- आनंद हर्डीकर
पुण्यात १८९७च्या प्रारंभी प्लेगच्या साथीने घातलेला धुमाकूळ आणि त्या साथीवर नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली ब्रिटिश प्रशासनाने सुरू केलेल्या अत्याचारी धाडींच्या सत्रामुळे शहर भकास झाले होते. ‘भाषांतर’ मासिक बंद करणे भाग पडले होते. त्या परिस्थितीत ‘विशेष काही कामधंदा नसल्यामुळे आणि आपल्याकडून इंग्रज सैनिकांना काडीइतकेही साहाय्य होण्याची खात्री नसल्यामुळे, वि. का. राजवाडे वाईला जाऊन राहिले होते. केवळ हवापालट करण्यासाठी ते तिकडे गेले नव्हते; १८९०पासून इतिहासाची अस्सल आणि विश्वसनीय साधने शोधण्याच्या खटपटीला त्यांनी जेव्हा प्रारंभ केला होता, तेव्हा नंतरच्या दोन-चार वर्षांत त्या भागात ऐतिहासिक कागदपत्रांचा आणि माहितीचा विशेष भरणा असल्याचे त्यांना कळले होते. ती बाब लक्षात असल्यामुळे आपल्या शोधमोहिमेसाठी ही चांगली संधी आहे, असे मानून ते तिकडे जाऊन राहिले होते.
शिवाय वाईला त्यांची काही मित्रमंडळीसुद्धा राहत होती. त्या गावामध्ये न्यू इंग्लिश स्कूल सुरू करणारे आणि जिद्दीने चालवत राहिलेेले अंताजी गंगाधर जोशी, रामकृष्णपंत लेले, गोपाळरावजी भिडे, शंभूराव करंदीकर आणि काकाराव पंडित वगैरे मंडळी राजवाड्यांच्या चांगल्या परिचयाची होती. तो धागा पकडून राजवाडे वाईला गेले. ऐतिहासिक साधनांचा शोध घेण्याची खटपट त्यांनी सुरू केली. ओझर्डे, बावधन, लिंब, वर्ये, कोरेगाव, मेणवली वगैरे गावांमधल्या काही काही घराण्यांकडे जुनी दप्तरे अजूनही शिल्लक आहेत, ही माहिती त्यांना समजली. मग त्या घराण्यांच्या प्रमुखांना भेटून, त्यांची मिनतवारी करायची, ती दप्तरे पाहण्यासाठी मागायची आणि समोर येतील ती कागदपत्रे तपासायची त्यांची मोहीम सुरू झाली.
पुढे जून १८९७मध्ये राजवाड्यांनी ‘केसरी’मध्ये लेख लिहून आपल्या या शोधमोहिमेची माहिती सांगितली होती. त्या लेखाचा हवाला सगळ्या चरित्रग्रंथांमध्ये दिलेला आढळत नसला, तरी डॉ. प्र. न. जोशी यांच्या ‘राजवाडे विचारदर्शन’ या महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथात मात्र तो आढळतो. (१९६५चे व्हिनस प्रकाशनाचे पुस्तक.) त्यानुसार त्यांनी वाईच्या मुक्कामात पाच-चार दप्तरे बारीक तपासून पाहिली. ‘सर्वप्रथम त्यांनी पंत राजाज्ञा यांचे दप्तर तपासले. गेल्या दोनशे-तीनशे वर्षांमधील रेव्हेन्यू (महसूल) व ज्युडिशियल (न्यायिक) खात्यांची भरपूर माहिती त्या दप्तरात असल्याचे त्यांना आढळले. विजापूर दरबारचे आणि रामशास्त्र्यांचे अनेक निवाडे त्यांना पाहायला मिळाले. त्याचबरोबरीने असंख्य करारनामे, इनामपत्रे, बक्षीसपत्रे, कर्जरोखे, तहपत्रे व दैनंदिन व्यवहारासंबंधीचे शेकडो कागद त्या दप्तरांमध्ये होते, तथापि त्या सगळ्या ढिगार्यात निव्वळ राजकीय अशी माहिती मात्र राजवाड्यांना सापडली नाही. त्यामुळे त्यांच्या पदरी थोडीशी निराशाच आली.’
तथापि काही दिवसांनी पुण्याला परतलेल्या राजवाड्यांची गाठ पुढे योगायोगाने प्रा. आबाजी विष्णू काथवते यांच्याशी पडली. काथवते डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे दोघांचा चांगला परिचय होता. त्या भेटीत काथवते यांनी राजवाड्यांना अशी माहिती सांगितली की, ‘काकाराव पंडित हे तुमचे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधले विद्यार्थी वाईच्या ज्या वाड्यात राहत आहेत, त्या वाड्याच्या तिसर्या मजल्यावरील एका अंबारीत जुन्या कागदांचे पेटार सापडले आहेत. त्यात काही उपयोगाचे नाही, अशा समजुतीने घरमालकाने कसे तरी अस्ताव्यस्त टाकले होते. त्या पेटार्यात जी काही जुनी कागदपत्रे दिसत होती, ती एकदा वाचून पाहावीत, असे पंडितांना वाटले. त्यांनी आणि त्यांचे समवयस्क मित्र रंगो वासुदेव बोपर्डीकर यांनी मिळून ती कागदपत्रे सहज चाळून पाहण्यास सुरुवात केली. त्यांच्या हाती लागले, ते पहिलेच पत्र पानिपतच्या लढाईतला महत्त्वाचा माणूस गोविंदपंत बुंदेले यांनी स्वत: लिहिलेले होते. मग त्यांनी इतरही कागदपत्रेही पाहिली व ती महत्त्वाची वाटून नीट व्यवस्थित लावून ठेवली आहेत. ती तुम्ही एकदा नजरेखालून घालावीत, असे वाटते’.
काथवते सरांनी अशी माहिती सांगितल्यावर राजवाडे तातडीने वाईला जायला निघाले, पोहोचलेदेखील. त्यांना पंडितांकडे काय घबाड गवसले, ते पुढील लेखात…
