समाजमाध्यमी वाचाळवीरांना कामधंदाच उरला नाही बघा! दिवसभर मजकुरांचा रतीब घालण्याच्या नादात आता थेट शिंदे व फडणवीसांवर टीकास्त्र सोडू लागले आहेत. हे दोघे मुख्य व उपमुख्य मंत्रालयाला वाऱ्यावर सोडून नुसते गणेशदर्शनात व्यग्र झाले आहेत. त्यामुळे कारभार ठप्प झालेल्या राज्याचे कसे होणार असा यांचा सूर. सर्वात आधी तो साफ खोटा हे ध्यानात असू द्या. राज्य चालवणे हे तसे वर्षांनुवर्षे सुरू राहणारे कार्य पण गणेशोत्सव तर वर्षांतून दहा दिवसच असतो ना! मग आनंदाचे हे मोजके क्षण सामान्य लोकांच्यात जाऊन साजरे केले तर बिघडते काय?
तसेही मंडळांना भेटी व दर्शन हे एकप्रकारचे शास्त्रच आहे. अशा भेटी देताना गर्दी जमवण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. बसेससुद्धा भाडय़ाने घेण्याची गरज नसते. सामान्य लोक दर्शनासाठी आलेलेच असतात. त्यांच्यात जाऊन मिसळले की ‘शासन आपल्या दारी’चा फील आपसूकच निर्माण होतो. ही एकप्रकारे शासकीय खर्चाची बचतच आहे हे नाठाळ विरोधकांच्या लक्षातच येत नाही. हा उत्सव साजरा करणारी मंडळे त्यांच्या त्यांच्या प्रभागात बऱ्यापैकी प्रभाव ठेवून असतात. भेटीमुळे या साऱ्यांशी संबंध वृध्दिंगत होतात. त्याचा फायदा पुढे निवडणुकीत होतो. रोज १५-२० मंडळांना भेटी दिल्या की शेकडो लोकांशी संवाद घडतो. हे मंत्रालयात बसून शक्य आहे का? नाही ना, मग उगीच टीका कशाला?




मंत्रालयात ठाण मांडून बसले व दिवसभर बैठका घेतल्या म्हणजेच कारभार सुरळीत चालतो हा दावाही तद्दन चुकीचा. हे दोघे अनेकदा फोनवरच बैठका घेतात. त्याही दर्शनासाठी जाताना प्रवासात जो वेळ मिळतो त्या काळात. निर्णयाच्या संचिकेवर रात्री उशिरा स्वाक्षरी करतात व गतिमान अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करतात. ही कार्यतत्परता ध्यानात न घेताच माध्यम उपलब्ध आहे म्हणून काहीही बोलायचे, हे योग्य नाही. राज्याचा नेता कसा गर्दीत मिसळणारा हवा, आधीच्यासारखा एकलकोंडा व फेसबुकी नकोच. चेहरा गर्दीत उठून दिसू लागला, की लोकप्रियतेचा निर्देशांक वाढतो. राजकारणात तोच तर महत्त्वाचा असतो. त्यासाठी दहा दिवस पायाला भिंगरी लागल्यागत दर्शन घेत फिरले तर त्यात वावगे काय?
आता काही टीकाकार म्हणतात की या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक अस्मितेच्या राजकारणाला बळ मिळावे म्हणूनच ही पायपीट सुरू आहे. काय म्हणावे याला? अरे, अस्मितेचे राजकारण हाच मुख्य गाभा आहे सध्याच्या सत्ताकारणाचा. सामान्य जनतेलासुद्धा मान्य आहे ही नवी राजकीय पद्धत. मग उगीच कंठशोष करणारे तुम्ही कोण? तसेही जनतेने झिडकारलेल्या लोकांना हे दोघे अजिबात महत्त्व देत नाहीत. तरीही माध्यमांच्या भिंती रंगवत बसतात हे नासक्या वृत्तीचे टीकाकार! या उत्सवभेटीवर राजकीय विरोधकांना थेट टीका करता येत नाही, म्हणूनच कदाचित या माध्यमी दोषवर्णकांना सोडले असावे या दोघांच्या अंगावर. मात्र हे दोघेही साऱ्यांना पुरून उरणार, हे लक्षात ठेवा. २०१४ पूर्वीपर्यंत केवळ मतदारसंघापुरती असलेली या भेटीची व्याप्ती या दोघांनी राज्यभर विस्तारली म्हणून कौतुक करायला हवे. ते सोडून मंत्रालयाची काळजी काय वाहता? राज्याचा कारभार आपापल्या कारमधूनही करता येतो. यापूर्वी कलानगरातून राज्याचा कारभार चालायचा, तेव्हा तुमची तोंडे शिवली होती काय? आता द्या याचे उत्तर!