पुण्यातील ‘त्या’- युनोसंबंधीच्या- वक्तव्यानंतर चार तासांच्या आत दिल्लीहून  भेटायला या असा निरोप मिळाल्याने दादांची झोपच उडाली. विश्वगुरू आता खरडपट्टी काढतील या शंकेने ते अस्वस्थ झाले. तेल चोपडलेल्या केसांवरून कंगवा फिरवत ते दिल्लीत दाखल झाले. भेटून बाहेर पडल्यावर मात्र दादा कमालीचे आनंदी होते. ‘जे मला सुचले नाही ते तुम्हाला सुचले. आता पुणे हातून गेल्याचे दु:ख विसरा व यावर काम करून तातडीने एक आराखडा बनवून द्या’ हे विश्वगुरूंचे शब्द त्यांच्या मनात रुंजी घालत होते. मग दादांनी लगेच महाराष्ट्राचे सदन गाठून स्वत:ला एका कक्षात कोंडून घेत नव्या युनोची संकल्पना कागदावर उतरवायला सुरुवात केली. ‘भारत जगज्जेता ठरूनही सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व नाकारणाऱ्या ‘यूएन’च्या धर्तीवर ही संघटना असेल. परिवारात संघटना या शब्दाला फार महत्त्व असल्याने याचे नाव ‘संयुक्त राष्ट्रांचा महासंघ’ असेच असेल. करोनाकाळात भारताची मदत स्वीकारलेले  ६० देश याचे प्राथमिक सदस्य असतील. झालेल्या जी-२० मध्ये विश्वगुरूंच्या आग्रहामुळे अनेक आफ्रिकन देशांना सामावून घेतले गेले. तेही या महासंघात आनंदाने सामील होतील. विश्वगुरूंच्या थेट पाया पडणाऱ्या ‘त्या’ कॅरेबियन देशाच्या प्रमुखालासुद्धा युनोचे कायम सदस्यत्व देण्याचा विचार होईल. विश्वगुरूंची ‘द बॉस’ अशी तारीफ करणारे ऑस्ट्रेलिया, इस्रायल, सौदी कायम सदस्य असतील. भूतानला कायम सदस्यत्व मिळेल. याचे प्रमुख विश्वगुरू असतील. सरचिटणीस हे पद नसेल. वेगवेगळय़ा क्षेत्रांत कामे करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या संघटनांचे प्रमुख ‘कार्यवाह’ असतील. अध्यक्ष हेच सर्वोच्च असतील व त्या पदावर ‘लोकशाही’ पद्धतीने विश्वगुरूंची निवड केली जाईल.

यूएनचे मुख्यालय जसे अमेरिकेच्या राजधानीत नसून न्यूयॉर्कमध्ये आहे, त्याच पद्धतीने या नव्या महासंघाचे मुख्यालय दिल्लीऐवजी अहमदाबादला असेल. जगभरात ज्यांना मान्यता आहे अशा महात्मा गांधींच्या विचारानुसार या संघटनेचे कार्य विश्वगुरू तडीस नेतील. नव्या ‘युनो’त वर्षांतून चार वेळा सर्वसाधारण सभा होतील. प्रत्येक सभेची सुरुवात विश्वगुरूंच्या भाषणाने होईल. मतदानाची वेळ आली तर सुरक्षा परिषदेच्या पाच सदस्यांना नकाराधिकार असेल, पण सर्वोच्च नकाराधिकाराचा हक्क अध्यक्ष या नात्याने केवळ विश्वगुरूंकडे असेल. महासंघाची भूमिका कोणतीही असली तरी अंतिमत: विश्वगुरूंचे मत हेच निर्णायक असेल. महासंघाचे दैनंदिन कामकाज योगसाधनेने सुरू होईल. जगावर येणारी नैसर्गिक आपत्ती, युद्ध व साथी या तीन गोष्टींवर नवा महासंघ प्राधान्याने काम करेल. या युनोचे सदस्य नसलेल्या देशांमध्ये जरी युद्धाचे संकट उद्भवले तरी विश्वगुरू त्यात हस्तक्षेप करतील. ‘ही युद्धाची वेळ नाही’ असे ठणकावून सांगतील व ‘सारे विश्वच माझे कुटुंब’ या नात्याने समेट घडवून आणतील. यूएनने अकारण महत्त्व दिलेल्या मानवाधिकाराच्या मुद्दय़ाला हा नवा संघ स्पर्शसुद्धा करणार नाही. पूर्णपणे संगणकीय पद्धतीने कामकाज करणाऱ्या या महासंघात ‘शाई’च्या वापरावर प्रतिबंध असेल, हे शेवटचे वाक्य लिहून होताच दादा लगबगीने लोककल्याण मार्गावर गेले. तिथे त्यांनी ‘जावक’मध्ये कागद सोपवला व थेट विमानतळ गाठले. आता त्यांना कोथरूडमध्ये सभा घेऊन ही नवी जबाबदारी जनतेला सांगण्याचे वेध लागले होते.