लहान वयात अगदी चुणचुणीत, स्वच्छंद बागडणारी मुलं किशोरावस्थेतून जाताना एकदम बुजरी होतात, एके काळी अगदी शांत, समजूतदार असलेली मुले अचानक चिडचिडी, आक्रस्ताळी होतात… अशा परिस्थितीत पालकही पुरते गोंधळून जातात. परिणामी घरात कधी रणकंदन माजते तर कधी पूर्ण घर कोशात जाते… अगदी भरकटल्यासारखी अवस्था होते काहींची. बरं, कोणाला सांगावं इतका प्रगल्भ समाज आपल्या सभोवती नाही. उलट अनेकदा नको तेच सल्ले मिळतात- ज्यात मुलांना दूषणं देण्याचाच भाग अधिक असतो. अनेकदा पालकांच्या वर्तनातच खोट काढली जाते. मुले आणि पालक (विशेषत: आई. कारण भारतात मुलांना वाढविण्याची जबाबारी फक्त आईचीच ही धारणा आजही खोलवर रुजलेली आहे.) यांच्यातला संघर्षाचा काळच असतो तो. अनेकदा समुपदेशनाचा मार्ग अवलंबला जातो. त्यातून काही गोष्टी समजून घेता येतात, तरीही प्रत्येक पालक आणि मुलांची ही वेगळी लढाई असते. सध्याचा सभोवताल पाहता परिस्थिती खूप संवेदनशीलपणे हाताळावी लागते, नाहीतर हाताशी आलेले मूल गमावण्याचीही भीती… या पार्श्वभूमीवर पालकांसाठी सुजाता केळकर शेट्टी यांचे ‘रिझिलियन्स डिकोडेड’ हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरते. ग्रेग चॅपल यांची अर्थपूर्ण प्रस्तावना हीसुद्धा या पुस्तकाची जमेची बाजू.

लेखिकेने सुरुवातीलाच प्रसिद्ध लेखक खलील जिब्रान यांच्या ‘द प्रोफेट’ या काव्यात्मक निबंधातील मुलांविषयीचे उद्धृत दिले आहे. लेखिका या उद्धृताचे बोट धरून वाचकाला स्वानुभवातून उलगडलेल्या मार्गावर मार्गस्थ करते. पालकांच्या हाती अनेक सकारात्मक गोष्टी देते- त्या तिने स्वानुभवातून ताडून घेतल्या आहेत. आकाश आणि अर्णव या आपल्या मुलांना वाढवताना जे काही लेखिकेने अनुभवले, त्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक.

सुजाता यांनी अमेरिकेत जीवशास्त्राचे शिक्षण घेतले. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन येथून अनुवंशशास्त्रात बीएस पदवी आणि युनिव्हर्सिटी ऑफ केंटकी येथून टॉक्सिकॉलॉजीमध्ये पीएचडी केली. नॅशनल इ्स्टिटट्यूट्स ऑफ हेल्थ, बेथेस्डा, मेरीलँड येथे डॉ. जॉर्ज क्रूसोस यांच्या मार्गदर्शनाखाली ताणतणावाचा आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर कसा परिणाम होतो यावर संशोधन केले. लेखिकेचा शैक्षणिक अनुभव आणि पालक म्हणून अनुभव यांतून हे पुस्तक साकार झाले आहे. त्यांच्या निरीक्षणाला शास्त्रीय आधार आहे. पालकत्व म्हणजे काय, लेखिकेने पत्राद्वारे पालकांशी साधलेला आपलासा वाटणारा संवाद, मुलांच्या शारीरिक, मानसिक पोषणासाठी करावयाच्या गोष्टी… यांचा समावेश यात आहे. विज्ञान, शास्त्रीय आधार, संशोधन आणि पालक म्हणून अनुभव या सर्वांचा अचूक मेळ पुस्तकात साधला आहे.

करोनाकाळात मुले वर्षभर घरात कोंडून होती. ना कोणाशी संवाद, ना मैदानात खेळणं. ही अवस्था किशोरवयीन मुलांसाठी कष्टदायक ठरली. त्याचा दुष्परिणाम त्यांच्या वाढीवर, स्वभावावर, वर्तनावर, नातेसंबंधांवर झाला. मुलांना चिंता, ताणतणावाने ग्रासले. हा परिणाम दीर्घकाळ कसा राहिला याचे विश्लेषण पुस्तकात आहे. मग अशा वेळी पालकांनी मुलांचे ऐकणे हीच भूमिका स्वीकारावी असे लेखिका आवर्जून सांगतात. किशोरावस्थेतील मुलांना वाढविताना पालकांनी भावनिकदृष्ट्या लवचीकता दाखवणे गरजेचे आहे, याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.

समाज काय म्हणेल यापेक्षा आपले मूल समजून घेणे, इतरांच्या पाल्यांशी तुलना टाळणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या वर्तनामागे बहुतांशी त्यांचा मेंदूच असतो, हे आधी समजून घेतले पाहिजे. त्यांच्या वाढीवर, त्यांच्या मेंदूच्या विकासावर आयुष्यातील अनेक लहान-सहान घटनांचा, पालकांच्या वर्तनाचा परिणाम होत असतो. मेंदू आणि त्याचे कार्य समजून घेणे, त्याला ट्रेन करणे किती गरजेचे आहे याची शास्त्रीय माहिती दिली आहे. मुलांचा आहार, व्यायाम कसा असावा, हेही या पुस्तकात सांगितले आहे. ‘द फेरारी बेन’ या प्रकरणात किशोरवयीन मुलांच्या मेंदूविषयी लेखिका सांगते. या वयातील मुलांत शिकण्याची अचाट क्षमता असते, परंतु निर्णयक्षमतेतील अपरिपक्वतेमुळे बेधडक निर्णय घेतले जातात, त्याचे दुष्परिणाम आणि त्यातून मार्ग कसा काढावा याचे विश्लेषण यात आहे. ‘रिझिलियन्स बुस्टर्स’ या प्रकरणात मुलांचे मानसिक आरोग्य बिघडल्यास निर्णयांमधील लवचीकता, आहार, झोप आणि सर्जनशीलतेला दिशा कशी देता येईल याचे तंत्र सांगितले आहे. ‘द डिजिटल वर्ल्ड’ या प्रकरणात समाजमाध्यमांचे मुलांवर होणारे परिणाम, त्याचा प्रभाव यावर भाष्य केले आहे. या प्रकरणात समाजमाध्यमे, ऑनलाइन पॉर्न, व्हिडीओ, गेमिंग आणि महत्त्वाचे म्हणजे डिजिटल सिटीझनशिप यावर खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. गेमिंगचं व्यसन, त्यातून होणारे मानसिक बदल, उद्भवणार्‍या मानसिक, सामाजिक समस्या यांचे विश्लेषण लेखिका करते. समाजमाध्यमाच्या जाळ्यात मुले अडकून पडू नयेत, यासाठी काय करावे याचा कानमंत्र या प्रकरणातून मिळतो. किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या कशा समजून घ्याव्यात, त्यावर पालक म्हणून कोणती भूमिका घ्यावी, सध्या उपलब्ध असलेल्या उपचारपद्धती याविषयी लेखिका सांगते. हे प्रकरण महत्त्वाचे ठरते. ‘रिझिलन्ट पॅरेंटिंग’ या प्रकरणात पालकांनी किशोरवयीन मुलांना वाढवताना स्वत:त कोणते बदल करावेत, हे सांगितले आहे. याची अनेक उदाहरणे लेखिका देते.

किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक बदलांना समजून घेऊन त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे गरजेचे आहे. कारण सर्जनशीलता मुलांच्या भावभावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. आपल्या भावना कशा पद्धतीने व्यक्त कराव्यात याची निवड मुलांना करता आली की अनेक प्रश्न मार्गी लागतात. संगीत, कला, लेखन या माध्यमांतून मुलांना व्यक्त होण्यास वाव देता येतो. त्यांचा हा प्रवास एक पालक म्हणून समजून घेणे कसे गरजेचे आहे हे लेखिका सांगतेच, पण अनेक मान्यवर थेरपी तज्ज्ञांची माहिती, उदाहरणे देते- जी पालकांना उपयोगी ठरतात.

पुस्तकातील तज्ज्ञांचे, मुलांसाठी काम करणार्‍या पालकांचे, आधारगटांचे अनुभव, कथा ही वाचकांसाठी शिकवण ठरते. काही अनुभव हादरवून टाकणारे आहेत. या संदर्भातील अनेक संशोधनांची माहिती पुस्तकात आहे. हा शास्त्रीय आधार मोलाचा ठरतो.

किशोरवयीन मुलांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक काय देते? तर, मुलांना आपली मनोवस्था काही वेगळी नाही, तो आजार नाही, या गोष्टी कुणापासून लपवण्यासारख्या नाहीत, पालक हा आपल्या भावभावनांना समजून घेणारा मोठा आधार आहे याची जाणीव करून देते आणि कशोरवयीन मुलांच्या पालकांना सत्य परिस्थिती, अनुभव, स्वीकार आणि त्यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा कानमंत्र देते.

रिझिलियन्स डिकोडेड
लेखिका – सुजाता केळकर शेट्टी
प्रकाशक – पेंग्विन रँडम हाऊस इंडिया
पृष्ठे -१७३, किंमत-३९९ रु.