युक्रेनमध्ये संरक्षणमंत्र्यांची तेथील लष्करप्रमुखांच्या दबावाखाली हकालपट्टी करण्याच्या अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. रशियाकडून अग्निवर्षाव होत असूनही राजधानी कीव्हमध्ये या निर्णयाविरोधात विराट मोर्चे निघाले. या जनक्षोभाची दखल घेऊन झेलेन्स्की सरकारने अखेर लष्करप्रमुखासही हटवले असून, नवीन तरुण व्यक्तीस लष्करप्रमुखपदी नेमले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन जवळपास साडेचार वर्षे लोटली.

या काळात झेलेन्स्की आणि युक्रेनच्या जनतेने सैन्यसंख्येत आणि शस्त्रसामग्रीत कितीतरी वरचढ असलेल्या रशियाचा खंबीरपणे मुकाबला केला आणि अजूनही करत आहेत. यामुळे सुरुवातीच्या मुसंडीनंतर रशियाला फार पुढे सरकता आले नाही. तरीदेखील युक्रेनच्या जवळपास २० टक्के भूभागावर रशियाचा कब्जा असून, या भूभागाची सोडवणूक करण्यासाठी युक्रेनी फौजा प्राणपणाने लढत आहेत. झेलेन्स्की यांनी तर क्रायमिया हा प्रांतदेखील रशियाच्या जोखडातून सोडवून घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आहे. युक्रेनच्या या प्रांतावर रशियाने सन २०१५मध्ये अवैध कब्जा केला.

क्रायमिया, डॉनेत्स्क आणि लुहान्स हे प्रांत रशियनबहुल असल्यामुळे त्यांवर दावा सांगून आक्रमण करण्याची मग्रुरी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दाखवली. त्यास अमेरिकेसह बहुतेक पाश्चिमात्य सत्तांनी विविध तीव्रतेचे निर्बंध लादण्यापलीकडे काहीच प्रतिबंध केला नाही. जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष असताना आर्थिक आणि मर्यादित लष्करी पुरवण्याबाबत अमेरिकेने गांभीर्य आणि सातत्य तरी दाखवले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षेतखालील अमेरिकेने दोन्ही दाखवलेले नाही. याशिवाय पुतिन यांच्यावर शस्त्रसंधी किंवा युद्धसमाप्तीसाठी पुरेसा दबावही आणला नाही. उलट अमेरिकेच्या आधिपत्याखालील ‘नेटो’ संघटनेने युक्रेनला सातत्याने मदत केली, तर विध्वंसक परिणाम संभवतात या पुतिन यांच्या धमकीला प्रमाणाबाहेर महत्त्व दिले गेले.

या सगळ्या घडामोडींमध्ये युक्रेनचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपलीच, हे झेलेन्स्की यांनी ओळखले. सुरुवातीस अमेरिका आणि नंतर फ्रान्स, ब्रिटन, जर्मनीसारख्या देशांकडून सामग्री स्वरूपात मदत मिळाली; पण रशियावर बाजी उलटवण्यासाठी ती पुरेशी नव्हती. यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन डावपेचाचा अवलंब युक्रेनने केला. ड्रोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संख्यात्मक वर्चस्वाशी गुणात्मक वर्चस्वाने टक्कर देता येते हे दाखवून देण्याची कल्पकता आणि हिंमत युक्रेनचे युवा संरक्षणमंत्री मिखाइलो फेदोरॉव यांनी दाखवली.

ड्रोन आणि रोबोंचा अधिकाधिक वापर करून कमीत कमी मनुष्यहानी होऊ देणे आणि रशियाच्या पारंपरिक सज्जतेला कोंडीत पकडणे हे त्यांनी अमलात आणलेले डावपेच यशस्वी ठरू लागले होते. पण यावरून त्यांचे युक्रेनच्या सैन्याधिकार्‍यांशी खटके उडू लागले. युक्रेनचे लष्करप्रमुख ओलेक्सांद्र सिस्र्की यांनी इतर सैन्याधिकार्‍यांच्या मदतीने फेदोरॉव यांना जाहीर विरोध करण्यास सुरुवात केली. रशियन आक्रमणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फेदोरॉव यांनी पारंपरिक संरचना आणि आदेश-साखळीला फाटा दिला होता.

अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि संपर्कसाधने सैनिकांनी स्वत:हून, स्वत:च्या पसंतीची खरेदी करावीत, अशी सूचना त्यांनी केली. यामुळे सिस्र्की नाराज झाले. युक्रेनच्या लष्कराचे पारंपरिक सामग्री पुरवठादार, कंत्राटदार यांचीही त्यांना साथ होती. कारण आधुनिक युद्धतंत्रात त्यांच्या मालाचा उठाव आणि मागणी कमी होऊ लागली होती. फेदोरॉव उच्च तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आग्रही होते. त्यांच्या पुढाकारामुळे युक्रेनच्या सैनिकांची जीवितहानी मर्यादित झाली. तसेच ड्रोनच्या वापरामुळे क्रायमिया आणि कित्येकदा थेट मॉस्कोपर्यंत प्रहार करण्याचे धारिष्ट्य युक्रेन दाखवू लागला होता.

फेदोरॉव यांच्या धडाक्यामुळे ते युवा वर्गात विलक्षण लोकप्रिय होते. तसेच, विद्यमान युद्धात रशियावर बाजू उलटवता येईल याविषयी या वर्गात आशा निर्माण झाली. मात्र, झेलेन्स्की यांनी त्यांच्या लष्करप्रमुखांच्या दबावाखाली झुकून संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी केली. यातून प्रचंड जनक्षोभ उसळला. मोर्चे निघाले. रशियाविरुद्ध इतका काळ दिसून आलेली एकी केवळ एका निर्णयामुळे धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले. एका अर्थाने हा दोन पिढ्यांतील वाद होता. सिस्र्की ६० वर्षांचे आहेत, तर फेदोरॉव ३५ वर्षांचे. पण जनक्षोभाची दखल झेलेन्स्कींना घ्यावी लागली. त्यांनी फेदोरॉव यांच्या एका खंद्या समर्थक सैन्याधिकार्‍याला लष्करप्रमुखपदी नेमले आणि युक्रेनच्या निर्धाराला तडे जाणार नाहीत याची खबरदारी घेतली.