‘विशेषकरून ज्यांना केवळ स्वभाषेचेच ज्ञान आहे, ज्यांना अन्य भाषेतील (साहित्याचा) रसास्वाद घेण्याची इच्छा असूनही तशी साधने नाहीत, त्यांच्याकरिता ही साधने आम्ही तयार करणार आहोत. तसेच अन्य भाषा जाणणार्यांनाही स्वभाषेची गोडी लागावी व इंग्रजी वाचावयाचे नाही आणि मराठीत काही वाचावयासारखे नाही, अशा सबबीवर त्यांना उडवाउडवी न करता यावी, एतदर्थ हा व्यवसाय आम्ही आरंभलेला आहे’, असे वि. का. राजवाडे यांनी ‘भाषांतर’ मासिकाच्या जानेवारी १८९४ मध्ये प्रकाशित केलेल्या पहिल्या अंकाच्या ‘उपोद्घाता’त म्हटले होते.
भाषांतर करताना कित्येक ठिकाणी दुर्बोधपणा येण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी त्याबद्दल खुलासा केला होता. तो असा की, ‘तो दुर्बोधपणा दूर करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करू, परंतु तरीसुद्धा जी दुर्बोध स्थळे राहतील आणि जे नवीन व अपरिचित शब्द येतील, त्या सर्वांसंबंधी एवढेच कळवले पाहिजे की, हा आमचा दोष नाही. जर कोणाचा दोष असेल, तर तो केवळ वाचकाच्या अपरिचितत्वाचा आहे, असे समजले पाहिजे… आम्ही (या मासिकातले भाषांतरासाठी) घेतलेले विषय बहुतेक शास्त्रीय असल्यामुळे ते कादंबर्यांसारखे किंवा वर्तमानपत्रांतील लेखांसारखे एकदा वाचून समजणे अशक्य आहे. त्यावर विचार केला पाहिजे. तत्त्वज्ञानाचा अभ्यास म्हणजे चढणीचा मार्ग आहे. अशा मार्गाने धावत जाता येणार नाही. जो दमादमाने जाईल, तोच या टेकडीच्या शिखराला पोहोचेल.’
आपण हे मासिक कुणासाठी काढतो आहोत, याची कल्पना राजवाड्यांनी अशी थोडक्यात स्पष्ट केली; ते कशासाठी काढतो आहोत, हे मात्र त्यांनी त्या ‘उपोद्घाता’मध्ये थोड्या विस्ताराने सांगितले. त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यभराच्या हेतूचेही त्या निवेदनात प्रतिबिंब पडले असल्यामुळे ते या टप्प्यावरच आपण समजून घेणे योग्य ठरेल.
‘आपला हा देश प्रौढावस्थेत पोहोचून स्वतंत्र व्हावा, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. परंतु त्या उत्तमोत्तम स्थितीचा अनुभव घेण्यास अद्याप आपण पात्र नाही. कारण स्वत:चा कारभार चालवण्याची योग्यता अंगी येण्यास जे सामर्थ्य हवे आहे, त्याचा आपल्यापाशी हवा तसा संचय होण्यास अजून दहा-पाच पिढ्या गेल्या पाहिजेत’, असे अत्यंत वास्तववादी चित्र राजवाड्यांनी त्या ‘उपोद्घाता’मध्ये रेखाटले होते आणि लगेच त्या दुर्बलतेची कारणमीमांसासुद्धा सुरू केली होती.
‘(आपल्यातल्या) सामथ्र्याच्या अभावाचे मूळ आपले मन आहे. ते अतिशय कोते व दुर्बल झालेले आहे. त्याला स्वत:च्या स्थितीचे व परिस्थितीचे ज्ञान मुळीच नाही… हे अज्ञान अशिक्षित वर्गातच तेवढे आहे, असे नाही; सुशिक्षित या दिखाऊ नावाखाली मोडणार्या लोकांच्या ठायीदेखील याचे वास्तव्य प्रबळ आहे… अशिक्षितांना अज्ञानामुळे राष्ट्रत्वाची कल्पनाच झालेली नाही म्हणून व शिक्षितांच्या गैरसमजाने त्यासंबंधी खोट्या कल्पना झाल्या आहेत म्हणून देशाभिमान, धर्माभिमान, भाषाभिमान आणि आचाराभिमानाचा सर्वत्र सारखा लोप झालेला दिसतो. त्याचा प्रतिबंध करण्यास योग्य उपायांची योजना केली पाहिजे,’ असे राजवाड्यांनी सांगितले. आपण सुरू करत असलेले मासिक हा त्याचाच एक छोटा भाग असल्याचे सूचित केले. जर अशी काही उपाययोजना वेळीच केली नाही, तर काय होईल, याचे टोकाचे चित्र रंगवताना त्यांनी ज्यू समाजाचा दाखला दिला. त्यांनी लिहिले, ‘ती योजना वेळीच न झाल्यास यहुदी राष्ट्राप्रमाणे आपण कदाचित या भूतलावरून नष्ट होऊ’. आपण अतिशयोक्ती करीत आहोत, याची खुद्द राजवाड्यांनाही निश्चितच कल्पना असणार, पण प्राप्त परिस्थितीत त्यांना ती आवश्यकही वाटली असावी.
मराठी मासिकाची गरज वाचकांना पटावी म्हणून त्यांनी लिहिले की, ‘देशाचा, धर्माचा व आचारांचा खरा अभिमान जागृत राहण्यास बोलणे, चालणे, लिहिणे, शिकणे व विचार करणे मराठीत झाले पाहिजे. कर्तव्याचा पक्का ठसा आपल्या मनावर उमटायचा नाही. जगतात जे विचार आज प्रचलित झाले आहेत, ते मराठी भाषेत उतरल्यास लोकांस ते यथास्थित समजतील, असे आमचे ठाम मत असल्याने अन्य भाषांतील उत्कृष्ट विचारांचे
तर्जुमे मराठीत करण्याच्या मार्गाचा आम्ही अवलंब केला आहे.’
आनंद हर्डीकर

