अनंत गाडगीळ
राजकीय नेत्यांना त्यांच्या उत्तरदायीत्त्वाचे स्मरण करून देण्यात मुक्त माध्यमे किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, याची साक्ष ब्रिटनमधील नेत्यांच्या मुलाखतींत घडलेल्या किस्से-कहाण्यांतून देणार्‍या पुस्तकाविषयी…

नियतीचा खेळ अजब असतो असे म्हणतात ना! भारतावर १५० वर्षे राज्य करणार्‍या ‘ग्रेट ब्रिटन’ला गेल्या १० वर्षांत सात पंतप्रधान पाहावे लागले. इंग्लंडच्या राजकारणातला हा एक विचित्र विक्रमच म्हणावा लागेल. इंग्लंडमध्ये पंतप्रधानांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंतच्या टीव्हीवरील मुलाखतींचे कार्यक्रम गाजले आहेत. अशा कार्यक्रमांतील गमतीशीर किस्से बीबीसीचे प्रसिद्ध पत्रकार रॉब बर्ली यांनी वाचकांसमोर पुस्तकरूपाने आणले आहेत. किस्से रंजक तर आहेतच, पण ते वाचताना त्या देशाच्या राजकीय संस्कृतीशीही ओळख होण्यास हातभार लागतो.

हुजूर पक्षाच्या २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निवडणूक प्रचारदरम्यान अनेक टीव्ही वाहिन्यांना मुलाखत देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र निवडणूक संपत आली तरी त्यांची वेळ न मिळाल्यामुळे काही वाहिन्यांचे पत्रकार हैराण झाले. या सुमारास आय टीव्हीवरील ‘गुड मॉर्निंग ब्रिटन’ हा कार्यक्रम खूप गाजत होता. संपादक निल थॉप्सन हे जॉन्सन यांच्या मागावरच होते. प्रसिद्ध लीड्स शहराजवळील डेअरीला जॉन्सन भेट देणार असल्याची खबर थॉप्सन यांना मिळाली. पत्रकार जोनाथन स्वेन लवाजमा घेऊन पहाटे ६.३०ला दूध डेअरीपाशी जाऊन थडकले.

दुधाने भरलेली भांडी जॉन्सन स्वत: उचलून टेम्पोत टाकू लागताच, निवडक आमंत्रित छायाचित्रकारांनी फोटो काढण्यास सुरुवात केली, पण डेअरीबाहेर थांबलेले पत्रकार स्वेन यांनी अल्पावधीतच जॉन्सन यांच्यावर कॅमेरा रोखत ओरडून विचारले, ‘‘पंतप्रधान महोदय, निवडणूक संपत आली, मुलाखत देणार आहात की नाही? उत्तर द्या.’’ पंतप्रधानांचे सहायक रॉब ओक्ष्ले यांनी कॅमेरा झाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटले चित्रीकरण थांबले आहे. त्यांनी एक जबरदस्त शिवी हासडली, पण चिडलेल्या स्वेन यांनी प्रश्न विचारणे सुरूच ठेवले. शेवटी जॉन्सन चक्क कोल्ड स्टोअरेजमध्ये जात मागील दाराने निसटले. शेवटी व्हायचे तेच झाले. ते दृश्य त्या वाहिनीने २४ तास सलग दाखवण्यास सुरुवात केली. इंग्लंडमधील पत्रकार पंतप्रधानाला ओरडून जाब विचारू शकला होता, कारण त्यानंतर ना स्वेन यांच्या घरी ना त्यांच्या कार्यालयावर सरकारी यंत्रणांनी छापे घातले.

युरोपीय महासंघाने सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये ‘युरो’ हे एकच चलन ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. १९९९ च्या सुरुवातीचा हा किस्सा- ‘युरो’ स्वीकारायचे की नाही, यावर इंग्लंडमध्ये खलबते सुरू होती. एका रविवारी, उपपंतप्रधान मायकेल हेसेल्टाइन यांची बीसीसीवर तर आरोग्यमंत्री स्टीफन डोरेल यांची आय टीव्हीवर याच विषयावर मुलाखत होती. निवडणुका जवळ आल्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला नाही असे हेसेल्टाइन यांनी बीबीसीवर सांगितले. तर त्या उलट, सार्वमत घेतल्याशिवाय आम्ही ‘युरो’ स्वीकारणार नाही, डोरेल आय टीव्हीवर चुकून बोलून गेले. डोरेल स्टुडिओतून बाहेर पडताच एकामागोमाग एक पक्षनेत्यांचे फोन.  खरे बोलणे महागात पडते हे डोरेल या मुलाखतीतून शिकले असतील.

मार्गारेट थॅचर यांच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम अर्थमंत्री निगेल लॉवसन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने मोठे राजकीय संकट उद्भवले. थॅचरबाईंचे चाहते पत्रकार ब्रायन वॉल्डन त्यांची मुलाखत घेत होते. ‘‘लॉवसन यांच्या या नेमणुकीवर आक्षेप असताना वॉल्टर्स यांना सल्लागार म्हणून नेमण्याची गरजच काय होती, तुम्ही विनाकारण संकट ओढवून घेतले असे वाटत नाही का,’’ असा प्रश्न वॉल्डन यांनी केला. आपल्या विश्वासातल्या पत्रकाराकडून असा प्रश्न येणे थॅचरबाईंना अपेक्षित नसावे. मात्र ‘‘लॉवसन यांनी राजीनामा देण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली नाही.

मग त्यांनी का राजीनामा दिला हे मला कसे कळणार,’’ असे म्हणत गोंधळलेल्या थॅचरबाईंनी वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला, पण वॉल्डन काही मुद्दा सोडेनात. त्यावर ‘‘देशासमोर अनेक प्रश्न असताना तुम्ही एक विषय का घेत आहात,’’ असा प्रश्न चिडलेल्या थॅचरबाईंनी विचारला. त्यावर ‘‘तुम्ही स्वत:चेच निर्णय लादता. वर्चस्ववादी आहात, असे लोक म्हणतात,’’ अशी थेटच टीका वॉल्डन यांनी केली. त्यावर ‘‘तुम्हीच वर्चस्ववादी आहात. संपूर्ण मुलाखतीत वर्चस्ववादाचेच दर्शन घडत आहे,’’ अशा शब्दांत थॅचरबाईंनी वॉल्डन यांना फटकारले. इंग्लंडच्या राजकीय इतिहासात ही मुलाखत खूप गाजली. थॅचर आणि वॉल्डन त्यानंतर कधीही एकमेकांशी बोलले नाहीत. थॅचर यांच्या राजकीय अंताची सुरुवात या मुलाखतीपासून झाली, असे मानले जाते. वर्षभरात थॅचर यांना राजीनामा द्यावा लागला.

प्राध्यापक पिटर बुल यांनी नेते-प्रवक्ते पत्रकारांचे प्रश्न कसे टाळतात याचे ३० प्रकार एका सूक्ष्म विश्लेषणातून दाखवून दिले. यातील काही निवडक प्रकार म्हणजे, प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे, प्रश्नकर्त्यालाच प्रतिप्रश्न करणे वा याचे उत्तर मी आधी अनेकदा दिले आहे असे म्हणत लक्ष अन्यत्र वळवणे इत्यादी. ९०च्या दशकापर्यंत राजकीय नेते सरासरी ४५ टक्के प्रश्नांची उत्तरे सरळ देत. २०२० च्या सुमारास हे प्रमाण ३५ टक्क्यांवर घसरले आणि हल्ली तर ते २५ टक्क्यांच्याही खाली घसरू लागले आहे, असे प्रा. बुल सांगतात.

आपल्या देशात, १२ वर्षे सर्वोच्च पदावर राहून एकदाही पत्रकार परिषदेला सामोरे न जाता ‘मन की बात’ मांडण्याचा लवकरच एक विश्वविक्रम होणार आहे.

इंग्लंडमध्ये निर्भीड पत्रकारांनी पंतप्रधानांपासून ते विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांना सळो की पळो करून सोडल्याची वा अनेक उदाहरणे आहेत. आपल्याकडे टीव्हीवरील चर्चेसाठी सामान्यपणे स्टुडिओत एका खुर्चीवर सत्ताधारी पक्षाचा नेता वा प्रवक्ता तर त्याच्या समोरच्या खुर्चीवर विरोधी पक्षातील नेता वा प्रवक्ता अशी रचना असते. ‘सोफा चॅट’ या बीबीसीवरील लोकप्रिय कार्यक्रमात याउलट रचना असे. परस्परविरोधी पक्षांचे नेते एकाच सोफ्यावर बसत आणि अनौपचारिक वातावरणात आपापली बाजू मांडत.

अशाच एका सोफा चॅटसाठी गाजलेले पत्रकार अँड्र्यू मार यांनी हुजूर पक्षाचे नेते बोरिस जॉनसन व मजूर पक्षनेते एड मिलिबँड यांना आमंत्रित केले होते. जॉनसन हे स्थूल तर मिलिबँड हे मध्यम बांध्याचे. त्यातून नेमका तो सोफा अरुंद. यामुळे मिलिबँड यांना सोफ्यावर जागाच पुरेना. चर्चा सुरू झाली, वाद वाढले, दोघेही वरच्या पट्टीत जसजसे एकमेकांवर ओरडू लागले तसतसा सोफाही हलू लागला. प्रेक्षकांत हास्याचे फवारे. अखेर अँड्र्यू मार यांना कार्यक्रम संपल्याचे घोषित करावे लागले.

राजकारण्यांच्या मुलाखती काय वळण घेतील हे सांगणे अवघड आहे. पंतप्रधान टोनी ब्लेयर यांची प्रसिद्ध पत्रकार जोनाथन डिंबलबाय यांनी एक मुलाखात घेतली होती. ‘‘सद्दाम हुसेन यांच्याकडे रासायनिक अस्त्रे नव्हती, संयुक्त राष्ट्रांचा इराकच्या नि:शस्त्रीकरणाचा ठरावही होता, २००३ ला शस्त्र तपासणी समाप्त झाली होती, तरीही इंग्लंडला तुम्ही इराक युद्धात का उतरवलेत,’’ असा प्रश्न डिंबलबाय यांनी विचारला. ‘‘सद्दाम यांना पदावरून हटवल्याशिवाय उद्दिष्ट पूर्ण होणार नव्हते, म्हणून युद्ध हा एकच पर्याय उरला. इंग्लंडचे हित डोळ्यांसमोर ठेवून विचारपूर्वक आम्ही हा निर्णय घेतला,’’ ब्लेयर गंभीरपणे उत्तरले. ‘‘युद्ध संपले, सद्दाम फाशी गेले, पण इराकमध्ये काहीही सापडले नाही. इंग्लंडला इराक युद्धात उतरवण्याचा, तुमचा निर्णय चुकला हे तुम्ही आज टीव्हीवर प्रांजळपणे कबूल केल्यास इथे

उपस्थित सर्व महिला तुम्हाला आगामी निवडणुकीत मत देऊ,’’ असे एका महिलेने म्हटले. (आपल्याकडे अशा महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेत समाविष्ट केले जाईल.)

‘‘अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागार कोंडोलिसा राइस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आणि इंग्लंडचे राजदूत क्रिस्तोफर मायर यांच्या उपस्थितीत, परराष्ट्र व्यवहार अधिकार्‍यांनी इराक युद्धात भाग घेण्यासाठी इंग्लंडवर कितीही दबाव आला तरीही ब्लेयर झुकणार नाहीत असे स्पष्ट सांगितले होते. पुरावा म्हणून सदर संभाषणाचे दस्तऐवज मी समोर ठेवत आहे,’’ असे डिंबलबाय यांनी सांगताच सुरुंगावरच पाय ठेवल्यासारखी ब्लेयर यांची अवस्था झाली. ‘‘सदसद्विवेकबुद्धीला स्मरून खूप विचाराअंती हा मी निर्णय घेतल्यामुळे माझा निर्णय चुकला असे मी निवडणुकीच्या तोंडावर, उद्याच्या वृत्तपत्रीय मथळ्यांकरिता अजिबात म्हणणार नाही,’’ असे अनेक अर्थ निघणारे उत्तर ब्लेयर यांनी दिले. सद्दाम यांचे भूत टोनी ब्लेयर यांच्या मानगुटीवर कायमचे बसले होते. प्रत्येक कार्यक्रमात त्यांना या मुद्द्यावरील प्रश्नांनी भंडावून सोडले जात असे. परिणामी सार्वत्रिक निवडणूक ब्लेयर यांच्या पक्षाने जिंकली खरी पण पक्षाची तब्बल ४० लाख मते कमी झाली. 

नव्वदच्या दशकाच्या अखेरीस झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यानचा हा किस्सा… पॅडी ॲशडाऊन हे ‘लिबरल डेमोक्रॅट’ या इंग्लंडमधील एका विरोधी पक्षाचे नेते होते. सत्तेवर आल्यास श्रीमंतांवरील कर आम्ही वाढवू आणि ती रक्कम शिक्षणावर खर्च करू या घोषणेने, गरीब व मध्यमवर्गात लोकप्रियतेची लाट निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले होते. प्रचाराच्या रणधुमाळीत एलडब्ल्यूटी वाहिनीवर मुलाखत झाली. त्यात ‘‘तुम्ही लोकप्रिय घोषणा केलीत खरी, पण हे पैसे खर्च करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीच. तो स्थानिक संस्थांना आहे. तुम्ही जनतेशी खोटे बोललात, असे वाटत नाही का?’’ असा दणका देणारा पहिलाच प्रश्न पत्रकार जोनाथन डिंबलबाय यांनी विचारला. 

‘‘तुमच्या सहकार्‍यांनी विषयाचा सविस्तर अभ्यास न करताच तुम्हाला ही प्रश्नावली दिलेली दिसते,’’ असा टोमणा ॲशडाऊन यांनी डिंबलबाय यांना लगावला. राजकारणात मुरलेले ॲशडाऊन इथेच न थांबता, ‘‘सदर पैसा कसा खर्च करणार याचा संपूर्ण तपशील आम्ही जाहीरनाम्यात दिला आहे,’’ अशी बेमालूमपणे थाप मारत मोकळे झाले. डिंबलबाय मात्र गोंधळून गेले. कार्यक्रमाचे समन्वयक रॉब बर्ली (या पुस्तकाचे लेखक) यांनी कपाळावर हात मारला. कारण त्यांनी चार दिवस बसून त्या जाहीरनाम्यातील शब्द न शब्द कोळून प्यायला होता. जाहीरनाम्यात याचा उल्लेख नसतानाही, एकापाठोपाठ एक दिशाभूल करणारी उत्तरे ॲशडाऊन बेधडक देत होते.

मुलाखत संपताच ॲशडाऊन संपादकांच्या खोलीत चहा पिण्यासाठी आले. कार्यक्रमाचे निर्माते व संशोधक अशी रॉब बर्ली यांची डिंबलबाय यांनी ओळख करून दिली. क्षणार्धात ॲशडाऊन यांनी, ‘‘आम्ही जाहीरनाम्यात याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तुमची माहिती बरोबर आहे, पण शब्दांत पकडले जाण्यापेक्षा मी पळवाट म्हणून मुलाखतीत असे उत्तर दिले,’’ अशी थेट कबुली दिली. हे ऐकून एकच हशा पिकला.

रॉब बर्ली यांच्या मते, पत्रकारांना तोंडघशी पाडणारा राजकारण्यांचा आवडता शब्द म्हणजे ‘विपर्यास’. एकदा इंग्लंडच्या एका मंत्र्याने समलिंगी विवाहांना आमचा पाठिंबा आहे, असे विधान टीव्हीवरील कार्यक्रमात केले. लगेचच, मुलाखतकाराने काही वर्षांपूर्वीच्या बातम्यांची कात्रणेच मंत्र्यासमोर ठेवली. त्यात त्या मंत्र्याने ‘‘समलिंगी हा अत्यंत किळसवाणा-राक्षसी प्रकार आहे,’’ असे म्हटले होते. दुसर्‍या दिवशी, मंत्र्यांनी नेहमीचाच ‘विपर्यास’ हा शब्द वापरून पळवाट काढली.

राजकीय नेत्यांच्या टीव्हीवरील मुलाखतींसंदर्भात इंग्लंडमध्ये केलेल्या अशाच एका सर्वेक्षणात तीन गमतीशीर बाबी पुढे आल्या. मोठमोठ्या आवाजात ओरडून बोलणारा मुलाखतकार दर्शकांना आवडत नाही. नेत्यांचे विचार प्रेक्षकांना शांतपणे ऐकायचे असतात. यामुळे मुलाखतकार त्यांना वारंवार रोखू लागला तर प्रेक्षकांना नेत्याबद्दलच सहानुभूती वाटू लागते आणि टीव्हीवरील चर्चा किती उद्बोधक व फायदेशीर झाली, किती प्रेक्षकांनी ती पाहिली यापेक्षा ती समाजमाध्यमांवर किती ‘व्हायरल’ झाली यावरून त्याची लोकप्रियता ठरविण्याची फॅशन दुर्दैवाने आली आहे.

‘‘आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाही, नाही, नाही’’, ‘‘वेगळ्या विदर्भाची मागणी करा, पण महाराष्ट्राचा अपमान करू नका’’, ‘‘यासाठी एकवेळ अविवाहित राहीन’’ म्हणणार्‍यांसाठी महाराष्ट्रातील एखादी वृत्तवाहिनी कार्यक्रम सुरू करेल का?  

माजी आमदार

anantvsgadgil@gmail. com