उलटा चष्मा : पदवी ‘त्यांची’ आणि ‘यांची’

चाणक्य मंडळाच्या ‘हजेरीकक्षात’ बराच काळ तिष्ठत राहिल्यावर एकदाची संवादाला सुरुवात झाली. ‘देखिए, मैने कुछ भी गलत नही बोला.

Bjp leader Manoj Sinha
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘आधीच सावरकरांच्या मुद्दय़ावरून ते अडचणीत सापडलेले. त्यात आणखी भर घालण्याचे सोडून आपण नवा वाद कशाला निर्माण करायचा? काय गरज होती त्यांना महात्मा गांधी पदवीधर नव्हते हे सांगायची? जरा बोलावून समज द्या त्यांना,’ वरिष्ठ पातळीवरून आलेला हा निरोप जसाच्या तसा जम्मूला पोहोचवला जाताच महामहीम तातडीने दिल्लीत दाखल झाले. चाणक्य मंडळाच्या ‘हजेरीकक्षात’ बराच काळ तिष्ठत राहिल्यावर एकदाची संवादाला सुरुवात झाली. ‘देखिए, मैने कुछ भी गलत नही बोला. यात गांधीजींचा अवमान करण्याचा माझा बिलकूल उद्देश नव्हता. पदवी नसतानासुद्धा माणूस मोठा होऊ शकतो, एवढेच काय राष्ट्रपितासुद्धा होऊ शकतो. शंभर वर्षांपूर्वी गांधींना हे जमले तर आता का नाही?’ वाक्याच्या शेवटी आलेल्या या प्रश्नावर कक्षात हजर असलेले सारेच चमकले. ‘मी पदवी नसून मोठे झालेल्या अनेकांची नावे घेतली. उद्देश हाच की ही चर्चा पुढे जात विश्वगुरूंपर्यंत येऊन थांबावी. अधूनमधून विरोधकांतील कुणी तरी उभा होतो व पदवी नाहीच, दाखवतात ती बोगस असले आरोप करत राहतो. हे कुठे तरी थांबायला हवे की नाही. मागे लागलेले हे पदवीचे झेंगट एकदाचे सुटावे यासाठीच थेट महात्म्याचे नाव घेतले व विषयाला सुरुवात करून दिली. तशीही आपण महात्मा व गुरूंची तुलना सुरू केली आहेच. त्यात कुठलाही अडथळा यायला नको म्हणून चतुराईने गुरूचे नाव न घेता चर्चेला तोंड फोडले. तिकडे जम्मूत अडकल्यामुळे मलाही परिवाराने ठरवलेल्या लक्ष्याला हातभार लावण्याची संधी तशी कमीच मिळते. ग्वाल्हेरला ती मिळाली तर त्याचा फायदा घेतला इतकेच.’ महामहीम थांबताच मग मंडळाचे मुख्य बोलू लागले. ‘अहो पण त्यांनी इनर टेंपल कॉलेजमधून पदवी घेतली होती हे खरे आहे ना!’ त्यांना थांबवत महामहीम म्हणाले, ‘हो, हे खरेच पण ती एंटायर लॉची पदवी नव्हती व ते खुद्द तुषारभाईंनी मान्य केले आहे. त्यामुळे वाद उभा करायला आपसूकच जागा निर्माण झाली आहे. एकदा का या वादाला रंग चढला की सामान्य लोक त्यात हिरिरीने भाग घेतील. त्यावरून संभ्रम निर्माण करण्यात आपले भक्त वाकबगार आहेतच. एकदा का तो पसरला की गुरूंच्या मागे लागलेले पदवीचे प्रकरण आपसूकच लोक विसरतील. शिवाय यातून दोघांची तुलना करण्याला वेग येईल. आपल्या गुरूंचे कामही काही गांधींपेक्षा कमी नाही. त्यामुळे आधुनिक भारताचे राष्ट्रपिता हे परिवाराने बघितलेले स्वप्न सहज साकार होईल. महत्त्वाचे म्हणजे यात कुठेही आपण गांधींना कमी लेखले नाही. शिक्षण आणि साक्षरता यांच्यात परस्परसंबंध असतोच, असे नाही असेच मला सुचवायचे होते. नेमके हेच आपल्या गुरूंच्या पथ्यावर पडणारे आहे. नवा राष्ट्रपिता तयार करायचा असेल तर माहोल तो बनानाही पडेगा ना!’ या दीर्घ युक्तिवादाने मंडळाचे समाधान झाल्याचे जाणवताच महामहिमांनी गळय़ातल्या दुपट्टय़ाने चेहऱ्यावरचा घाम पुसला. शेवटी मंडळाचे मुख्य खुर्चीतून उठत म्हणाले, ‘ठीक है, जाओ जम्मू. फक्त त्या तुषारभाईंनी आत्मकथेसोबत पाठवलेल्या पत्राला उत्तर देऊ नका. विरोधकांना प्रतिसाद देण्याचे आपले धोरण नाही, एवढे लक्षात असू द्या.’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 00:02 IST
Next Story
अन्वयार्थ : बॉक्सिंग जगज्जेत्या..
Exit mobile version