Premium

अन्वयार्थ : आवाहनामागील कटुता

युक्रेनियन मुलांच्या संशयित अपहरणावरूनच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय युद्धगुन्हेविरोधी पकड वॉरंट जारी झाले आहे.

ukrainian president zelensky speech in un
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की file photo

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलेले भाषण काही बाबतींत लक्षणीय ठरले. रशियाने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतरचे झेलेन्स्की यांचे संयुक्त राष्ट्रांमधील हे पहिलेच सदेह भाषण. युक्रेन युद्धाचा वापर रशियाकडून जागतिक मूल्याधारित व्यवस्थेविरुद्ध केला जात आहे. ज्या देशांचा या व्यवस्थेवर विश्वास आहे त्यांनी हा धोका ओळखावा असा इशारा झेलेन्स्की देतात. त्यांचा रोख अमेरिकादी पाश्चिमात्य देशांकडे नसून रशियाशी काडीमोड न घेतलेल्या व प्राधान्याने भारतासारख्या ‘ग्लोबल साऊथ’ विश्वातील देशांकडे अधिक दिसतो.  रशियाव्याप्त भागांमधून युक्रेनी मुलांचे अपहरण करून त्यांची रवानगी रशियात करण्याविषयीच्या गंभीर आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. युक्रेनियन मुलांच्या संशयित अपहरणावरूनच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय युद्धगुन्हेविरोधी पकड वॉरंट जारी झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ: रखडलेले पुनर्गठन

या मुलांचे रशियन कुटुंबामध्ये पुनर्वसन करून, त्यांना रशियन पारपत्र देऊन युक्रेनविरोधात त्यांना वळवण्याच्या बातम्यांना काही रशियन अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. याशिवाय कृत्रिम अन्नटंचाई आणि अण्वस्त्रांची दहशत यांचा वापर पुतिन कशा प्रकारे करत आहेत याकडेही झेलेन्स्की लक्ष वेधतात. युक्रेनमधील झापरोझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाचा ताबा गेले काही महिने रशियाकडे असून, त्याआधारे रशिया कोणत्याही प्रकारचे दु:साहस करू शकतो, हे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनीही यापूर्वी वारंवार दाखवून दिले आहे. काळय़ा समुद्रातील धान्यपुरवठा करार मोडीत निघाल्यानंतर आफ्रिका आणि आशियातील काही देशांमध्ये पुन्हा अन्नधान्यटंचाईची समस्या उग्र बनू लागली आहे. युक्रेन आणि रशियाकडून आयात होणाऱ्या धान्यावर कित्येक आफ्रिकी देशांची भूक भागत होती. रशियाने काही काळ काळय़ा समुद्रातील युक्रेनी बंदरांमधून निर्यातीसाठी निघालेल्या धान्याला सुरक्षित जलमार्ग सुनिश्चित केला होता. पण यासंबंधीच्या कराराचे पुनरुज्जीवन होऊ न शकल्यामुळे, रशियन संरक्षण हमीच्या अभावापायी या जहाजांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: सापळय़ात अडकते कोण?

पुतिन यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही हे जोरकसपणे मांडताना झेलेन्स्की यांनी वॅग्नर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा दाखला दिला. युक्रेनच्या आक्रमणादरम्यान रशियन सैन्याला मदत करणारे प्रिगोझिन नंतर पुतिन यांच्याविरोधातच बंड करू लागले. त्यांचा अलीकडेच विमान अपघातात संशयास्पद मृत्यू झाला. तो अपघात पुतिन यांच्याच हस्तकांनी घडवून आणला असावा, असे मानले जाते. युक्रेन युद्ध सध्या जवळपास अनिर्णितावस्थेत आले आहे. युक्रेनी प्रतिहल्ल्यांना म्हणावी तशी धार आणि यश प्राप्त झालेले नाही. तर युक्रेनचे पाच प्रांत वगळता रशियन सैन्यालाही सुरुवातीचा रेटा साधता आलेला नाही. पाश्चिमात्य देशांकडून – विशेषत: ‘नाटो’च्या सदस्य देशांकडून अप्रत्यक्ष मदतीवरच युक्रेनचे सैन्य सध्या विसंबून आहे. पण या मदतीच्या प्रमाणाला आणि ती मिळण्याच्या वेगाला मर्यादा आहेत. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे व्यासपीठ झेलेन्स्की यांनी निवडले असावे. परंतु त्यांच्या आवाहनात जी-२० परिषदेच्या मसुद्यात झालेल्या युक्रेनच्या अवहेलनेविषयीची कटुताही प्रतिबिबित झाली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukrainian president zelensky speech in united nations general assembly zws

First published on: 21-09-2023 at 04:20 IST
Next Story
चिंतनधारा : जग कसे चालले आहे?