नाही, नाही या वक्तव्याची तुलना मगरीच्या अश्रूंशी होऊच शकत नाही. असा प्रयत्न कुणी केलाच तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. बदनामीची सुपारी घेणाऱ्या काहींना जनतेसमोर उघडे पाडण्यासाठीच ‘विश्वगुरूं’नी अगदी ठरवून हे विधान केले. असे करून स्वत:बद्दल जनमानसात करुणा उत्पन्न व्हावी असा उद्देश यामागे अजिबात नव्हता आणि नाही. मुळातच गुरूंचे हृदय अपार करुणेने भरलेले. त्याचा शिडकावा ते जनतेवर सातत्याने करत असतात. हेच या सुपारीबाजांना सहन होत नाही. त्यामुळेच त्यांनी लोकशाही संपल्याची कोल्हेकुई सातत्याने लावली. तिला छेद देण्याच्या एकमेव उद्देशाने हे वक्तव्य केले गेले. हा आत्ममग्नतेचा प्रकार तर अजिबात नाही. २४ तास देशसेवेसाठी वाहून घेतलेला माणूस आत्मकेंद्री असू शकत नाही. जे जे मनात आले ते थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उदात्त हेतूनेच ते असे बोलले. देशातील १४० कोटी जनतेच्या आदरास पात्र ठरलेल्या व्यक्तीबाबत संकुचित, घाणेरडा विचार करणारे काही मोजके लोक या देशात तसेच विदेशात आहेत याची स्पष्ट कल्पना लोकांना व्हावी हाच उदात्त हेतू यामागे होता. विश्वगुरूंच्या भोवती उभारण्यात आलेले अदृश्य कवच गरीब, मध्यमवर्गीय, आदिवासी, दलित, मागासवर्गीय यांच्या सक्रिय सहभागातून साकारलेले आहे. धोका नेमका काय व कुणापासून याची त्या सर्वाना कल्पना यावी यासाठीच त्यांनी या कटाची जाहीर वाच्यता केली.
हा कांगावा, रडकथा तर अजिबात नाही. पाहिजे तर पारदर्शक कारभाराचे प्रतीक समजा याला! पाकिस्तानला धडा शिकवणारे, रशियाची समजूत घालणारे, चीनला कह्यात ठेवणारे, प्रसंग आलाच तर अमेरिकेवर डोळे वटारणारे विश्वगुरू इतके ‘कमजोर दिलवाले’ कसे हा प्रश्नही यासंदर्भात अप्रस्तुत. ते स्वदेशातील विरोधकांच्या टीकेला तर अजिबात घाबरत नाहीत. त्यांना अनुल्लेखाने कसे मारायचे याची कला त्यांना चांगली अवगत आहे. मात्र टीकेच्या आडून कुणी कट रचत असेल, त्यांची कबर खोदण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची इत्थंभूत माहिती जनतेला व्हावी हाच उद्देश या विधानामागे होता. जे मुद्दे जनतेच्या न्यायालयात सोडवायचे असतात त्यासाठी तपास यंत्रणा, चौकशी, न्यायालये या व्यवस्थेची काही एक गरज नाही अशी त्यांची ठाम धारणा आहे. त्यामुळेच त्यांनी जनन्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. एवढा बलदंड, ५६ इंच छातीचा माणूस स्वत:ला इतका असुरक्षित कसा काय समजतो हा प्रश्नही यासंदर्भात गैरलागू आहे. सामान्य जनतेने जे सुरक्षा कवच त्यांच्याभोवती उभे केले त्यामुळे त्यांच्यातील असुरक्षिततेची भावना कधीचीच हद्दपार झालेली. या कवचात असलेल्या लाखो लोकांना परिस्थितीची स्पष्ट कल्पना यावी याच निर्मळ हेतूने त्यांनी हा कट उघड केला. त्यामुळे विश्वगुरू घाबरले आहेत, ‘व्हिक्टिमकार्ड’ खेळताहेत असा समज कुणी करून घेण्याचे काही कारण नाही. ते पूर्वीसारखेच मनाने खंबीर असून सामान्य जनतेच्या पािठब्याच्या बळावर हा कट उधळून लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. तेव्हा लोकशाही टिकवण्यासाठी सर्वानी विश्वगुरूंच्या पाठीशी उभे राहून राष्ट्रकार्यात हातभार लावावा ही विनंती.
(सध्या समाजमाध्यमावर फिरत असलेल्या पोस्टमधील हा संपादित अंश)
