scorecardresearch

उलटा चष्मा: स्वप्नांचे अर्थ.. ॲपवर!

वर्षांवरची गर्दी ओसरल्यावर पहाटे तीनच्या सुमारास एकनाथरावांनी फोन हाती घेतला व नुकतेच साहाय्यकाने डाऊनलोड करून दिलेले ‘ड्रीम्सट्रुथ’ हे ॲप उघडले.

उलटा चष्मा: स्वप्नांचे अर्थ.. ॲपवर!
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

वर्षांवरची गर्दी ओसरल्यावर पहाटे तीनच्या सुमारास एकनाथरावांनी फोन हाती घेतला व नुकतेच साहाय्यकाने डाऊनलोड करून दिलेले ‘ड्रीम्सट्रुथ’ हे ॲप उघडले. त्यांनी नाव सांगताच पलीकडून आवाज आला. ‘मी ॲलेक्सा, सांगा तुमचे स्वप्न.’ आसपास कुणी नाही हे बघून ते म्हणाले ‘मला आधी दोन इंजिन असलेली रेल्वेगाडी दिसायची. आता तीनची दिसते, पण तिसरे कधीकधी मागेच राहते व गाडी समोर निघून जाते. याचा अर्थ काय?’ लगेच उत्तर आले. ‘कितीही प्रयत्न केले तरी मुंबईत सत्ता मिळणे कठीण.’ गूगलने खास भारतीयांसाठी तयार केलेल्या या ॲपची भुरळ वांद्रय़ात उद्धवजींनाही पडली. त्यांनी विचारले, ‘मला रोज संग्रहालयातले प्राणी सैरावैरा पळून जाताना दिसतात.’ हे ऐकून ती म्हणाली, ‘प्राणिप्रेमाच्या नादात तुम्ही कुंपण घालायलाच विसरून गेलात. आधी ते शिका.’ या ॲपचा वापर खूप वाढला हे गृह खात्याकडून कळल्यावर देवेंद्रजींनी उत्सुकतेने ते उघडले. ‘मला रोज हत्ती दिसतात. ते का हे शोधण्यासाठी मी भारतीय स्वप्न विचारांची अनेक पुस्तके वाचली. त्यात याचा अर्थ राजयोग असा दिलेला आहेच, पण प्रत्यक्षात तो हुलकावणी देतोय. तुमचे तंत्रज्ञान काय म्हणते?’ हे ऐकताच ॲलेक्सा हसून म्हणाली, ‘तुम्ही स्वप्न पूर्ण बघतच नाही. त्याआधीच जागे होता.

हत्ती सिंहासनाकडे जाईपर्यंत बघा, जरूर फायदा होईल.’ या ॲपची चर्चा ऐकून राजही उत्साहित झाले. ‘मला खरे तर इंजिन दिसायला हवे, पण ते भलत्यालाच दिसते व मला लांबच लांब मोकळा रस्ता दिसतो. त्यावरून चालत गेले की मोठी नदी आडवी येते.’ यावर तात्काळ उत्तर आले. ‘तुमच्या नशिबात केवळ अर्थयोग. राजयोग नाहीच’. त्यावर चिडलेल्या राज यांनी ते ॲपच डिलीट करून टाकले. तिकडे नानांनीही ॲप उघडले होते.. ते म्हणत होते, ‘स्वप्नात मी रोज राजा झालेला दिसतो!’ त्यावर प्रतिसाद मिळाला- ‘सांभाळून पावले टाका, अन्यथा शिरच्छेद अटळ आहे.’ असल्या भानगडीत न पडणाऱ्या दादांनाही राहावले नाही. ‘मला रोज रस्सीखेच दिसते. मी दोराच्या विळख्यात मध्यभागी असतो व दोन्ही बाजूंनी ओढणारे असतात.’ त्यावर तात्काळ आवाज आला, ‘या विळख्यातून सुटका करायची असेल तर कोणती तरी एक बाजू निवडा. साहेब काय म्हणतील याची वाट बघू नका.’ कारागृहात काही कामच नसल्याने स्वप्ने बघण्याची सवय अद्याप न सुटलेल्या संजयभाऊंनीही ॲप उघडलेच. ‘मला रोजच दात पडल्याची स्वप्ने पडतात. कधी इथले तर कधी तिथले.’ यावर चिंतित होत ॲलेक्सा म्हणाली, ‘सध्या काळ खडतर आहे. मुष्टियोद्धे वापरतात ती कवळी लावून झोपा.’ स्वप्नांचा अर्थ व उपाय सुचवणारे हे ॲप राजकारण्यांच्या सक्रियतेमुळे भारतात कमालीचे लोकप्रिय झाल्याचे लक्षात आल्यावर गूगलने त्यांच्या वार्षिक अहवालात केलेली नोंद पुढीलप्रमाणे होती. ‘वास्तवाचा अर्थ लावण्यापेक्षा झोपेतील स्वप्नांना प्राधान्य देणारे लोक निष्क्रिय ठरतात, ते भारतात खूप असले तरी बाजारपेठ म्हणून मोठी संधी याच देशात आहे!’

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 01:40 IST

संबंधित बातम्या