मेणवलीतले नाना फडणीस यांचे दप्तर अधिक अभ्यासासाठी आणि नंतर प्रकाशनासाठी आपल्याला उपलब्ध व्हावे म्हणून बाळ गंगाधर टिळकांमार्फत प्रयत्न करावेत, असा विचार वि. का. राजवाडे यांच्या मनात बळावला. मेणवलीकरांशी वादावादी झाल्यामुळे जरी त्या कामामध्ये व्यत्यय आला असला, तरी राजवाड्यांचे मन त्या दप्तरात गुंतले होते. त्या दप्तरातले रुमाल पाहून साधनसामग्रीचे वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी काही दिवस मेहनत घेतली होती, पैसेही खर्च केले होते. ते आपल्या हातून निसटू नये, असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते.

पुण्याला जाऊन टिळकांना भेटण्यापूर्वी राजवाड्यांनी आपल्या मनातला विचार सातारचे प्रसिद्ध वकील दादासाहेब करंदीकर यांना सांगितला. ते टिळकांचे अनुयायी होते. त्यांनीही आपल्यासाठी टिळकांकडे शब्द टाकला, तर आपले काम अधिक सुकर होईल, असा त्यांचा कयास होता. दादासाहेबांनी राजवाड्यांकडून मेणवली दप्तराबद्दलची सगळी माहिती नीट ऐकून घेतली खरी; पण मदतीचे कसलेही आश्वासन मात्र दिले नाही. त्या बाबतीतली त्यांची टाळाटाळ लक्षात घेऊन राजवाड्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला हवी होती आणि दादासाहेबांवर विसंबून न राहता त्यांनी थेट टिळकांशी संपर्क साधायला हवा होता; पण त्यांना तसे काही सुचलेच नाही.

दादासाहेब करंदीकरांना जेव्हा ती माहिती राजवाड्यांकडून समजली, तेव्हाच त्यांच्या मनात मेणवलीचे ‘ते’ दप्तर सातारच्याच दुसर्‍या एका तरुण, उमद्या, उदयोन्मुख इतिहासकाराला मिळवून द्यावे, असा विचार पक्का झाला. त्या इतिहासकाराचे नाव होते, दत्तात्रय बळवंत पारसनीस. आपल्या रंजक लेखनशैलीमुळे तरुणपणातच ते प्रकाशझोतात आले होते. सातव्या इयत्तेतच शालेय शिक्षणाला रामराम ठोकणारे आणि ‘महाराष्ट्र कोकिळ’ हे मासिक काढून ते पाच वर्षे यशस्वीपणे चालवून दाखवणारे संपादक म्हणून पारसनीस गाजले होते, तसेच खुद्द टिळकांनी आग्रह केल्यामुळे राणी लक्ष्मीबाईंची माहिती शोधून काढून तिचे साधार व अत्यंत प्रभावी चरित्र प्रसिद्ध केल्यामुळेही ते अनेक मान्यवरांचे लाडके लेखक ठरले होते. न्या. म. गो. रानडे यांनी ‘दि राइज ऑफ दि मराठा पॉवर’ या इतिहासग्रंथाचे लेखन त्या वेळी सुरू केले होते, त्या कामात आणि पुण्यातल्या ‘पेशवे दप्तरा’तल्या ३४९७२ रुमालांमधल्या सुमारे दोन कोटी कागदपत्रांच्या अध्ययनात सहभागी होण्यासाठी त्यांनी पारसनीसांना मुद्दाम आमंत्रित केले होते. पारसनीसांनी ती संधी साधली आणि जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या नियमित प्रकाशनासाठी पुण्याच्या ‘डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’च्या वतीने ‘भारतवर्ष’ नावाचे मासिक १८९६ पासून सुरू केले होते. (त्या ६४ ते ८० पानी अंकाची वार्षिक वर्गणी फक्त ४ रुपये होती.) त्या मासिकाच्या पहिल्याच अंकात हरिभाऊ आपटे यांच्या मदतीने पारसनीसांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची सामग्री’ हा ४० पानी निबंध प्रसिद्ध केला होता, त्याचे टिळकांनी ‘केसरी’त अग्रलेख लिहून कौतुक केले होते.करंदीकरांना हे सारे ठाऊक होते. म्हणूनच राजवाड्यांनी मेणवली दप्तराबद्दलची माहिती सांगितल्यावर त्यांना वाटले की, हे काम पारसनीस यांनीच केले, तर त्यांचा नावलौकिक आणखी वाढेल. त्यांची ही भावना स्वाभाविक असली, तरी सरळ साधी नव्हती. त्यांनी तसे राजवाड्यांना स्पष्ट सांगायचे धाडस दाखवले नाही. राजवाड्यांना अंधारात ठेवून त्यांनी ही माहिती पारसनीसांना कळवली. त्यांनी तातडीने हालचाली करून ‘ते’ दप्तर हस्तगत केेले.

द.ब.पारसनीस यांच्याबद्दलचे यानंतरही अनेकदा उल्लेख करावे लागणार आहेतच; मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भातल्या त्यांच्या योगदानाची महती कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळेच इथे ही अगदी संक्षिप्त माहिती एवढ्यासाठी दिली आहे की, करंदीकर वकील आणि खुद्द पारसनीस या दोन सातारकर ‘ग्रामबंधूं’नी राजवाड्यांचा केेलेला विश्वासघात पुरेसा स्पष्ट व्हावा. करंदीकरांनी १८९७मध्ये राजवाड्यांना गाफील ठेवून त्यांचा अवसानघात केला आणि पारसनीसांनी पुढे १९०८मध्ये सुरू केेलेल्या ‘इतिहाससंग्रह’ या मासिकातून क्रमाक्रमाने ‘ते’ दप्तर प्रसिद्ध करताना ते उजेडात आणण्याचे सारे श्रेय स्वत:कडे घेतले, राजवाड्यांचा कृतज्ञतापूर्वक नामोल्लेखही त्यात नव्हता.

– आनंद हर्डीकर