आटपाट नगरात एक लेखक महाशय राहात असतात. एकदम अस्सल, फटकळ, अशी त्यांची ख्याती. ते कधी काय बोलतील वादाची बहार उडेल यासाठी सगळेजण कायम टपूनच बसलेले. लेखक महाशयांची सुरुवात अशाच वादातून झालेली असते. अगदी कारे असताना ते याच्या लिखाणावर टीका कर, त्याच्या लिखाणावर टीका कर असे फिरत असता एक प्रकाशक त्यांना म्हणतात, मग तूच लिहून दाखव कादंबरी. तर लेखक महाशयांना असं उदाहरणार्थ वगैरे बनणं अजिबात आवडत नाही. तरीही ते सटकन कादंबरी लिहून टाकतात. व्यवस्था कशी फालतू असते असं सांगणारी कादंबरी. दर तरुण पिढीच्या उड्या की हो पडतात तिच्यावर. त्यांचंच म्हणणं मांडलेलं असतं. दर पिढीत ती कादंबरी वाचून व्यवस्थेवर, नेमस्त जगण्यावर लाथ मारून पोरं काहीतरी धुंडाळत जातात. असं सगळं लिहिणार्या लेखक महाशय़ांचं त्यांना कोण अप्रूप. इकडे लेखक महाशय़ मात्र त्याच व्यवस्थेच्या चांगल्या नोकरीत शिरतात. ती करण्यासाठी, टिकवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करत राहतात. ठिकठिकाणी, गावोगावी केलेल्या नोकरीचा साद्यंत वृत्तांत आपल्या पुढच्या कादंबर्यांतून लिहीत राहतात. या कसल्या कादंबर्या, हा तर सामाजिक दस्तावेज असं काही उपटसुंभ म्हणत राहतात. व्यवस्थेला नाकारणारे, तिच्यावर टीका करणारे लेखक तिच्याच गोटात शिरून तिच्याच समित्यांवर कसे काय जातात, असंही काही क्षुद्र जिवांना वाटतं. पण लेखक महाशयांना त्यामुळे काही फरक पडत नाही. का पडावा?
एव्हाना त्यांनी आपले लेखकपण सिद्ध केलेले असते. त्यांच्या बोलण्याला किंमत आलेली असते. त्यांचा जणू काही एक पंथच तयार झालेला असतो. त्यांनी जाहीर केलेल्या एका लेखन प्रकल्पाची तर लोक चातकासारखी वाट पाहतात. त्यातला एक भाग आल्यावर त्या लिखाणावर उड्या पडतात. त्यातले लेखन वाचून त्यातले बारकावे पाहून अचंबित होतात. पण आपण शहरात, आधुनिक व्यवस्थेचे फायदे घेत एकेकाळच्या सामूहिक जगण्याचे गोडवे कसले गायचे, आधुनिकोत्तर काळात व्यक्तिवादी मूल्येच महत्त्वाची नाहीत का अशी टीका करणार्या टीकाकारांना या मातीतले काहीच समजत नाही, असे लेखक महाशयांचे अनुयायीच ठरवून टाकतात.
त्यांचे कादंबरी लेखन, कविता लेखन, भाषणे या सगळ्यातून त्यांना हवा असो वा नसो, त्यांचा एक पंथ तयार झालेला असतो. ते कधी कुठल्या साहित्य संमेलनांना जात नाहीत की कुठल्या पुरस्कारांमागे धावत नाहीत. संमेलने म्हणजे रिकामटेकड्यांचे उद्योग, साहित्य संमेलने आणि संमेलनाध्यक्षांची निवडणूक म्हणजे चोरांचा बाजार आणि बदमाशांचा गोंधळ, साहित्य संमेलनं म्हणजे नस्ती उठाठेव. वेळेचा अपव्यय. या संमेलनांसाठी राजकारण्यांकडून पैसा घेतला जातो आणि सगळे राजकारणी म्हणजे बदमाश लोक. लेखकानं आपलं साहित्य एक्प्लॉइट करू नये, पैसा, प्रतिष्ठा, समाजातील स्थान यांच्याशी तडजोड करून सामाजिक प्रतिष्ठा मिरवू नये, तो या पद्धतीने लेखकराव बनतो अशी त्यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्यंही विद्रोहाची वाट धरू पाहणार्यांनी डोक्यावर उचलून घेतलेली असतात. तोवर लेखक महाशय मात्र पुढल्या पातळीला गेलेले असतात- स्वत:चीच वक्तव्ये स्वत:ला लागू होणार नाहीत, अशी उच्च पातळी… मग हेच लेखकराव ‘चोरांच्या विश्व संमेलना’त गेल्याची बातमी येते!
