कांकेर जिल्ह्यतील पाखांजूरजवळच्या पर्लकोटा धरणातील पाणी सोडले म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने माझ्यावर टीका केली जात आहे. ‘२१ लाख लिटर पाणी की किंमत तुम क्या जानो राजेशबाबू’ अशी ‘देवदास’छाप वाक्येसुद्धा वापरली जात आहेत. हे सारे वस्तुस्थितीला धरून नाही. छत्तीसगड राज्यसेवेत अन्नपुरवठा अधिकारी म्हणून काम करणारा मी एक प्रामाणिक सेवक आहे. रविवारी सहलीदरम्यान माझा सव्वा लाखाचा मोबाइल पाण्यात पडल्यावर मी तत्काळ पाण्यात उडी मारून तो शोधण्याचा निर्णय घेतला, पण माझ्यासोबत असलेल्या मित्रांनी मला तसे करण्यापासून रोखले. काही बरेवाईट घडले तर सरकार एका प्रामाणिक अधिकाऱ्याला मुकेल असे त्यांचे म्हणणे होते. नंतर आम्ही ‘गोताखोर’ बोलावले. मात्र केवळ मोबाइलसाठी राज्यातील सामान्य माणसाचा जीव धोक्यात घालावा हे काही माझ्या मनाला पटले नाही. तेवढय़ात लक्षात आले की माझा फोन ‘वॉटरप्रूफ’ आहे व तो उशिरा हाती लागला तरी खराब होण्याची शक्यता नाही. मग मी विचार करणे सुरू केले. आणीबाणीची स्थिती उद्भवली तर थंड डोक्याने विचार करून निर्णय घ्या असे आम्हाला राज्यसेवेत दाखल झाल्यानंतरच्या प्रशिक्षण काळात सांगितले गेले होते.
त्याला स्मरून मी धरणातील पाणी सोडण्याची विनंती स्थानिक सिंचन अधिकाऱ्याला केली. हे पाणी वाया जाऊ नये म्हणून मी व माझे मित्र धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या अनेक गावांमध्ये फिरलो. सोडले जाणारे पाणी मिळेल त्या मार्गाने साठवून ठेवा. गावालगतच्या तलावात पाणी वळवा, विहिरी भरून घ्या असे निरोप दिले. चार गावांमध्ये विहिरीत पाणी साठवण्यासाठी स्वखर्चाने डिझेल पंप उपलब्ध करून दिले. मी अन्नपुरवठा खात्यात असल्याने यातील काही गावांनी भाजीपाला पिकवावा, त्यासाठी लागणारा पाणीसाठा करून घ्यावा याचीही तजवीज केली. ही सारी धावपळ मी तहानभूक विसरून केली. त्यानंतर सोमवारपासून पाणी सोडणे सुरू झाले. त्याचा लाभ अनेक गावांनी घेतला व तुमच्यामुळेच आम्हाला पाणी मिळू शकले असे ठराव २६ ग्रामपंचायतींनी करून माझ्याकडे दिले. त्यात माझ्या प्रयत्नांचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारे अन्नपुरवठाच नाही तर अन्ननिर्मितीतसुद्धा माझा थोडा हातभार लागला.




गुरांना पाणी मिळाले त्यामुळे दूधदुभत्यात वाढ झाली ती वेगळीच. सध्याच्या प्रशासनात ऑनलाइन सेवेला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे व कार्यालयातील संगणक नेहमी बिघडत असल्याने मी शासकीय कर्तव्यासंबंधीची सर्व कागदपत्रे मोबाइलमध्येच ठेवतो. त्यामुळे काहीही करून तो हस्तगत करणे हे माझे कर्तव्यच होते. एक प्रकारे ही सरकारच्याच हिताचे रक्षण करणारी कृती होती.. ती बेकायदा ठरवली जाऊ शकत नाही. धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक तलाव या पाण्याने भरले असल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले या आरोपात तथ्य नाही हे मी इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो. सलग चार दिवस पाणी सोडल्यावर गुरुवारी सकाळी मोबाइल सापडला. माँ दंतेश्वरी देवीच्या कृपेने त्यातील सर्व सरकारी डेटा सुरक्षित राहिला. माझी ही कृती सरकारी कर्तव्याचाच भाग होती तरीही माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या विरोधात लाभक्षेत्रातील गावे लवकरच मोर्चा काढणार आहेत. त्याबद्दल मी माझ्या मोबाइलद्वारे वेळोवेळी माहिती देतच राहीन.
(वरील मजकुराचा संबंध निलंबित अधिकारी, त्यांचे समाजमाध्यम खाते यांच्याशी आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग मानावा.)