चौर्यांयशीच्या शिलालेखाबद्दल व त्या निमित्ताने इतरही काही संबंधित बाबींबद्दल वि. का. राजवाडे यांनी जसे संपादकीय भाष्य केले होते, तसे त्यांनी ‘तंजावर येथील शिलालेखा’बाबत मात्र केले नाही आणि तरीही त्याची दखल घेणे आवश्यक आहे. धुळे येथून प्रसिद्ध होणार्या ‘प्रभात’ या मासिकातून १९०६ साली त्यांनी तो प्रसिद्ध केला; पुढे तोच मजकूर त्यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’, खंड ९वा म्हणून कोल्हापूरहूनही प्रकाशित केला. ‘हा शिलालेख म्हणजे एक बखरच आहे’, हे आपले मत त्यांनी ‘राधामाधवविलासचंपू’ला लिहिलेल्या प्रस्तावनेत नोंदवले होते. ‘शिवदिग्विजय, शिवप्रताप या दोन बखरींच्याच वर्गात हा बृहदीश्वर शिलालेख पडतो. तो मूलत: बखरच आहे, इतकेच की, याला दगडावर कोरिला जाण्याचा मान मिळाला आहे’.
हा शिलालेख कोरताना रचनाकाराला काही अस्सल दस्तऐवज उपलब्ध झालेले असावेत, कारण तंजावरला भोसल्यांची गादी होती – अशी शक्यता जरी त्यांनी व्यक्त केली होती, तरी त्या शिलालेखातील मजकुराच्या ऐतिहासिक सत्यासत्यतेविषयी विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी त्याबद्दलचे भाष्य टाळले होते. त्यांनी लिहिले होते, ‘ह्य (तिन्ही) बखरींमध्ये आधुनिक परंपरागत कर्णोपकर्णी ऐकलेली व कागदपत्रांवरून काढिलेली जी माहिती दिली आहे, तिला प्रत्यंतर पुरावा दुसर्या कोणत्याहि मराठी बाह्य ग्रंथाचा नाही. परंतु लढायांसंबंधाने जी काही माहिती धरसोडीने दिली आहे, तिला मुसलमानी तवारिखांतील पुराव्याचा पडताळा देऊन पारखिता येते. साधनांची ऐतिहासिक किंमत ही अशी आहे. त्यातून विश्वसनीय भाग निवडून काढून तो कालानुक्रमाने शिस्तवार मांडण्याचा उद्योग येथे करावयाचा आहे. कालान्तराने समकालीन कागदपत्रांचा अस्सल पुरावा जेव्हा बाहेर येईल तेव्हा प्रस्तुतच्या मांडणीत फेरबदल, वाढ किंवा छाट करणे सहजच भाग पडेल…’
राजवाड्यांनी जरी तंजावरच्या त्या शिलालेखाबद्दल सविस्तर संपादकीय भाष्य केलेले नसले, तरीही त्यांनी बृहदीश्वर देवालयात जाऊन तो मिळवला, ही घटनाच मुळी दखलपात्र ठरली. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या इतिहासाशी संबंधित एवढा मोठा शिलालेख अन्यत्र पाहण्यात नाही. तो किती मोठा आहे, याची कल्पना यावी म्हणून एकच तपशील पुरेसा आहे. समग्र राजवाडे साहित्यसंचाच्या ज्या चौथ्या खंडात तो शेवटी समाविष्ट करण्यात आला आहे, त्या खंडाची तब्बल ५९ छापील पाने त्या शिलालेखाच्या मजकुराने व्यापलेली आहेत. तंजावरच्या राजघराण्यातील कर्त्याधत्र्या पुरुषांच्या आज्ञेवरून कोरल्या गेलेल्या त्या शिलालेखाचे मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भात असणारे वादातीत महत्त्व ओळखून राजवाड्यांनी चिकाटीने तो शिलालेख उतरवून घेतला आणि इकडे येऊन तो अभ्यासकांच्या सोयीसाठी प्रकाशितही केला. त्या शिलालेखाची अपूर्वता स्पष्ट करणारा विस्तृत समीक्षालेख डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी (त्याच खंडात प्रत्यक्ष शिलालेखापूर्वी समाविष्ट) लिहिला असून जिज्ञासू अभ्यासकांनी तो अवश्य वाचावा.
या शिलालेखासंबंधी राजवाड्यांनी संपादकीय भाष्य केले नसले आणि त्या मजकुराच्या ऐतिहासिक सत्यतेबाबत सावधगिरीची भूमिका घेतली असली, तरी ‘राधामाधवविलासचंपू’वरील प्रदीर्घ प्रस्तावनेत मात्र त्यांनी किमान दहा वेळा तरी आपल्या मतांच्या वा निष्कर्षांच्या पुष्टीसाठी याच शिलालेखाचा आधार घेतला आहे, हे डॉ. देशपांडे यांनी त्या लेखात स्पष्ट केले आहे : ‘लखूजी जाधवरावाने भोसल्यांशी विवाहसंबंधांना नकार देताच मालोजीने शहाजीचे पहिले लग्न मोहित्यांची कन्या उमाबाईशी लावले… मालोजी युद्धात मरण पावल्यानंतर त्याची जहागीर व सैन्य यांचे आधिपत्य शहाजीस मिळाले… भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजवल्यानंतर शहाने वजीर मलिक अंबरपेक्षाही अधिक बहुमान शहाजीराजाचा केला… वगैरे घटनांची तसेच अनेक संबंधित व्यक्तींची नावनिशीवार नोंद करताना राजवाड्यांनी या शिलालेखाचाच आधार घेतला आहे, हे विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखे आहे.’
