साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मांडलेल्या आध्यात्मिक लोकशाहीच्या मुद्दय़ाला रसिकांनी भरभरून दाद दिल्याने उत्साहित झालेले विनयजी दिल्लीला परतले. लगेच त्यांनी संस्कृती परिषदेच्या कार्यालयात बसून या लोकशाहीचे एक प्रारूप तयार केले. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे होता. ‘या लोकशाहीत घटना नसेल तर ‘यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्यहार-ध्यान-धारणा-समाधी’ या अष्टांग योगावर आधारलेली ‘आचारसंहिता’ असेल व त्यानुसार देशाचे संचालन होईल. नव्या पद्धतीत राजकारण असेल, पण निवडणुका नसतील. ज्ञानाच्या आधारे मोक्षप्राप्तीकडे टप्प्याटप्प्याने परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार पदे मिळत जातील. यातील ‘मुमुक्षू’ ही श्रेष्ठ पायरी जो गाठेल तो देशाचे प्रमुख पद सांभाळेल. याच न्यायाने पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेला नगरसेवक, दुसरी झालेला आमदार, मग मंत्री, केंद्रात मंत्री असा नियुक्तीचा चढता क्रम असेल. या पदावर पोहोचलेली व्यक्ती नऊ विकारांपासून दूर गेलेली असली तरी जनतेच्या सुखदु:खाची काळजी त्याला करावी लागेल. सध्याच्या लोकशाहीत असलेले चारपैकी तीनच स्तंभ नव्या रचनेत असतील. पण, त्यांची नावे व कार्यपद्धती वेगळी असेल. ही व्यवस्था लागू झाल्यावर लोकसभा ‘मुमुक्षूसभा’ म्हणून ओळखली जाईल. तर राज्यपातळीवरील विधानसभा ‘ध्यानसभा’ असेल. कार्यपालिकांचे संचालन मठांच्या माध्यमातून केले जाईल. कार्यालये कुठे नसतीलच. मठ व त्याचे मठाधिपती सर्वत्र असतील. देशातला प्रत्येक नागरिक मोक्षप्राप्तीच्या प्रयत्नात संन्यस्तजीवन जगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे वादविवाद, कलह, भांडणे कमी होतील. परिणामी निवाडय़ासाठी न्यायपालिकेची फारशी गरज उरणार नाही. तरीही ज्ञानाशी संबंधित एखादा वाद निर्माण झालाच तर तो सोडवण्यासाठी मर्यादित स्वरूपाची न्याययंत्रणा उभारली जाईल. त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाला काळय़ाऐवजी भगवे डगले परिधान करावे लागतील. या यंत्रणेची कार्यपद्धती ‘मुमुक्षू’ ठरवतील. देशात कसलाही वाद निर्माणच होणार नसल्याने पत्रकारितेचे काम शिल्लक राहणार नाही. त्यामुळे हा स्तंभ नव्या व्यवस्थेत असणार नाही. सनातन धर्मात स्त्रियांना संन्यस्त होण्याची परवानगी नव्हती, पण सध्याचा आधुनिक काळ लक्षात घेता व प्राचीन काळात बौद्ध धर्मातील प्रथा विचारात घेत स्त्रियांना या विरक्त जीवनासाठी प्रोत्साहित केले जाईल. अशा प्रकारची जीवनपद्धती स्वीकारल्यावर लोक काम न करता बसून खातील. हा धोका लक्षात घेऊन मोफत धान्य वितरणाची योजना आणखी व्यापक स्वरूपात राबवली जाईल. या पद्धतीत वैवाहिक जीवनाचा त्याग करणाऱ्यांची संख्या आपसूक वाढेल. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा निकालात निघेल. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी व्यापारउदीम, रोजगाराची गरज राहणार आहेच, त्यासाठी ‘अध्यात्मासोबत कर्तव्य’ अशी आकर्षक कर्तव्यवीर योजना आखली जाईल. या विरक्तीच्या मार्गाने जाणाऱ्या जीवनपद्धतीत अहंकाराला अजिबात स्थान असणार नाही. तरीही तो दिसून आला तर त्याला सक्तीचा एकांतवास दिला जाईल व हजार वेळा चांगदेव व मुक्ताबाईची कथा ऐकवली जाईल. पाठीवर धपाटा बसल्यावर ज्याप्रमाणे चांगदेवाने मुक्ताबाईचे शिष्यत्व स्वीकारले, तसे या अहंकारीने स्वीकारले तरच त्याची सुटका होईल. देशात सध्या सुरू असलेले अनावश्यक वाद व भावनातिरेक पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी ही आध्यात्मिक लोकशाही तातडीने स्वीकारावी अशी शिफारस आम्ही करीत आहोत.
