पेशव्यांच्या हाती सर्व सत्तासूत्रे आली, त्यावेळी मुख्य सरदार कोण कोण होते, त्यांची यादी राजवाड्यांनी विवेचनाच्या ओघात स्पष्ट केली. ‘शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, भोसले… अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिवदेव, गोविंद बल्लाळ, गोपाळराव पटवर्धन, नारो शंकर, मानाजी आंग्रे, सदाशिव रामचंद्र शेणवई, रामचंद्र गणेश कानडे, त्रबिंकराव विश्वनाथ पेठे, मेहेंदळे, पुरंधरे, चिटणीस, पायगुडे, थोरात… वगैरे सर्व सरदार पेशव्यांचे नोकर असत’, असे सांगून त्यांनी पुढे लिहिले, ‘उत्पन्नाच्या संबंधाने या सरदारांची गणना मामलतदार म्हणून होत असे. त्यांनी आपापल्या प्रांतातील वसूल उत्पन्न करून, खासा, कारकून व शिबंदी यांचा खर्च करून बाकी राहील तो पैसा रसद म्हणून पुण्यास पोहोचवावा, असा करार असे. यापैकी कित्येक मामलतदारांना लहानमोठ्या फौजा बाळगाव्या लागत. त्या फौजांच्या खर्चाकरिता जे निव्वळ मामलतदार असत, त्यांना महालातून रोकड रक्कम मिळे व जे सरदार असत, त्यांना सरंजामाला महालातील काही प्रांत स्वतंत्र
तोडून दिलेला असे. याप्रमाणे मुलकी व लष्करी अशा दोन्ही नात्यांनी पेशव्यांशी सरदारांचा संबंध येई.’
या संबंधांचे स्वरूप आणखी काही तपशील देऊन स्पष्ट केल्यानंतर राजवाड्यांनी एक गोष्ट अधोरेखित केली, ती महत्त्वाची होती. ‘१७५०पासून १७६१पर्यंतच्या ११ वर्षांमधील घडामोडींशी संबंधित जी काही कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत, त्यांच्यामध्ये सातारच्या छत्रपतींसंबंधी एक अक्षरही नाही. पेशवे आपले मुख्य आहेत व आपले बरे वाईट काय पाहिजे ते करण्याचा अधिकार सर्वस्वी पेशव्यांच्या हातात आहे, असा सरदारमंडळात सर्वत्र ग्रह झाला होता. सातारच्या राजंमडळातील प्रतिनिधी, सचिव, दाभाडे, सुमंत, राजाज्ञा वगैरे सरदार क्षुल्लक असून पेशव्यांच्या शिंदे, होळकर, विंचूरकर इत्यादी सरदारांप्रमाणे व पुरंधरे, फडणीस, मुजुमदार इत्यादी मुत्सद्द्यांप्रमाणे वजनदार पुरुष त्या राजमंडळात एकही नव्हता. तेव्हा त्यांचा विचार करण्याची गरजच उरत नाही.’
‘१७५३ नंतर मराठ्यांच्या हालचालींची सर्व सूत्रे बाळाजीच्या हाती केंद्रीभूत झाली. त्या केंद्रीभवनाच्या विरुद्ध बरीच खटपट काही सरदारांनी, मामलतदारांनी व मुत्सद्द्यांनी केली. ही खटपट सत्तेचे केंद्रीभवन झाले नव्हते म्हणून करता आली, अशी गोष्ट नसून सत्तेचे केंद्रीभवन फार झाले व ते तत्कालीन काही सरदारांना असह्य झाले म्हणून ती करता आली’, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती स्पष्ट करताना राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘होळकर, शिंदे वगैरे सरदारांचे पारडे पुढे फार जड होईल, (या शक्यतेचा विचार करून) बाळाजीने त्यांना योग्य बंधनानी जखडून टाकण्याचा बेत केला. तो तडीस नेत असता पेशव्यांना त्यांच्या स्वत:च्याच सरदारांकडून अथडळे येऊ लागले. पूर्वीच्या राजमंडळातील सरदारांच्या शत्रुत्वाऐवजी आता पेशव्यांना त्यांच्या सरदारांकडूनच त्रास पोहोचू लागला. त्या सरदारांचे डावपेच, फितवेखोरी व उद्दामपणा यांना आळा घालण्याचे काम पेशव्यांना पत्करावे लागले. केंद्रप्रवण न होता स्वतंत्र होण्याचा उद्योग निरनिराळ्या हेतूंनी प्रेरित होऊन निरनिराळ्या सरदारांनी केला.’
त्या तशा ‘दुरुद्योगात’ गुंतलेल्या सरदारांची नावे राजवाड्यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या अभ्यासातून शोधून काढली होती. ‘मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर, लक्ष्मण शंकर, बापूजी महादेव आणि गोविंदपंत बुंदेले वगैरे गृहस्थांची नावे प्रामुख्याने उल्लेखिता येतात. १७५० ते १७६०पर्यंतच्या या इसमांच्या उद्योगाचे त्रोटक वर्णन आता देतो…’ असे म्हणून राजवाड्यांनी त्या त्या सरदारांच्या वर्षागणिक बदलत गेलेल्या भूमिकांचा थोडक्यात पण साधार आढावा घेतला. त्या साडेचार-पाच पानी आढाव्यात त्या ‘दुरुद्योगी’ सरदारांबरोबरच्या पत्रव्यवहाराचा त्यांनी किती किती बारकाईने धांडोळा घेतला होता, याचे विलक्षण प्रत्ययकारी प्रतिबिंब पडलेले आढळले.
कागदपत्रांचा किंवा ऐतिहासिक साधनांचा कसकसा अभ्यास करावा, हे ज्यांना ज्यांना समजून घ्यावेसे वाटेल, त्या सर्व जिज्ञासूंनी राजवाडे समग्र साहित्याच्या दहाव्या खंडातील त्यांचे हे विवेचन अगदी आवर्जून वाचावे. (पृ.क्र. ४९ ते ५५) मराठे सरदारांमध्ये निर्माण झालेला द्वैतभाव, पैशाची अफरातफर केल्यामुळे पेशव्यांची झालेली गैरमर्जी, गोविंद बल्लाळ खेर या आधी केवळ साधा कमाविसदार (=महसूूल अधिकारी) असणार्या गृहस्थाची बुंदेलखंडातली मामलतीची कारकीर्द वादग्रस्त ठरण्याची कारणे वगैरे वगैरे बाबी तर राजवाड्यांनी सोदाहरण स्पष्ट केल्याच, परंतु त्या सर्व घटकांचे हानीकारक परिणाम पेशव्यांना म्हणजे पर्यायाने मराठेशाहीला पानिपत येथे भोगावे लागले, याबद्दलची प्रामाणिक खंतही व्यक्त केली. anand47.hardikar@gmail.com
