसाव्या शतकात सुधारणेच्या अनुषंगाने होत असलेल्या पुनरुज्जीवनाच्या कार्याच्या दृष्टीने ते अगदी निरुपयोगी व घातकही असल्याचा अनुभव त्या प्रयोगात आला’, असाही निष्कर्ष काढून ते मोकळे झाले होते.

संस्कृतसारख्या जगातल्या अत्यंत समृद्ध प्राचीन भाषेचा वारसा अभिमानाने मिरवण्याऐवजी तिची अशी निंदानालस्ती- आणि तीही लंडनसारख्या परक्या देशाच्या राजधानीत- भर बैठकीत करण्यात धन्यता मानणारे सर फिरोझशहा मेहता हे या देशात उमटणाऱ्या एका प्रतिक्रियेचे ढळढळीत उदाहरण होते.

दुसरी प्रतिक्रिया होती, ती काव्यातून उमटली होती आणि महाराष्ट्राचे व पर्यायाने भारताचेच भाग्यविधाते ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध आंग्लपदवीधर विद्वान महादेव मोरेश्वर कुंटे यांनी श्रीशिवरायांवर १२ भागांचे श्लोकबद्ध दीर्घ काव्य रचले आणि त्यातल्या तीन-तीन भागांची दोन पुस्तके १८६९ व १८७१ मध्ये प्रसिद्धही केली. कोल्हापूरमधल्या एका सरकारी शाळेचे मुख्याध्यापक असतानाही कुंटे यांनी जनसामान्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्याच्या सुस्पष्ट हेतूनेच तो सारा खटाटोप केला होता.

विशेष म्हणजे कृष्णशास्त्री चिपळोणकर यांनी त्यांच्या अधिकारात असलेल्या ‘दक्षिणा पारितोषिक मंडळा’च्या वतीने पारितोषिक देऊन त्या दीर्घ काव्याचा उघडपणे गौरव केला होता आणि लोकांचे लक्ष तिकडे आवर्जून वेधले होते. शिवाय त्याच संस्थेच्या वतीने ‘प्रकट विज्ञापन’ देऊन श्रीशिवरायांच्या जीवनावरील मोठ्या काव्यासाठी स्वतंत्र आवाहन केले होते.

त्या आवाहनाला प्रतिसाद देत त्र्यंबकेश्वरच्या गणेशशास्त्री लेले यांनी ‘शिवाजीचरित्र’ नामक दीर्घ काव्य रचले होते. त्या काव्याला ‘दक्षिणा मंडळा’चे पारितोषिक मिळाल्यानंतर स्वत: लेेले यांनीच ते १८७३ मध्ये प्रकाशितही केले होते. प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी त्याच्या काही किरणांचा प्रकाश पसरत असतो, तशाच प्रकारे ती दोन दीर्घ काव्ये प्रसारित झाली होती.

कृष्णशास्त्री चिपळोणकरांचे चिरंजीव विष्णुशास्त्री यांनी १८७४च्या प्रारंभीच ‘निबंधमाला’ या नावाचे मासिक सुरू केले. तसे पाहिले, तर कृष्णशास्त्री यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या ‘शालापत्रक’ नावाच्या नियतकालिकातून १८६८ पासूनच म्हणजे विद्यार्थिदशेत असल्यापासूनच विष्णुशास्त्रींचे लेख प्रसिद्ध होत होते.

१८७२ पासून तर ते एकट्यानेच ‘शालापत्रक’ चालवू लागले. त्यातून इंग्रजी विद्वानांबद्दलची त्यांची जहाल मते ते मांडू लागले, तेव्हाच एक ना एक दिवस हे पत्रक सरकार नक्की बंद पाडणार, हेसुद्धा त्यांनी गृहीत धरले आणि म्हणूनच विचार व्यक्त करण्याचे साधन आपल्यापासून हिरावून घेतले जाऊ नये, या हेतूने त्यांनी ‘निबंधमाला’ या पर्यायी नियतकालिकाची तरतूद केली असे म्हटले तर ते मुळीच वावगे ठरणार नाही; कारण खरोखरच १८७५ मध्ये ‘शालापत्रक’ बंद करण्यात आले. पण त्यापूर्वीच ‘निबंधमाला’ वाचकप्रिय ठरली होती. सुरू झाल्यापासूनच महाराष्ट्रातल्या वाचनक्षम व विचारक्षम वर्गाला राष्ट्रीय अस्मितेची ओळख करून देणारे आणि राष्ट्रोद्धाराच्या नानाविध प्रेरणांना चालना देणारे लेखन त्या नियतकालिकातून प्रसिद्ध होत होते. त्या माध्यमातून विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जो प्रभाव पडला, त्याबद्दल पुढील लेखांकात.