केशव उपाध्ये ,प्रदेश उपाध्यक्ष, भाजप
लोकसभेतील सहा सदस्यांनी साथ सोडल्याचा बाण उबाठांच्या चांगलाच वर्मी लागला. मुंबई महापालिका हातून गेल्यामुळे हताश झालेल्या उद्धवरावांना लोकसभा सदस्य असे गठ्ठ्याने सोडून जातील अशी अपेक्षा नव्हती. उद्या आमदार, मुंबईतले उरलेसुरले नगरसेवक जातील अशी भीती त्यांना वाटू लागली असावी. या संकटातून आपल्याला कोण वाचवेल, या चिंतेमुळे स्वत:ला सर्वशक्तिमान समजणारे उद्धवराव प्रभू रामाचा धावा करू लागले आहेत…
उद्धव ठाकरेंना अचानक प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण झाले. अयोध्येतील राम मंदिरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीतील रकमेच्या अपहाराची घटना उजेडात आल्याच्या पार्श्वभूमीवर उबाठांनी रामरक्षा पठणाची मोहीम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. चला, यानिमित्ताने उबाठांना प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण झाले हेही नसे थोडके.
त्यांच्या गटातून शिवसेनेत जाणार्यांची संख्या वाढू लागल्यामुळेच उबाठांना आपल्या गटाची रक्षा करण्याची आवश्यकता वाटू लागली असावी. त्यातूनच त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण झाले आहे, यात काही शंका नाही. उद्धव ठाकरेंचा स्वभाव, कार्यशैली पाहता त्यांच्या राजकारणाची शैली हेच सांगते की, आज त्यांच्या गटाची जी दुर्दशा झाली आहे त्याला उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय जबाबदार आहेत. आपल्याकडे कार्यकर्ते टिकाव का धरू शकत नाहीत याचा प्रामाणिक विचार उद्धव ठाकरे कधीच करणार नाहीत. कारण तो त्यांचा स्वभावच नाही.
रामरक्षा पठण करण्याची इच्छा झालीच आहे तर उद्धवरावांनी यानिमित्ताने रामायणाचे वाचन करावे, मनन करावे. त्यातून त्यांना आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असणारे प्रसंग वाचण्याची संधी मिळेल आणि त्या प्रसंगी प्रभू रामचंद्रांचे वर्तन कसे होते, आपले कसे आहे हे कळू शकेल. आपल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांचा धावा करण्याची वेळ शत्रूंमुळे नव्हे तर आपल्या निर्णयांमुळेच आली हे कळू शकेल. म्हणूनच उद्धवरावांच्या रामरक्षा वाचनासाठी खूप खूप शुभेच्छा. या माध्यमातून त्यांच्या तोंडी ‘नामर्द’, ‘कोथळा’, ‘दगलबाज’ यासारख्या शब्दांऐवजी संस्कृत शब्द येतील, त्यांची वाणीही शुद्ध होईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
तर मुद्दा होता, उद्धवराव ठाकरेंना प्रभू श्रीरामचंद्रांची आठवण का झाली असावी? सहा लोकसभा सदस्यांनी साथ सोडल्याचा बाण उबाठांच्या चांगलाच वर्मी लागला. मुंबई महापालिका हातून गेल्यामुळे हताश झालेल्या उद्धवरावांना लोकसभा सदस्य असे गठ्ठयाने सोडून जातील अशी अपेक्षा नव्हती. आज खासदार गेले उद्या आमदार, मुंबईतले उरलेसुरले नगरसेवक जातील अशी मनोमन भीती वाटू लागल्याने श्रीरामचंद्रांशिवाय आपल्याला या संकटातून कोण वाचवू शकणार असे वाटल्यामुळे स्वत:ला सर्वशक्तिमान समजणारे उद्धवराव प्रभू रामाचा धावा करू लागले आहेत.
प्रभू रामचंद्रांना आपल्या सावत्र मातोश्रींच्या हट्टामुळे राजसिंहासन सोडावे लागले. सिंहासन सोडताना त्यांना यत्किंचितही दु:ख नव्हते. आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून श्रीरामांनी सिंहासनावरील हक्क सोडला आणि अत्यंत शांतपणे १४ वर्षे वनवासासाठी प्रयाण केले. आपल्या वडिलांनी दिलेले वचन पाळण्यासाठी त्यांनी कुरबूर न करता वनवास स्वीकारला. सत्ता-सिंहासनाचा मोह त्यांच्या वनवासाला जाण्याच्या निर्णयाआड आला नाही. रामायण वाचन सुरू केल्यावर उद्धवरावांना स्वत:च्या राजकारणातील प्रवेशाच्या घटनेची नक्कीच आठवण होईल.
शिवसेनेच्या उभारणीच्या काळात, संघर्षाच्या काळात उद्धवराव कधीच बाळासाहेबांसोबत शिवसेनेत कार्यरत नव्हते. राज ठाकरे हे तरुणपणापासून शिवसेनेच्या कार्यात सक्रिय होते. युवक वर्गात शिवसेनेचा प्रसार करण्यासाठी सुरू केलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेची धुरा राज ठाकरेंनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळली. राज ठाकरे रस्त्यावर उतरून शिवसेनेचे काम करीत होते, अनेक आंदोलनांत सहभागी होत होते. शिवसेनेच्या आंदोलनांमुळे त्यांच्याविरोधात अनेकदा पोलिसात तक्रारी झाल्या. त्यांचे वक्तृत्व, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याची शैली यामुळे बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून राज ठाकरेंकडेच पाहिले जात होते. असे असताना महाबळेश्वरमधील अधिवेशनात उद्धवराव अचानक शिवसेनेत सक्रिय झाले. वडिलांनी संघटना वाढीसाठी खाल्लेल्या खस्ता, केलेला संघर्ष, जमवलेले आणि विलक्षण स्नेहाने जपलेले सामान्य कार्यकर्ते आज कुठे आहेत?
खुद्द भरताला सिंहासनाचा मोह नव्हता. आपल्याकडे सिंहासन सोपवून बंधू राम वनवासात गेले आहे हे कळाल्यावर भरत त्यांना भेटायला जातो आणि त्यांना सिंहासनावर बसण्याची विनंती करतो त्यावेळी प्रभू रामचंद्र त्याला आपण पित्याला दिलेल्या वचनाची आठवण करून देत पितृधर्माचे पालन करत असल्याचे सांगतात. रामायणातील हे प्रसंग कोठे आणि आपल्या चुलत बंधूंना पक्षाबाहेर पडण्यास भाग पाडणारे मातोश्रीतील आधुनिक रामायण कोठे? वंदनीय बाळासाहेबांनी ‘आपल्या घरातील कोणीही सत्तापद घेणार नाही,’ असे जाहीर केले होते. त्यांनी हा शब्द आयुष्याच्या अखेरपर्यंत पाळला. उद्धवरावांनी काय केले तर सामान्य शिवसैनिकाला सत्तापद देण्याऐवजी स्वत: मुख्यमंत्री होऊन बसले. शिवाय आपल्या चिरंजीवालाही मंत्री केले. पित्याच्या शब्दासाठी हसत हसत वनवासात जाणारे श्रीराम कोठे आणि वडिलांचा शब्द पायदळी तुडविणारे नवे रामायण कुठे? रामरक्षा वाचणार आहात तर गीतरामायण ऐका, वाल्मिकी- तुलसी रामायण वाचा, त्यानिमित्ताने राजकारणापासून काही दिवस दूर राहा. रामायण समजून घ्या आणि रामरक्षा म्हणल्यावर स्वामी समर्थांची करुणाष्टके ही वाचा…
अनुदिन अनुतापें तापलों रामराया।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया।।
करुणाष्टके वाचल्यावर उद्धवरावांना कदाचित आपल्या वागण्या-बोलण्याचा पश्चात्ताप होईल, अशी वेडी आशा धरण्यास हरकत नाही. काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी ‘भाजपबरोबरच्या युतीत आम्ही इतकी वर्षे सडलो ’ असे विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्रवासाकडे नजर टाकल्यावर त्यांच्या उथळ निर्णयाचे अनेक दाखले देता येतील. राजकारणात युत्या, आघाड्या होतात, तुटतात, जागावाटप समझोते फिसकटतात पण अशा प्रसंगांत दीर्घकाळ मित्रपक्ष म्हणून ज्याच्याबरोबर काम केले अशा पक्षाच्या नेतृत्वावर असभ्य भाषेत सातत्याने टीका करणे याला राजकीय शहाणपण म्हणत नसतात. राजकारणात परतीचे दोर कापायचे नसतात एवढे प्राथमिक ज्ञानही उद्धव ठाकरेंना नाही. काँग्रेस- राष्ट्रवादी यांचे राज्यात १५ वर्षे आघाडी सरकार होते. आघाडी सरकार चालवताना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वात अनेकदा मतभेदही होत असत. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना विरोध करताना, एकमेकांवर टीका करताना कधीच पातळी सोडली नाही.
भारतीय जनता पक्षाबरोबर २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता भूषविताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजप नेतृत्वाला अफझल खान ठरवले, भाजप सरकारपेक्षा मुघल चांगले होते अशी टीका केली. तरीही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हिंदुत्वाचा व्यापक विचार डोळ्यांपुढे ठेवत शिवसेनेशी पुन्हा युती केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवल्यावर उद्धव ठाकरेंची भाषा अधिकच उद्दाम झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘एक तर तू राहशील नाही तर मी’ अशी भाषा वापरणार्या उद्धवराव ठाकरेंचे राजकीय आकलन किती अल्प, संकुचित होते याची कल्पना येईल. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये अनेकदा मतभेद झाले होते. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी भाजपवर टीका करताना कधीच मर्यादा ओलांडल्या नाहीत. उद्धवरावांवर आज जी वेळ आली आहे ती त्यांच्या नेतृत्व शैलीमुळे आली आहे. रामरक्षा, गीता, गुरुचरित्र कितीही वेळा वाचले तरी त्यांच्या मूळ स्वभावात बदल होणे शक्य नाही.
