काँग्रेसवाल्यांनो, सावधान! आता केवळ रात्रच नाही तर पावसाळी दिवसही वैर्‍याचा आहे. आजवर तुमचा सामना पक्ष वा पेपर फोडणार्‍यांशी झाला असेल, आता ढग फोडणार्‍यांपासून बचाव कसा करायचा याचे प्रशिक्षण घ्या. सततच्या विजयामुळे सत्ताधार्‍यांमध्ये निसर्गालाही नमवण्याची ताकद निर्माण झाली असून तुमच्या आंदोलनातली हवा काढून घेण्यासाठी ते ढगसुद्धा फोडू शकतात याचे संकेत नाशकात तुम्हाला मिळाले. प्रत्यक्षात ते ढग फोडलेले आमदार जातात तसे गुजरातकडे वळवण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले असले तरी ही ‘फुटी’ न घडू देण्यामागे तुमच्या आंदोलनातली तुरळक गर्दी हेच कारण आहे. जो इशारा आजवर हवामान खात्याला कधी देता आला नाही तो देण्याची किमया ‘एल देवा’ (निनो नाही)ने साधली व तुम्ही पार गडबडून गेलात. नंतर तुमच्या हर्षवर्धनाने कितीही तोंडसुख घेतले असले तरी ‘राजाराम सत्याग्रहाचा’ जो विचका व्हायचा तो झालाच. शेवटी तुमची गाठ पुराणमतवाद्यांशी आहे हे लक्षात असू द्या.

तुम्ही रामाचे नाव घेत आंदोलन सुरू केले तर त्यांनी महाभारतातील पर्जन्यास्त्र तुमच्यावर वापरले. ढगफुटीचा इशारा ‘फेक’ नाही, हे दर्शवण्यासाठी संकटमोचक गिरीशभाऊंना तातडीने नाशिकला पाठवले. त्यांनी ढगांची पळवापळवी करून सिद्धपुरुष असल्याचे दाखवून दिले. या राज्यातून केवळ उद्योगच गुजरातला जात नाहीत तर ढगसुद्धा जातात हे त्यांनी हवामान खात्याचा आधार न घेता सप्रमाण सिद्ध करून दाखवले. राजकारणात यश मिळवण्यासाठी हवामान खात्याचा वापर करणे ही तुमचीच जुनी सवय. तुमच्या पक्षातल्या पूर्वसुरींनी अनेकदा चांगल्या पावसाचे आमिष दाखवून निवडणुका जिंकल्या. आताचे सत्ताधारी तुमच्या दहा पावले पुढे आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना हवामान खाते अथवा पावसावर विसंबून राहावे लागत नाही. मात्र विरोधकांना नामोहरम करण्यासाठी याच खात्याचा वापर जरूर करता येऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. कधी प्रशासनाची तर कधी पोलिसांची भीती दाखवून आंदोलने दडपणे हे डावपेच आता जुने झाले आहेत. त्यांच्या भात्यातून आता असे नवनवे अस्त्ररूपी बाण निघतात व त्याच्या वाराने घायाळ होण्यापलीकडे तुम्हाला काहीही करता येत नाही. त्यामुळे भविष्यात कुठलेही आंदोलन करताना ‘फोडणे, फूट, फुटी’ असे शब्द सत्ताधार्‍यांच्या तोंडून निघाले की वेळीच सावध व्हा! आता त्यांनी ढग फोडले, पुढे काय फोडतील याचा नेम नाही. तुमचे कार्यकर्ते बिचारे पापभिरू, निसर्गाचा आदर करणारे. ढगफुटी हा शब्द कानावर पडताच घरी बसून राहिले. त्यातून फावले सत्ताधार्‍यांचे. ढगफुटी हा कमी वेळात जास्त पाऊस पडल्यानंतरचा निष्कर्ष असतो, इशारा नाही हे तुमच्या लक्षात आधी आलेच नाही. नंतर आले तोवर उशीर झाला होता.

आंदोलन असो वा इशारा. वेळ साधता आली पाहिजे. सत्ताधार्‍यांना जे इशार्‍यातून साधता आले ते तुम्हाला आंदोलनातूनही साधले नाही हे मान्य करा व भविष्यात सजग व्हा! आता तर गिरीशभाऊंनी नव्या तंत्रज्ञानाचे सूतोवाच केले आहे. खालून पाणी पाठवून वर ढग तयार करण्याचे. सारेच पालकमंत्री त्यांच्याकडून याचे लवकरच प्रशिक्षण घेतील व जिल्ह्याजिल्ह्यांतील तुमची आंदोलने ढग फोडत पाऊस पाडून उधळून लावली जातील. सध्याचे सत्ताधारी केवळ भूतलावर नाही तर तिन्हीलोकी राज्य करतात हे पक्के ध्यानात ठेवा काँग्रेसवाल्यांनो!