‘आंबेडकर, हेडगेवारांचे उद्दिष्ट समान’ या लेखाचा हा डॉ. आंबेडकरांच्या ग्रथित विचारांआधारे केलेला प्रतिवाद..

सचिन सावंत

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
prakash ambedkar uddhav thackeray sharad pawar
“फुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून…”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना टोला; जागावाटपावर म्हणाले…
prakash ambedkar, manoj jarange patil, maratha reservation, vanchit bahujan aghadi, politics, maharashtra,
आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाजाने निवडणुका लढवाव्या; प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

‘राष्ट्रभाव’ या रवींद्र साठे यांच्या सदरातील ‘आंबेडकर, हेडगेवार यांचे उद्दिष्ट समान’ (११ नोव्हेंबर) या लेखातून बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याच विचारांचे म्हणण्याच्या रा. स्व. संघाच्या प्रयत्नांची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. तसेच यातून संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी करून त्या माध्यमातून हेडगेवार यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्नदेखील केला गेला आहे. आता ही तुलना गोळवलकर आणि आंबेडकर यांची केली नाही व हेडगेवार आणि आंबेडकरांची का केली? या प्रश्नाचे उत्तर या प्रतिवादातून वाचकांना मिळेलच.

साठे यांच्या संपूर्ण लेखांमध्ये केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे वक्तव्य व लिखाणाचा संदर्भ घेण्यात आला आहे. परंतु हेडगेवारांबाबत मात्र, केवळ त्यांची भूमिका काय होती याचे पुराव्याशिवाय शाब्दिक वर्णन केले आहे. त्यामुळे लेखकाचा संपूर्ण प्रयत्न हास्यास्पद व अप्रस्तुत झालेला आहे. हेडगेवार यांनी संघाची स्थापना १९२५ साली केली. १९४० साली त्यांचे देहावसान झाले. आंबेडकर १९२४ साली राजकारणात आले. गोलमेज परिषदेच्या माध्यमातून १९३०-३२ पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. त्यामुळे या दोघांच्या कार्याचा तुलनात्मक अभ्यास हा या पंधरा-सोळा वर्षांचा असू शकतो. लेखक म्हणतात, ‘‘ या दोन्ही नेत्यांनी सामाजिक समस्येचे केवळ अचूक निदान केले नव्हते तर निराकरणाचे समुचित उपायसुद्धा शोधून काढले होते’’. आता संघाच्या वेबसाइटवर असलेले, संघाचे स्वयंसेवक नाना पालकर यांनी लिहिलेले हेडगेवारांचे जीवनचरित्र पाहिले तर ‘हिंदू राष्ट्र निर्माण करणे’ हेच हेडगेवारांचे स्वत:साठी अचूक निदान होते हे म्हणावे लागेल. तर ‘मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’ हे बाबासाहेबांनी स्वत:साठी केलेले अचूक निदान होते.

जातिभेद आणि अस्पृश्यता संपुष्टात आणण्यासाठी उपाय योजण्यात बाबासाहेबांनी आपले जीवन वाहिले. लेखकांच्या म्हणण्यानुसार हेडगेवार यांनी जातीविरहित हिंदू समाज संघटनेचे कार्य केले होते. पण जातिभेद संपवण्यासाठी कोणते उपाय शोधले हे त्यांना सांगता येत नाही. कारण त्या काळातही जातिभेद संघाला मान्य होता हे स्पष्ट आहे. याचा पुरावाच द्यायचा झाला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘जनता’ या वृत्तपत्रात १३ जानेवारी १९३४ रोजी प्रकाशित झालेल्या नागपूर येथील पी.डी. शेलारे या दलित कार्यकर्त्यांच्या पत्राचा देता येईल. यामध्ये शेलारे यांनी संघाच्या शाखेमध्ये जातिभेद पाळला जातो, विशेषत: जेवणाच्या वेळी तो स्पष्टपणे दिसून येतो, असे म्हटले आहे. संघाच्या नेत्यांना याची जाणीव असूनही या विरोधात कोणतेच (समुचित) उपाय ते शोधत नाहीत असे या पत्रात शेलारे म्हणतात. संघाचे नेते, तेही नागपूरमधील बरे!

हिंदू समाजात विषमता होती आणि त्याचे चटके दलित समाजाला बसत होते हे मान्य करून ‘दुर्भाग्याने मी हिंदू म्हणून जन्मास आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही’, ‘या बाबासाहेबांच्या म्हणण्यात अनैसर्गिक काहीही नव्हते’, असे लेखक म्हणतात. बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथील धर्मातर परिषदेत हे वाक्य उच्चारले होते. प्रश्न हा उपस्थित होतो की हेडगेवार यांची यावर काय प्रतिक्रिया होती? व या प्रश्नावर त्यांच्याकडे कोणता ‘समुचित’ उपाय होता?

१५ मे १९३६ रोजी आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या परिषदेसाठी लिहिलेल्या अध्यक्षीय भाषणात हिंदू धर्मातील वेदांपासून ते मनुस्मृतीपर्यंतच्या सर्व ग्रंथांवर टीका केली आणि स्पष्टपणे नोंदवले की हिंदू धर्माने केवळ अस्पृश्यांचे जीवन उद्ध्वस्त केले नाही तर भारतीय राष्ट्राचा विध्वंस केला आहे. या संदर्भात हेडगेवार यांचे मत काय होते?

१५ ऑगस्ट १९३६ रोजी आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा कार्यक्रम त्यांच्या ‘स्टेट अँड मायनॉरिटीज’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला होता जो संघाला कधीही मान्य नव्हता. लेखक म्हणतात की शीख धर्म स्वीकारण्याची आंबेडकरांची इच्छा होती. शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आंबेडकरांनी १६ जणांची एक तुकडी अमृतसरला जरूर पाठवली होती पण शीख धर्म स्वीकारण्याची घोषणा कधीच केली नव्हती. हिंदू धर्माला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता एवढेच.

१२-१३ फेब्रुवारी १९३६ रोजी मनमाड येथे रेल्वेच्या अस्पृश्य वर्गातील कामगारांच्या परिषदेत आंबेडकरांनी निक्षून सांगितले होते की, आपल्या देशासमोर ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे दोन मोठे शत्रू आहेत. या दोघांच्याही विरोधात संघटितरीत्या उभे राहून स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेसाठी देशाला संघर्ष करावा लागेल. विशेष म्हणजे हेडगेवार यांच्या जीवनचरित्रात डॉ. हेडगेवार यांनी रक्षाबंधनाचा उत्सव संघात साजरा केला असा उल्लेख आहे. या उत्सवातून बहिणी आणि ब्राह्मणांची रक्षा करण्याचे अभिवचन अभिप्रेत आहे असे पालकर लिखित जीवनचरित्रात स्पष्टपणे म्हटले आहे. त्यातही २१ मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळय़ावर गांधीजींच्या प्रतिमेला साक्षी ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला. यानंतर तेथील ब्राह्मणांनी शास्त्रोक्त विधी करून तळय़ाचे शुद्धीकरण केले. तेव्हा हेडगेवार संघाचे सरसंघचालक होते. यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती? १३ ऑक्टोबर १९२९ ला पुण्यातील पर्वतीवरील मंदिराचा सत्याग्रह सुरू झाला होता. त्याला हेडगेवार यांनी पाठिंबा दिला होता का?

१९२४  ते १९३५ या काळात बाबासाहेबांनी हिंदू समाज संघटनेचे काम केले हा दावा डॉ.आलिम वकील यांच्या ‘महात्मा आणि बोधिसत्त्व’ या पुस्तकात केल्याचा दाखला लेखक देतात. डॉ. आलिम यांचे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर पुणे येथे त्यावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात मोठमोठय़ा विचारवंतांनी सहभाग घेतला होता. त्या सर्वानी डॉ.आलिम वकील यांचे मत खोडून काढले होते. डॉ. आलिम यांनी या पुस्तकात जे संदर्भ दिले होते ती सगळी पुस्तके संघाच्या प्रकाशनाने प्रसिद्ध केली होती हे विशेष. त्यातही रा. स्व. संघाला विरोध करण्यासाठी २२ मार्च १९२८ रोजी आंबेडकरांनी ‘समाज समता संघ’ स्थापन केला. त्यात दलित आणि दलितेतर समविचारी लोकांचा समावेश होता, याची माहिती लेखकाने घ्यावी.

बाबासाहेबांच्या नागपूर येथील दीक्षाभूमीवरील भाषणात बाबासाहेबांनी गौतम बुद्धांच्या एकात्मतेसाठी केलेल्या आवाहनाच्या उल्लेखाचा दाखला देऊन दलित समाजात पृथकतेची भावना निर्माण होणार नाही याची बाबासाहेब आंबेडकर काळजी घेत होते, हे म्हणणे योग्य आहे. जातिभेद व अस्पृश्यतेविरोधात दलितांना एकटवणे  हा त्यांचा जाहीर उद्देश होताच. बुद्ध धर्मातील समानतेचा मार्ग त्यांना त्यासाठी योग्य वाटला. त्याच वेळी, हेडगेवार जातीनिष्ठ हिंदूंना राष्ट्रनिष्ठ हिंदू बनवण्यासाठी प्रयत्न करत होते असे लेखक म्हणतात. परंतु या हिंदूंची जातीनिष्ठा नाहीशी कशी होणार? यासाठी हेडगेवार किंवा संघाकडे कोणता ‘समुचित’ उपाय होता हे मात्र सांगत नाहीत. समतेची अपेक्षा करण्याऐवजी आपल्या जाती तशाच ठेवून, संघ दलितांना समरसतेचा मार्ग सुचवत आला आहे. त्यामुळे ‘हेडगेवार यांनी संघाच्या कार्यपद्धतीतून सामाजिक समरसतेचे पालन करणारे लक्षावधी स्वयंसेवक निर्माण केले’ असे म्हणताना या स्वयंसेवकांमधील जातीनिष्ठा नाहीशी झाली काय हे लेखकाला सांगता येणार नाही, कारण जे घडले आहे ते नेमके याच्या उलट आहे. संघाने जातीनिष्ठा नष्ट नव्हे तर पुष्ट केल्या आहेत.

याच लेखाच्या अंतिम परिच्छेदात बाबासाहेब आंबेडकरांच्या २५ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या घटना समितीतील शेवटच्या भाषणाचा दिलेला संदर्भ अपुरा आहे. त्या भाषणात आंबेडकर म्हणतात की, जेव्हा एखादा नेता राष्ट्रापेक्षा मोठा होतो आणि सर्वसामान्य माणसे त्याच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करतात त्या वेळी ते राष्ट्र संकटात येते!

डॉ. हेडगेवार हे उत्तम प्रकारचे संघटक होते. परंतु त्यांना ‘विचारवंत’ म्हणावे यासाठी आधार देणारे कोणतेही लेखन त्यांनी कधीही केलेले नाही. तसेच त्यांच्या सरसंघचालक पदाच्या कार्यकाळात त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. हेडगेवारांनी संघर्षांचा मार्ग स्वीकारला नाही याची कबुली लेखकाने लेखात स्वत:च दिली आहे. हेडगेवारांनी न केलेल्या लिखाणातून अशी तुलना खपून जाईल पण गोळवलकरांचे समग्र लिखाण उपलब्ध असल्यामुळेच, लेखकाने आंबेडकरांची गोळवलकरांशी तुलना करण्याचा प्रयत्न केला नाही. आता हेडगेवारांनी असा कोणताही विचार व ‘समुचित’ उपाय दिला असेल असे मान्य जरी केले तरी गोळवलकरांच्या काळात संघाने चातुर्वण्र्य व्यवस्थेचे केलेले खुले समर्थन व संविधानाऐवजी मनुस्मृतीचा केलेला पुरस्कार पाहता ‘सारा हिंदू एक’ ही भावना आणि हेडगेवार यांची तथाकथित शिकवण संघानेही गुंडाळून ठेवली असे नामुष्कीने म्हणावे लागेल. त्यापेक्षा मनुस्मृतीचे दहन करणाऱ्या, स्वत:चा शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष ‘संघाशी कोणतेही संबंध ठेवणार नाही’ असे पक्षाच्या जाहीरनाम्यात निक्षून सांगणाऱ्या आंबेडकरांचे व हेडगेवारांचे उद्दिष्ट कधीही समान नव्हते हे सत्य कबूल करणे लेखक व संघाच्या हिताचे आहे. नव्हे काय?