डॉ. उज्ज्वला दळवी

मानवाच्या आत्मकेंद्री उद्दामपणामुळे अनेक उपकारक सूक्ष्मजीव लयाला चालले आहेत. त्यांचा विनाश टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागेल..

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

‘मेरे देश की धरती सोना उगले’.. सोनं नाही, पण हैदराबादजवळच्या अनेक गावांतील जमिनीत महागडी अँटिबायोटिक्स (प्रतिजैविकं) मात्र नक्की मिळतात. तिथल्या नद्या-नाल्यांच्या पाण्यात, जमिनीत, पिकांत अँटिबायोटिक्सचं प्रमाण फार मोठं, जगातलं सर्वाधिक आहे. का झालं आहे तसं? त्या भागात अँटिबायोटिक्सचे कारखाने आहेत. त्यांच्यातलं सांडपाणी तिथल्या जमिनीत, नाल्यात सोडलं जातं. त्यामुळे तिथं नेमकं काय होतं ते शास्त्रज्ञांनी समजून घेतलं.

फ्लेमिंगच्या तबकडीतल्या बुरशीनं पेनिसिलीन मानवी फायद्यासाठी बनवलं नव्हतं. माणसाच्या जन्माच्या आधी, लाखो वर्षांपासून ती बुरशी पेनिसिलीन बनवतच होती. ती त्या बुरशीची शत्रूजंतूंपासून संरक्षण करणारी नैसर्गिक ढाल होती. त्या शत्रूजंतूंकडेही तिच्यावर वार करणारी, अँटिबायोटिक रेझिस्टन्स तलवार तेव्हापासूनच होती. पण ती एकेकटय़ांची लढाई किंवा गल्लीतली मारामारी होती.

त्यानंतर अँटिबायोटिक्सचा वापर माणसांच्या आजारांसाठी सुरू झाला. कोंबडय़ा-बदकांना, गुरा-डुकरांना  गलेलठ्ठ करायलाही ती औषधं मोठय़ा प्रमाणात राबवली गेली. ती बनवणारे जगड्व्याळ कारखाने आले. रुग्णालयांच्या, गोठय़ांच्या, अवाढव्य खुराडय़ांच्या आणि त्या भल्याथोरल्या कारखान्यांच्या सांडपाण्यातून अँटिबायोटिक्सचा पूर लोटला. पाश्चात्त्य देशांत सांडपाण्यावर निर्बंध होते. त्यामुळे पाश्चात्त्य कंपन्यांनी त्यांचे औषध कारखाने सोयीस्करपणे भारतात, चीनमध्ये हलवले.

पाश्चात्त्य कंपन्यांनीच भारतात बनवलेल्या औषधांच्या कार्यशक्तीबद्दलचे, शुद्धतेबद्दलचे पाश्चात्त्यांचे निर्बंध फार कडक आहेत. पण सांडपाण्यातल्या औषधांच्या विल्हेवाटीच्या नियमनासाठी त्यांचे प्रयत्न मात्र नगण्यच आहेत. जगातली ८० ते ९० टक्के अँटिबायोटिक्स भारतात आणि चीनमध्ये बनतात. भारतातच तीन हजार औषध कंपन्यांचे एकूण १० हजार ५०० कारखाने आहेत. चीनमध्येही तशीच परिस्थिती आहे. त्या दोन्ही देशांत गटारं- नाले- नद्या, शेतजमिनी आणि समुद्रसुद्धा औषधी पुरामुळे दूषित झाला. तिथल्या जमिनीतले, पाण्यातले असंख्य जंतू तोवर सुखेनैव नांदत होते. त्यांच्यावर राष्ट्रीय आणीबाणीचा प्रसंग ओढवला.

त्या अथांग जंतुसमुदायाने अँटिबायोटिक्स-विरुद्ध लढाईचे डावपेच आखले. नव्या धोरणांची खबर भटक्या जनुकांनी सगळय़ा जंतुगटांपर्यंत पोहोचवली. समस्त जंतुसमाज एकजुटीने युद्धसज्ज झाला. अँटिबायोटिक रेझिस्टन्सची वाढ अभूतपूर्व वेगाने झाली. नव्या डावपेचांनी सुसज्ज झालेले जंतू पाण्यातून पिकांत शिरले. हैदराबादजवळ त्याचा अतिरेक झाला. पण इतर ठिकाणीही ते अन्नपाण्यातून माणसाच्या, पशुपक्ष्यांच्या पोटात, त्वचेवर पोहोचले. तिथं नेहमी वसतीला असणाऱ्या निरुपद्रवी जंतूंनाही त्यांनी आतंकवादी दीक्षा दिली. माणसांच्या, पशुपक्ष्यांच्या रोगांना कारणीभूत असलेले कित्येक जंतू अँटिबायोटिक्सना दाद देईनासे झाले.

भारतात दरवर्षी सुमारे ६० हजार नवजात अर्भकं तशा बेगुमान जंतुसंसर्गाला बळी पडतात. त्याशिवाय तेवढेच लोक तशा जंतूंमुळे जखमा चिघळून मरण पावतात. ही साथ गाजावाजा न करता जगभर पसरली. अमेरिकेतही दरवर्षी सुमारे २० लाखांना तशा भस्मासुरी जंतुविकारांची लागण होते आणि २५ हजार लोक मृत्युमुखी पडतात. ‘बिनबोभाट’ पसरणारी ही समस्या पुढच्या दशकापर्यंत कोविडच्या जागतिक साथीसारखीच जगभर मृत्यूचं थैमान घालेल अशी शक्यता आहे.

तरीही जागतिक प्रदूषण-नियंत्रणासाठी २०१५ पासून जे अनेक आंतरराष्ट्रीय करार झाले त्यांच्यात अँटिबायोटिक्सचा उल्लेख नव्हता. मग अँटिबायोटिक्सच्या कारखान्यांच्या सांडपाण्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेनेही काही सूचना केल्या. त्यांच्या अंमलबजावणीकडे मात्र जगाने दुर्लक्ष केलं. २०१८ पासून भारत सरकारने या समस्येची दखल घेतली. २०२०च्या जानेवारीत भारतातले सांडपाण्याच्या नियंत्रणाचे नियम अतिशय कडक करण्याची घोषणा झाली. पाश्चात्त्य देशांतले नियमसुद्धा तेवढे कठोर नसतात. जगभरातून त्या निर्णयाची वाहवा झाली.

औषधनिर्मितीच्या प्रक्रियेत कमीत कमी पाण्याचा वापर केला, सगळं सांडपाणी सिमेंटच्या टाक्यांत गोळा करून तिथंच त्याच्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली, सांडपाणी पावसाच्या पाण्यात मिसळून सगळीकडे पसरू नये म्हणून तजवीज केली तर समस्या बरीच आटोक्यात येऊ शकते. पण तसे नियम पाळायला अनेक सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यासाठी मोठा खर्च होईल. ‘तो सगळा भरुदड सोसावा लागला तर अनेक कंपन्यांचं प्रचंड नुकसान होईल, त्या बंदच पडतील,’ असं म्हणून औषध कंपन्यांनी सरकारची करुणा भाकली. त्यातच कोविडची साथ आली. भांबावलेल्या लोकांनी भरमसाट अँटिबायोटिक्स घेतली. अजिंक्यजंतूंचा धोका वाढतच गेला. आता तीही लाट ओसरली. पण पाश्चात्त्य औषध कंपन्यांचे व्यवहार अजूनही पारदर्शी झालेले नाहीत. उद्दिष्ट उत्तम असूनही अंमलबजावणी रेंगाळली आहे.

अँटिबायोटिक रेझिस्टन्सवर कुरघोडीचे नाना मार्ग संशोधकांनी शोधले. उच्च तापमानाच्या प्रक्रियेने खतांतल्या अजिंक्यजंतूंचा नायनाट होऊ शकतो. इंग्लिश कृषितज्ज्ञांनी ते तंत्र शोधलं आहे. मग जंतू खतांवाटे पिकांत पसरणार नाहीत. कॅरोलायनाच्या शास्त्रज्ञांनी जंतूंच्या पेशींना छिद्र पाडणारी रसायनं सोबत देऊन अँटिबायोटिक्सची कार्यक्षमता वाढवली आहे. कुणी सोन्याचांदीच्या अतिसूक्ष्म (नॅनो) कणांना शोधक प्रथिनं जोडली आहेत. ते सोन्या-चांदीचे रामबाण जंतूंच्या आवरणांना चिकटतात आणि जंतूंना मारतात. कोलोरॅडोच्या शास्त्रज्ञांनी खबऱ्या, भटक्या जनुकांमध्ये जेनेटिक इंजिनीअरिंगने कापाकापी करून जंतूंचे डावपेचच बिघडवले आहेत.

अलीकडे कुठल्याही नव्या औषधाच्या निर्मितीच्या वेळच्या अनेकपदरी महागडय़ा चाचण्या सक्तीच्या झाल्या आहेत. त्यांचा खर्च अमाप असतो. त्यामुळे अजिंक्यजंतूंनी न उष्टावलेली, नवी अँटिबायोटिक्स शोधून त्यांचा अभ्यास करून ती बाजारापर्यंत पोहोचवणं कंपन्यांना परवडत नाही.

म्हणून शास्त्रज्ञ नव्या क्रांतिकारक उपायांच्या शोधात आहेत. अजिंक्यजंतूंवर मात करायला ते अथांग पसरलेल्या निसर्गाची मदत घेणार आहेत. बुरशीने मदत केली नसती तर माणसाला अँटिबायोटिक्स समजलीच नसती. जमिनीत, समुद्रात, पशु-पक्ष्यांच्या, झाडापेडांच्या शरीरांवर मिळून कोटी कोटी सूक्ष्मजीव नांदताहेत. गेली लाखो र्वष सतत एकमेकांशी झुंजत, लढाईचे डावपेच सुधारत त्यांची उत्क्रांती झाली आहे. त्यांच्याकडे जंतूंशी लढताना वापरता येतील अशी कित्येक साधनं असणारच. त्याच आयुधांची माहिती मिळवायचा संशोधकांचा इरादा आहे. आजवर न अभ्यासलेल्या जास्तीत जास्त सूक्ष्मजीवांकडून ते नव्या जंतुनाशक रसायनांचा खजिना मिळवायच्या प्रयत्नात आहेत. काही नवी होतकरू रसायनं सापडलीही आहेत.

पॅथोब्लॉकर्स म्हणजे जंतूंना फक्त दुबळं बनवणारी, त्यांची आजार उत्पन्न करायची क्षमताच हिरावून घेणारी, सूक्ष्मजीवनिर्मित रसायनं. त्यांनी दुबळय़ा केलेल्या जंतूंचं काम तमाम करणं मानवी प्रतिकारशक्तीला सहज जमतं. पेनिसिलीनशी आणि त्याच्या भावांशी लढताना अजिंक्यजंतू एक रासायनिक शस्त्र वापरतात. सूक्ष्मजीवांनी बनवलेली काही रसायनं नेमकं तेच शस्त्र हुडकून त्याला निकामी करतात. अजिंक्यजंतूंच्या पेशींच्या आवरणामधून क्षारांची, पाण्याची ये-जा चालते. त्यांच्या पेशींमधली अनेक कामं त्या दळणवळणावर अवलंबून असतात. काही सूक्ष्मजीव आपल्या रासायनिक ब्रह्मास्त्रांनी या दळणवळणाच्या वाटाच बंद करून टाकतात, तर दुसरे काही अजिंक्यजंतूंच्या भरवशाच्या जनुकांवर टोप्या घालून त्यांना झोपवून टाकतात. तशी शेकडो-हजारो रसायनं आजवर उपेक्षित असलेल्या जीवजंतूंकडून शास्त्रज्ञांना मिळू शकतील. त्या नव्या युक्त्यांची कुमक जुन्या अँटिबायोटिक्सना मिळाली की अजिंक्यजंतू आपला रेझिस्टन्स मुठीत धरून शरणागती पत्करतील.

मानवाच्या आत्मकेंद्रित उद्दामपणामुळे, अति हव्यासापायी भूतलावरचे तसे अनेक उपकारक सूक्ष्मजीव लयाला चालले आहेत. त्यांच्याकडून तशा उपकारक युक्त्या शिकून घ्यायच्या असल्या तर त्यांचा विनाश होता नये. निसर्गातलं जैववैविध्य प्रयत्नपूर्वक टिकवून, निगर्वीपणे त्यांच्याकडून त्यांचे जंतुनाशक धडे घेतले, त्यांचा कित्ता गिरवला तरच मानवजातीला काही तरणोपाय आहे.

या जगड्व्याळ संकटात सर्वसामान्य नागरिकांना करता येण्याजोगं तसं फार कमी आहे. पण जैववैविध्य टिकवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले, अँटिबायोटिक्सचा वापर अगदी गरजेपुरताच केला, उगाचच जंतुनाशक फवारणी केली नाही, सांडपाण्यात वाहून जाणारा जंतुनाशक साबण शक्यतो कमी केला तरी आपल्या नव्या सूक्ष्म गुरूंना थोडंफार संरक्षण लाभेल. आपल्याला त्यांच्याकडून जीवनमरणाच्या मोलाचे धडे घ्यायला काही उसंत मिळेल. प्रत्येकाने जेवढं जमेल तेवढं इमानेइतबारे केलं तर सार्वजनिक प्रयत्नांनी मोठं संकट टाळता येईल. लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत. ujjwalahd9@gmail.com