– आनंद हर्डीकर

डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहात राहत असताना वि. का. राजवाडे यांनी मनापासून जे ग्रंथवाचन केले, ते डोळसपणे केले. कितीही मोठ्या ख्यातीचा लेखक असला, तरीही त्याचे म्हणणे जसेच्या तसे स्वीकारायला ते सहसा तयार होत नसत. त्या त्या लेखकाने आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी काही ठोस आधार दिले आहेत का, असल्यास ते विश्वासार्ह आहेत का, वगैरे निकषांवर ते म्हणणे तपासून पाहण्यास ते उत्सुक असत.

तशा पडताळणीमुळेच त्यांच्या हे लक्षात आले होते की, बहुसंख्य लेखक आपापल्या देशकालपरिस्थितीचे अप्रत्यक्ष संस्कार झुगारून देऊ शकत नाहीत. त्या त्या संस्कारांमुळेच काही पूर्वग्रह निर्माण होतात व ते लेखनात स्वाभाविकपणे प्रतिबिंबितही होतात. राजवाडे यांना युरोपीय इतिहास अभ्यासताना हे प्रकर्षाने जाणवले की, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांमधील वैमनस्यामुळे एकाच कालखंडातील घटनांचा अन्वयार्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावला जातो. शेवटी पराभूत झाला असला, तरी नेपोलियन बोनापार्ट हाच फ्रेंचांच्या दृष्टीने महानायक असतो; इंग्रज इतिहासकार मात्र नेल्सन आणि ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांच्याच शौर्याचे व पराक्रमाचे गोडवे गातात. इतिहासलेखनावरचा देशी अस्मितांचा प्रभाव एकाच घटनेकडे किंवा व्यक्तीकडे किंवा लोकसमूहाकडे पाहण्याचे भिन्नभिन्न दृष्टिकोन जन्माला घालत असतो.

या जाणीवेमुळे राजवाडे यांनी विद्यार्थिदशेत असतानाच या विरोधाभासाबद्दल अधिक बारकाईने विचार करायची सवय लावून घेतली. हिरोडोटस हा पाश्चिमात्य जगात आद्य इतिहासकार मानला जात असला, तरी त्यालाच ‘असत्याचा जनक’ (फादर ऑफ लाइज) असे दूषणही दिले जाते. मग त्याचे यथार्थ मूल्यमापन कसे करायचे, या प्रश्नाभोवती घुटमळणारे विविध युरोपीय लेखक त्यांनी अभ्यासले आणि साहजिकच ‘मराठ्यांचा आद्य इतिहासकार’ म्हणून नावाजल्या गेेलेल्या ग्रँट डफच्या लेखनाची आपणही चिकित्सा केली पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यांनीच आपल्या आत्मकथनपर लेखात नमूद केल्याप्रमाणे १८८८ साली सर्वप्रथम ही इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती.

खरे म्हणजे त्यापूर्वीच चार वर्षे निळकंठ जनार्दन कीर्तने यांनी ‘ग्रँट डफकृत मराठ्यांचे बखरीवर टीका’ या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी डफच्या इंग्रजी ग्रंथामधील अनेक चुका दाखवून दिल्या होत्या आणि पूर्वग्रह दर्शवणारी विधानेही आक्षेपार्ह असल्याचे म्हटले होते. मराठ्यांच्या अभिमानास्पद गोष्टींचेसुद्धा डफने दूषित हेतूने कसे विकृत चित्रण केले आहे, हे कीर्तने यांनी मोठ्या धाडसाने दाखवून दिले होते. राजवाडे यांच्या वाचनात कीर्तने यांचे पुस्तक आले असले, तरीही डफ यांच्या आणखी कितीतरी चुका आणि वादग्रस्त विधाने कीर्तने यांच्या विवेचनाच्या कक्षेत आली नाहीत, तीसुद्धा प्रकाशझोतात आणली गेली पाहिजेत, असे त्यांना सतत वाटत राहिले आणि ते काम आपणच केले पाहिजे, असा विचारही त्यांच्या मनात घर करू लागला.

जे काही वाचू, ते पारखून घ्यायचे आणि मगच तारतम्य वापरून त्यातले योग्यायोग्य ठरवायचे, ही सवय जशी राजवाडे यांनी लावून घेतली, तशीच वाचनाच्या विषयांना कुंपणे न घालता विविध प्रकारचे युरोपीय वाङ्मय वाचायचीही सवय त्यांनी हेतुपूर्वक जोपासली. एकांगी किंवा एकारलेले वाचन करीत राहण्याऐवजी त्यांनी ललित साहित्यसुद्धा वाचले, आश्चर्य म्हणजे फ्रेंच कादंबर्‍यासुद्धा त्यांनी सोडल्या नाहीत. उत्तम सामाजिक कादंबर्‍या लिहिणार्‍या चार्ल्स डिकन्ससारखा इंग्रजी लेखक जसा त्यांनी मन लावून वाचला, तसेच होनोरे बाल्झाक, अलेक्झांडर ड्यूमा, व्हिक्तर ह्यूगो वगैरे फ्रेंच साहित्यिकही उत्सुकतेने वाचले. त्यांना विशेषत्वाने आवडला तो बाल्झाक आणि ‘कोमेदी ह्यूमेन’ या शीर्षकाची त्याची कादंबरीमालिका. आपल्या बहुतेक सर्व ग्रंथांना ‘मानवी नाटक’ असे अनुरूप नाव देण्याची त्याची पद्धतही त्यांना खूप भावली.

व्यक्तीविषयक कादंबर्‍यांपेक्षा सामाजिक आशयाच्या कादंबर्‍या लिहिण्याकडे फ्रेंच, रशियन व अन्य युरोपीय साहित्यिकांचा वाढता कल आहे, त्या तुलनेत इंग्लंडमधील कादंबरीविश्वात दखलपात्र असे फारसे काही घडत नाही, हे तौलनिक निरीक्षणसुद्धा राजवाडे यांनी नोंदवले. फ्रेंच साहित्याच्या अशा प्रभावाचा काय परिणाम झाला याविषयी पुढील लेखांकात…

anand47.hardikar@gmail.com