गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने प्रेरित होऊन ‘फोडणे’ या कलेत कसे पारंगत व्हायचे यासाठी मराठी शाळांमधील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी जळगावात एकत्र आले. भाजप पक्ष फोडतो तसेच इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी फोडायचे असतील तर त्या पक्षाने जे धोरण राबवले तेच राबवावे लागेल असे एकाने सुचवताच त्यावर चर्चा सुरू झाली.
आजवर फोडाफोडीच्या राजकारणाबाबत आपण जे वाचले त्यावरून यंत्रणांचा दबाव, पैशाची व पदाची लालूच हेच सूत्र यामागे दिसते. पण ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत राबवायचे कसे? तेवढ्यात एक उभा झाला. यंत्रणा म्हणजे आपले पालकमंत्री. त्यांच्या नावाचा वापर करून पालकांवर दबाव आणायचा. ज्यांचे कोर्टकज्जे प्रलंबित आहेत त्यांना त्यातून मंत्री मार्ग काढून देतील. फक्त मुलाला मराठी शाळेत पाठवा असे म्हणायचे. त्यांनी नाही म्हटले तर यंत्रणांकडून त्रास वाढवा असे थेट गुलाबरावांना सांगायचे. ते नाही म्हणणार नाहीत. ऐकून इतरांना हुरूप आला. मग दुसरा म्हणाला, लालूच थेट विद्यार्थ्यांना दाखवायची. इंग्रजी शाळा सुटली की त्यांना रस्त्यात गाठायचे. रोज ‘स्क्रीन टाइम’साठी अर्धा तास दिला जाईल. पोषण आहाराला फाटा देत पिझ्झा व बर्गर दिला जाईल. शैक्षणिक साहित्यासह ‘कॉमिक्स’ दिली जातील. कंटाळा आला की खेळण्याची मुभा दिली जाईल. घरून मोबाइल आणायला बंदी असेल तर शिक्षकांचा मोबाइल ‘स्क्रीन टाइम’साठी उपलब्ध करून दिला जाईल. अनलिमिटेड डेटा मिळेल. गणवेशाची अट काढून टाकली जाईल. इंग्रजी शाळेतला विद्यार्थी हुशार असतो असे सांगून वर्गाचा ‘मॉनिटर’ म्हणून घोषित केले जाईल. हे ऐकून सारेच आनंदले.
मग तिसरा म्हणाला, ज्या पालकांचे कोणतेही काम यंत्रणेकडे प्रलंबित नाही अशांना मराठीतून मुलगा शिकवा, मंत्र्यांकडून शासकीय नोकरीची हमी असे आमिष दिले तरी हरकत नाही. ऐकताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मग कोणते व कुठले विद्यार्थी फोडायचे यावर चर्चा सुरू झाली. शाळानिहाय आढावा घेतला जाऊ लागला. प्रत्येकाने पाच विद्यार्थी फोडले तरी मराठी शाळांचे वर्ग सुरळीत चालतील असे गणित मांडले गेले. तेवढ्यात चौथा उभा राहिला. या फोडाफोडीसाठी लागणार्या पैशाचे काय? सध्या आपण विद्यार्थी जमवण्यासाठी जी धावाधाव करतो त्यावर पगारातले २५ टक्के खर्च होतात. इंग्रजीचे विद्यार्थी या पद्धतीने फोडायचे असतील तर अधिकचा खर्च लागेल. तो कुठून करायचा? यावर जमलेले सर्व एकमेकांकडे बघू लागले. त्यातल्या काहींनी नेमका खर्च किती याची आकडेमोड सुरू केली. प्रतिविद्यार्थी २५ हजार असा निष्कर्ष निघताच सर्वांच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे बघून पाचवा म्हणाला, चला गुलाबरावांकडेच जाऊ, त्यांच्याकडून खर्चाचे पैसे मागू.
सारे शिक्षक त्यांच्या संपर्क कार्यालयात गेले. म्हणणे ऐकून गुलाबराव हसत म्हणाले, ‘अरे, तुम्ही माझे म्हणणे इतक्या गंभीरपणे घ्याल असे वाटलेच नाही. मुख्यमंत्री व आमचे उपमुख्य नेहमीच माझ्या वक्तव्याला हसण्यावारी नेतात, हेही ठाऊक नाही का तुम्हाला? आणि पैशाचे म्हणाल तर भाजपने आमची माणसे फोडू नयेत म्हणून भरपूर खर्च करावा लागतो आम्हाला. तुम्हाला कुठून देणार?’ हे ऐकून सर्व शिक्षक हिरमुसल्या चेहर्याने बाहेर पडले.
