शेवटचा आमदार आत आल्याबरोबर नावांची यादी घेऊन उभ्या असलेल्या संजय राऊतांनी सभागृहाचा दरवाजा बंद करून घेतला. बैठकीला सुरुवात होताच उद्धवजी म्हणाले. ‘मी आधी जे सांगत आलो तेच आताही सांगतो. ज्याला ‘तिकडे’ जायचे असेल त्याने खुशाल जावे.’ हे ऐकताच एकदम शांतता पसरली. मग एकेक आमदार उठून शपथ घ्यायला लागले. त्यातले एक-दोघे डोळ्याला डोळे न भिडवता शपथ घेऊ लागताच राऊत रागाने बघू लागले. त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या उद्धवजींनी लगेच डोळे वटारले. ‘तूच नेहमी लक्ष्य ठरतोस. तेव्हा किमान आता तरी चेहर्यावर हसरे भाव ठेव.’ असे इशार्याने सुचवताच राऊतांनी रागाने मान खाली घातली.
शपथेनंतर आमदार म्हणाले. ‘आम्हाला एकट्यांना भेटायचंय. ‘आलिया भोगासी’ असे पुटपुटत उद्धवजी शेजारच्या कक्षात गेले. राऊत कक्षाच्या दारावर उभे राहिले. कान लावून ऐकणे बरे दिसणार नाही म्हणून थोडे दूर होते. पहिला आमदार आत गेला व सांगू लागला. ‘माझी काळजी करू नका साहेब पण ‘तो’ आमदार काल शिंदेंच्या कानाला लागला होता. मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितले. बोलणे संपल्यावर शिंदेंनी त्याच्या पाठीवर थाप मारली. अंगठा दाखवला. जरा लक्ष ठेवा त्याच्याकडे.’ मग ‘तो’च दुसरा आमदार आत आला. ‘मी माझा सचिन अहीर कधीही होऊ देणार नाही. पण आता जो आत येऊन गेला त्याला मी काल रात्री फडणवीसांच्या कार्यालयातून बाहेर निघताना पाहिले. निघाल्यावर कुणीच बघत नाही हे बघून साळसूदपणे चालत गेला. मी लॉबीत असलेल्या एका पिलरच्या मागून बघत होतो.’ मग तिसरा आत आला. त्याने चौथ्याविषयी अशीच माहिती दिली. रात्री उशिरा विधिमंडळ परिसरातून बाहेर पडल्यावर तो उदय सामंतांच्या वाहनात बसून गेला असे सांगितले. मग पाच ते २२ व्या आमदारापर्यंत प्रत्येकाने मीच कसा प्रामाणिक व ‘तो’ कसा गद्दार असे सांगत अनेक आमदारांची नावे घेतली. कोण कुणाला कधी भेटले हे सांगताना शिंदेसेनेच्या सर्वच मंत्र्यांचा हवाला दिला. त्यातल्या प्रत्येकाचे म्हणणे नोंदवून घेणार्या उद्धवजींनी कागदावरची नावे मोजली तेव्हा चार-पाच सोडले तर सारेच गद्दारीकडे वाटचाल करणारे असे त्यांना दिसले. मग २३ वा आमदार आत आला. कोकणी पद्धतीने चढ्या आवाजात बोलताना त्याने नार्वेकरांवर जरा लक्ष ठेवा असे सुचवताच उद्धवजी स्तब्ध झाले. ‘दोन नार्वेकर मिळून काहीही करू शकतात. अतिआत्मविश्वासात राहू नका.’ असा सल्लाही त्याने देऊन टाकला. २४ वा आमदार भीतभीत आत शिरला. इकडेतिकडे कुणी नाही हे बघून तो हळूच म्हणाला. ‘त्या राऊतांच्या आमदार भावाची अलीकडे भलतीकडेच ऊठबस वाढलीय. अहीरसारखा धक्का बसू नये असे वाटत असेल तर त्वरित लक्ष घाला.’
शेवटी २५ वा आत आला. समोर बसण्याऐवजी थेट उद्धवजींजवळ जाऊन त्यांच्या कानाला लागत म्हणाला. ‘आजकाल रक्ताच्या नात्यांचाही भरवसा देता येत नाही. जरा आदित्यकडेही लक्ष ठेवा.’ हे ऐकून ठाकरे उडालेच. भेटी आटोपल्यावर त्यांनी संजयला बोलावले. सारा वृत्तांत कथन केल्यावर म्हणाले. ‘हे सर्व ऐकल्यावर माझा पक्ष चालवण्यातला रसच संपला. एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढावी म्हणतो.’ राऊतांनी लगेच त्याच्या नोंदणीची प्रक्रिया कशी असते याची माहिती घ्यायला सुरुवात केली.
